डाव्यांच्या बालेकिल्ल्यात अर्थात केरळमध्ये योगी आदित्यनाथ हे भाजपच्या जनरक्षा यात्रेत सहभागी होण्यासाठी आले आहेत. अशात डाव्यांनी मात्र त्यांच्यावर टीका करण्याची संधीच शोधली. उत्तर प्रदेशातील बाबा राघवदास मेडिकल कॉलेजमध्ये ऑगस्ट महिन्यात ऑक्सिजन न मिळाल्याने ७० लहान मुले दगावली. हाच मुद्दा डाव्यांनी पुढे केला. योगी आदित्यनाथ केरळमध्ये आले आहेत. रूग्णालये कशी चालवली जातात, मुख्यमंत्र्यांची जबाबदारी काय असते? हे शिकवण्यासाठीच आम्ही त्यांना केरळमध्ये निमंत्रित केले आहे, असा टोला सीपीआय(एम)ने लगावला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सीपीआय (एम) च्या अधिकृत ट्विटर हँडलवर या आशयाचे ट्विट करण्यात आले आहे. एवढेच नाही तर पक्षाचे महासचिव आणि राज्यसभेचे माजी खासदार सीताराम येचुरी यांनी हे ट्विट रिट्विटही केले. योगी आदित्यनाथ आणि भाजपचे इतर मुख्यमंत्री यांनी केरळ सरकारकडून सत्ता कशी चालवायची याचे धडे घ्यावेत, असा तिखट शब्दांतील टोलाही त्यांनी लगावला.

केरळने भाजपला कायम नाकारले आहे. कारण कोणाला सत्तेत ठेवायचे हे या जनतेला कळते, आमच्याकडून काहीतरी शिका असे म्हणत त्यांनी योगी आदित्यनाथ आणि भाजपवर टीका केली. केरळमध्ये सुरू असलेल्या राजकीय हिंसेकडे लोकांचे लक्ष वेधले जावे, यासाठी भाजपने ‘जनरक्षा यात्रा’ आयोजित केली आहे. लोकशाहीत हिंसेला स्थान नाही तरीही केरळमध्ये हत्यांचे सत्र सुरूच आहे. याचाच निषेध म्हणून भाजपने ही यात्रा काढली. या यात्रेत बुधवारीच योगी आदित्यनाथही दाखल झाले. अशातच त्यांच्यावर टीका करत डाव्यांकडून हे ट्विट करण्यात आले.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांच्या धोरणांवर टीका केली.
केरळमध्ये हिंसेच्या घटना वाढताहेत, भाजपचे कार्यकर्ते असोत किंवा डाव्या पक्षाचे कार्यकर्ते त्यांच्या रक्ताचे पाट वाहणे आणि केरळच्या मुख्यमंत्र्यांनी त्यावर शांत बसणे कितपत योग्य आहे? मारल्या जाणाऱ्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबाचे काय होत असेल? याचा विचार तरी मुख्यमंत्र्यांनी केला आहे का? असाही प्रश्न अमित शहा यांनी उपस्थित केला.

तर हे सगळे आरोप खोडून काढत डाव्यांनी भाजपवर टीका केली. भाजपला सत्ता काबीज करायची आहे म्हणून आरोप केले जात आहेत हे चांगल्या राजकारणाचे लक्षण नाही, असे सीपीएमचे महासचिव कोडियेरी बालकृष्णन यांनी सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yogi adityanath gets cpm invite visit kerala hospitals to learn how to run them effectively
First published on: 04-10-2017 at 18:55 IST