Extramarital Affair: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या पुरुषाचा अटकपूर्व जामीन रद्द करण्याची मागणी करणाऱ्या एका विवाहित महिलेला सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी निकाल देताना इशारा दिला की, लग्न झालेले असतानाही पतीशिवाय दुसऱ्या पुरुषाशी शारीरिक संबंध ठेवल्याच्या आरोपाखाली तिच्यावरही खटला चालवला जाऊ शकतो.

जेव्हा महिलेच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की, आरोपीने लग्नाचे खोटे आश्वासन देऊन त्यांच्या अशिलाशी लैंगिक संबंध ठेवले होते, तेव्हा न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश आणि एन. कोटीश्वर सिंह यांच्या खंडपीठाने म्हटले, “तुम्ही एक विवाहित महिला आहात, तुम्हाला दोन मुले आहेत. तुम्ही एक प्रौढ व्यक्ती आहात आणि या सर्व गोष्टी माहिती असूनही तुम्ही विवाहबाह्य संबंध ठेवले.”

जेव्हा वकिलांनी पुढे सांगितले की, आरोपीने लग्नाच्या बहाण्याने त्यांच्या अशिलाला लैंगिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी हॉटेल्स आणि रेस्ट हाऊसांमध्ये अनेकदा बोलावले होते, तेव्हा खंडपीठाने विचारले, “तुम्ही त्याच्या इशाऱ्यावर वारंवार हॉटेल्समध्ये का गेलात? तुम्हाला हे माहिती असेलच की, विवाहित असूनही पतीशिवाय दुसऱ्या व्यक्तीशी लैंगिक संबंध ठेवून तुम्हीही गुन्हा केला आहे.”

अंकित बर्नवाल यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्याचा पाटणा उच्च न्यायालयाचा निर्णय योग्य असल्याचे खंडपीठाने म्हटले आणि महिलेची याचिका फेटाळून लावली. या महिलेने बर्नवाल यांच्याविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल केल्यानंतर, त्यांना अटकपूर्व जामीन देण्यास कनिष्ठ न्यायालयाने नकार दिला होता.

विवाहित महिला आणि बर्नवाल यांची २०१६ मध्ये सोशल मीडियाद्वारे ओळख झाली. त्यानंतर या ओळखीचे रुपांतर नातेसंबंधात झाले. महिलेने आरोप केला होता की, बर्नवाल यांच्या सांगण्यावरून आणि दबावामुळे तिने तिच्या पतीपासून घटस्फोट मागितला होता, जो ६ मार्च रोजी कौटुंबिक न्यायालयाने मंजूर केला आहे.

घटस्फोट घेतल्यानंतर या महिलेने पंधरा दिवसांतच बर्नवाल यांच्याकडे लग्नासाठी तगादा लावला, पण याला बर्नवाल यांनी नकार दिला. त्यानंतर तिने बिहार पोलिसांकडे तक्रार दाखल केली आणि लग्नाचे खोटे आश्वासन देऊन त्याने लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर बर्नवाल यांनी तिच्यासोबत कोणतेही लैंगिक संबंध ठेवले नसल्याचे रेकॉर्डवरून आढळून आल्यामुळे पाटणा उच्च न्यायालयाने बर्नवाल यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला होता.