Jyoti Malhotra : पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाप्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला काही दिवसांपूर्वी हरियाणामधून अटक करण्यात आली होती. तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून ती पाकिस्तानच्या गुप्तचर अधिकाऱ्यांच्या संपर्कात होती असा आरोप करण्यात आला आहे. ज्योती मल्होत्रा आतापर्यंत दोन वेळा पाकिस्तानमध्ये जाऊन आल्याचं सांगितलं जातं.
ज्योती मल्होत्राने भारतातील संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा आरोप तिच्यावर आहे.आता पोलीस तिची चौकशी करत असून दररोज अनेक खुलासे समोर येत आहेत. पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या ज्योती मल्होत्राला सोमवारी हरियाणाच्या हिसार न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
ज्योती मल्होत्राला अटक करण्यात आलं होतं, तेव्हा तिला पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती. त्यानंतर २२ मे रोजी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आलं असता न्यायालयाने पुढील चौकशीसाठी अतिरिक्त चार दिवसांची कोठडी दिली होती. त्यानंतर चार दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर तिला पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं. यावेळी न्यायालयाने ज्योती मल्होत्राला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
हिसार पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ज्योतीकडे कोणत्याही संवेदनशील लष्करी किंवा संरक्षणाशी संबंधित माहिती असल्याचे कोणतेही पुरावे समोर आलेले नाहीत. मात्र, ती पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तींच्या संपर्कात असल्याचं वृत्त आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ज्योती मल्होत्रा २०२३ पासून पाकिस्तानी उच्चायोगातील दानिश या व्यक्तीच्या ती संपर्कात होती.
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानला माहिती कशी पुरवायची?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी गुप्तचर संस्थेमधील अधिकाऱ्यांच्या संपर्कात होती आणि व्हॉट्सॲप, टेलिग्राम आणि स्नॅपचॅट सारख्या ॲप्सचा वापर करून ती भारतातील संवेदनशील माहिती पुरवत होती. पाकिस्तानचे गुप्तचर विभागातील अधिकारी शाकीर आणि राणा शाहबाज यांचाही फोन नंबर ज्योतीच्या मोबाइलमध्ये सेव्ह असल्याचे दिसून आलं.
ज्योती मल्होत्रासह दिसलेला पाकिस्तानी अधिकारी दानिश कोण?
२०२३ मध्ये ज्योती पाकिस्तानला गेली होती. त्यावेळी व्हिसासाठी ती दिल्ली येथील पाकिस्तानी उच्चायुक्त कार्यालयात पोहचली होती. तिची ओळख तेथील दानिशशी म्हणजेच एहसान-उर-रहीम आलियास याच्याशी झाली होती. या दोघांमध्ये जवळीक झाली. दानिशच्या मदतीने ती पाकिस्तानात पोहचली. तिथे ती पाकिस्तानातील गुप्तहेरांच्या संपर्कात आली. दुसऱ्या यात्रेदरम्यान ती पाकिस्तानातील अली अहसान आणि शाकिर उर्फ राणा शहबाज सारख्या एजंटांच्या संपर्कात आल्याचे तपास यंत्रणांच्या चौकशीत समोर आले. ती या एजंटशी विविध सोशल अकाऊंटवरून संपर्कात असल्याचे उघड झाले आहे.