पॅरिसमधील एका फ्रेंच व्यंगचित्र साप्ताहिकाच्या कार्यालयावर हल्ला चढवून १२ जणांना ठार मारणाऱ्या हल्लेखोरांपैकी एकजण शरण आला असून, अल-कायदा संघटनेशी संबंधित असल्याची शंका असणाऱ्या दोन सशस्त्र इसमांचा पोलीस शोध घेत आहेत.
सशस्त्र हल्लेखोरांनी ‘शार्ली हेब्दो’ या व्यंगचित्र साप्ताहिकाच्या कार्यालयात शिरून केलेल्या अंदाधुंद गोळीबारात ८ पत्रकार, २ पोलीस अधिकारी, एक सफाई कामगार आणि एक नागरिक असे १२ जण मरण पावले, तर गंभीर जखमी झालेल्या चौघांसह ११ जण जखमी झाले होते. हल्लेखोरांपैकी मुराद हमीद (१८) नावाच्या तरुणाने पूर्व फ्रान्समधील एका पोलीस ठाण्यात शरणागती पत्करली. दहशतवाद्यांना मदत केल्याच्या आरोपाखाली २००८ साली त्याला दीड वर्षांचा तुरुंगवास ठोठावण्यात आला होता.
वयाच्या तिशीत असलेले सईद आणि शेरीफ कौआची हे दोन फ्रेंच भाऊ गुरुवारी सकाळी उत्तर फ्रान्समध्ये आढळून आले. वरील हल्ला घडवून आणणारे हे दोघे सशस्त्र असून त्यांना ‘धोकादायक’ मानले जावे, असे पोलीस वार्तापत्रात म्हटले आहे. शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेले पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान, नियतकालिकांच्या कार्यालयांचे संरक्षण करण्यासाठी ८०० अतिरिक्त सैनिक तैनात करण्यात आले आहेत.
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकॉइस होलांदे यांनी गेल्या ५० वर्षांतील या सर्वात भीषण दहशतवादी हल्ल्याच्या स्थळाला भेट दिल्यानंतर चार्ली हेब्डोवरील हल्ल्याचे वर्णन ‘अत्यंत अमानवीपणाचे कृत्य’ असे केले. युरोपियन युनियनच्या २८ सदस्य देशांनी गुरुवारी त्यांचे ध्वज अध्र्यावर उतरवून, तसेच मिनिटभराचे मौन पाळून इस्लामी हल्ल्यात मरण पावलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहिली. ब्रुसेल्स येथील युरोपियन युनियनच्या इमारतीवरील पिवळे तारे असलेला संघटनेचा निळ्या रंगाचा ध्वजही अध्र्यावर उतरवण्यात आला आहे.
दरम्यान, साप्ताहिकावरील हल्ल्यानंतर फ्रान्सच्या दोन शहरांमधील मुस्लीम प्रार्थनास्थळे संतप्त नागरिकांच्या संतापाचे लक्ष्य ठरली. पॅरिसच्या पश्चिमेकडील ली मान्स येथील मशिदीवर मध्यरात्री तीन ग्रेनेड्स फेकण्यात आले, तर दक्षिण फ्रान्समधील पोर्ट-ला-नुवेले येथे सायंकाळच्या प्रार्थनेनंतर एका सभागृहाच्या दिशेने गोळीबार करण्यात आला. या दोन्ही घटनांमध्ये कुठलीही हानी झाली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुरुवारच्या गोळीबारात २ गंभीर जखमी
पॅरिस शहराबाहेर एका इसमाने स्वयंचलित रायफलने केलेल्या गोळीबारात एक महिला पोलीस आणि एक कर्मचारी गंभीररीत्या जखमी झाले. मात्र दोन दिवसांपूर्वी एका व्यंगचित्र साप्ताहिकाच्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्याशी या घटनेचा संबंध अद्याप सिद्ध झालेला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. फ्रान्सचे अंतर्गत मंत्री बर्नार्ड कॅझेन्यु यांनी पॅरिस शहराच्या दक्षिणेला असलेल्या मॅलॅकॉफ या घटनास्थळाला भेट दिली. गोळीबार करणारा अद्याप फरार असल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेतील दोन जखमी गंभीर असल्याचे पोलिसांनी आधी सांगितले, मात्र फक्त महिला पोलीस मृत्यूशी झुंज देत असल्याचे कॅझेन्यु म्हणाले. पॅरिसमधील ‘शार्ली हेब्दो’ या व्यंगचित्र साप्ताहिकाच्या कार्यालयावर इस्लामी दहशतवाद्यांनी हल्ला करून १२ जणांचा बळी घेतल्याच्या घटनेबाबत सारा देश शोक पाळत असतानाच आजची घटना घडली. फ्रान्सला हादरवून टाकणाऱ्या परवाच्या नरसंहराची अद्याप कुणीही जबाबदारी घेतलेली नाही.

फ्रान्सचे अध्यक्ष फ्रँकस होलाँदे, गृहमंत्री बर्नार्ड कॅझेनेव्ह्य़ू यांनी पॅरिस येथील व्यंगचित्र नियतकालिकाच्या कार्यालयाची पहाणी केली. त्यावेळी शहराचे पोलीस प्रमुख जॅक्वेस मेरीक यांनी त्यांना हल्ल्याविषयी तपशीलवार माहिती दिली. होलाँदे यांनी या हल्ल्याची ‘अमानुष हल्ला’ अशा शब्दांत निंदा केली असून हा देशावरील अतिरेकी हल्लाच असल्याचे नमूद केले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Youngest of 3 suspects in paris attack surrenders to police
First published on: 09-01-2015 at 01:25 IST