उत्तर प्रदेशातील गरीब मुस्लिमांना आपल्या मुलींच्या लग्नाचा खर्च परवडत नाही अशांसाठी योगी आदित्यनाथ सरकार सामूदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणार आहेत. उत्तर प्रदेशमध्ये मुस्लिमांची संख्या लक्षणीय आहे. या समाजातील मुलींच्या विवाहासाठी उत्तर प्रदेश सरकार सामूदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणार असून प्रत्येक मुलीला २०,००० रुपये देखील दिले जाणार असल्याचे अल्पसंख्याक कल्याण मंत्री मोहसीन रजा यांनी म्हटले. मुस्लिमांबरोबरच शीख, ख्रिश्चन या धर्मातील मुलींना देखील लग्नासाठी सहकार्य केले जाईल असे त्यांनी सांगितले. लग्नाचा खर्च लाखोंच्या घरात जातो त्यामुळे अनेकांवर कर्जबाजारी होण्याची वेळ येते. जर तुम्ही विवाहासाठी नोंदणी केली तर सर्व खर्च सरकारतर्फे उचलला जाईल तसेच मुलींना २० हजार रुपये देखील मिळतील असे रजा यांनी सांगितले.
याआधी, उत्तर प्रदेशात खासगी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये जातीवर आधारित आरक्षण लागू होणार नाही असा निर्णय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतला आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गांना खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आरक्षण लागू होणार नाही असा निर्णय उत्तर प्रदेश सरकारने घेतला आहे. अखिलेश यादव यांच्या काळातच हे आरक्षण संपुष्टात आणावे याची औपचारिकता पूर्ण करण्यात आली होती. योगी आदित्यनाथ यांच्या प्रशासनाने या निर्णयाला अंतिम मान्यता देऊन अंमलबजावणी केली आहे. खासगी महाविद्यालयामध्ये आरक्षण असल्याचा फायदा समाजाला होत नसून तो संस्था चालकांना होतो. त्यामुळे भ्रष्टाचार करणाऱ्यांना संधी मिळते. हे ओळखूनच उत्तर प्रदेश सरकारने खासगी महाविद्यालयामध्ये आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
योगी आदित्यनाथ यांचे सरकार उत्तर प्रदेशात आल्यापासून अनेक योजनांबाबत निर्णय घेतले गेले आहेत. शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्याचा त्यांचा निर्णय सर्वाधिक लोकप्रिय ठरला आहे. मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत योगी आदित्यनाथांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी तब्बल ३६ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. १ लाख रुपयांपर्यंत कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात येईल असे त्यांनी म्हटले.