नवी दिल्ली : पुढील महिन्यात येणाऱ्या अक्षय्य तृतीया आणि रमजान ईद या सणांच्या दिवशी ध्वनिक्षेपकांचा आवाज वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नियमावली लागू करण्याचे निर्देश दिले. धार्मिक कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली असली तरी ध्वनिक्षेपकांचा आवाज धार्मिक स्थळांच्या आवारातच मर्यादित असला पाहिजे. आवाराबाहेर आवाज जाता कामा नये आणि त्याचा त्रास इतरांना होता कामा नये, असे योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी सांगितले. अधिकाऱ्यांनी कायदा व सुव्यवस्थेशी कोणतीही तडजोड करू नये, असा स्पष्ट इशारा योगी आदित्यनाथ यांनी दिला. प्रत्येकाला आपल्या धार्मिक परंपरेनुसार धार्मिक कार्यक्रम, उत्सव साजरा करण्याचा अधिकार आहे. मात्र त्यासाठी कोणीही कायदा हातात घेऊ नये. ध्वनिक्षेपक वापरण्यास परवानगी आहे. मात्र त्यामुळे होणाऱ्या आवाजाचा त्रास इतरांना झाला नाही पाहिजे. ज्या कार्यक्रमांना आधी परवानगी दिली आहे, त्यांनीच ध्वनिक्षेपकाचा वापर करावा. नव्या कार्यक्रमांना परवानगी दिली जाणार नाही. परवानगीशिवाय ध्वनिक्षेपकाचा वापर करण्यास बंदी असून आता नव्याने कुणालाच परवानगी मिळणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.

‘परवानगीशिवाय मिरवणूक नको’

परवानगीशिवाय धार्मिक मिरवणूक काढू नये आणि परवानगी केवळ पारंपरिक कार्यक्रमांनाच द्यावी. कोणतीही नवीन परंपरा सुरू करू नये, असे योगी म्हणाले. उन्माद करणाऱ्या आणि अफवा पसरवणाऱ्या प्रत्येकावर कारवाई झाली पाहिजे, असेही योगी यांनी सांगितले.