खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची भाजपवर टीका

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी दिल्ली : देशातील तरुणांना धर्मांधता, बेरोजगारी आणि द्वेषमूलक भाषणांचे विष पाजले जात असून त्यांना ‘आयडिया ऑफ इंडिया’चे (सामाजिक ऐक्य) अमृत दिले पाहिजे. ही जबाबदारी केंद्र सरकारप्रमाणे राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी, देशवासीयांची असल्याचे विचार मांडत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी भाजपच्या धर्माधिष्ठित राजकारणावर टीका केली.

राष्ट्रपतींनी अभिभाषणात ‘अमृत महोत्सव’चा उल्लेख केला, तर अर्थसंकल्पात ‘अमृत काळ’ असा शब्दप्रयोग झाला. समुद्रमंथनातून अमृत मिळत असले तरी त्या आधी होणाऱ्या ‘घुसळणी’कडे दृर्लक्ष करता येणार नाही. धार्मिक अभिमानाचे रूपांतर धार्मिक उन्मादामध्ये झाले तर देशाच्या एकजुटीला धोका निर्माण होतो. ‘आयआयएम’मधील विद्यार्थी-शिक्षकांनी पंतप्रधानांना पत्र लिहून देशातील सामाजिक स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. मध्य प्रदेशमध्ये विदिशा जिल्ह्यात धार्मिक मुद्द्यांवरून शाळेवर हल्ला होत असेल, तर देश कुठल्या मानसिकतेतून जात आहे, याचा विचार केला पाहिजे. तरुणांच्या हाती दगड आहेत, पण त्यांचा उपयोग रचनात्मक निर्मितीसाठी करायचा असतो हे तरुणांना सांगितले पाहिजे, असे मत कोल्हे यांनी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत व्यक्त केले.

व्यक्तिस्वातंत्र्य नसेल तर लोकशाही टिकणार नाही, असे २०१४ मध्ये मोदी म्हणाले होते. पण, जागतिक माध्यम स्वातंत्र्य निर्देशांकामध्ये १८० देशांच्या यादीत भारत १४२ व्या क्रमांकावर आहे. २०२० मध्ये ६७ पत्रकारांना अटक झाली, २०० पत्रकारांवर हल्ले झाले. अनेक पत्रकारांच्या नोकऱ्या गेल्या. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला निष्पक्षपणे पत्रकारिता करण्याचे स्वातंत्र्य राहिले आहे का, असा प्रश्न कोल्हे यांनी उपस्थित केला.

करोनाच्या आपत्तीला सामोरे गेल्यानंतर आता ‘आरोग्य’ हा मूलभत अधिकार झाला पाहिजे. साडेसहा कोटी लोक गरिबीत ढकलले गेले आहेत. ५४ टक्के लोकांचे उत्पन्न कमी झाले आहे. ६० लाख छोटे उद्योग बंद झाले आहेत. दरवर्षी २ कोटी रोजगार देण्याचे आश्वासन केंद्राने दिले होते, पण देशात ५ कोटी तरुण बेरोजगार आहेत. शहरी भागांत ‘मनरेगा’चा विस्तार केला पाहिजे. ‘डिजिटल’ भेदभावामुळे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिले आहेत, असे वास्तव कोल्हे यांनी मांडले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Youth of the country unemployment hateful social cohesion ncp mp amol kolhe akp
First published on: 04-02-2022 at 00:22 IST