Yuzvendra Chahal Instagram Story on Dhanashree Verma Alimony : भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल व डान्स कोरिओग्राफर धनश्री वर्मा हे दोघे घटस्फोटानंतरही जुन्या वैवाहिक वादांमुळे चर्चेत असतात. धनश्री वेगवेगळ्या ठिकाणी वैवाहिक जीवनातील घटनांचा उल्लेख करते, तर चहल अधून मधून त्यावर समाजमाध्यांवरून अप्रत्यक्ष टीका करत असतो. त्यामुळे दोघेही सतत चर्चेत असतात.
दरम्यान, चहलने उच्च न्यायालयाच्या एका निर्णयाची स्टोरी इन्स्टाग्रामवर पोस्ट केली होती. या स्टोरीसह त्याने जे कॅप्शन लिहिलं होतं त्यामुळे चहल व धनश्री हे दोघे चर्चेत आले आहेत. अनेक जण चहलच्या स्टोरीचा त्याची पूर्वाश्रमीची पत्नी धनश्री वर्मा हिला मिळणाऱ्या कथित चार कोटी रुपयांच्या पोटगीशी संबंध जोडू पाहतायत. अनेकांचं म्हणणं आहे की या स्टोरीतून चहलने धनश्रीला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
युजवेंद्र चहलने न्यायालयाच्या एका निर्णयाचा स्क्रीनशॉट शेअर केला होता, ज्यामध्ये म्हटलं होतं की “आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र पत्नी तिच्या पत्नीकडून पोटगी मागू शकत नाही.”
चहलने ही स्टोरी शेअर करत म्हटलं आहे की “आईची शपथ घेऊन सांगा की तुम्ही तुमचा हा निर्णय बदलणार नाही.” त्यानंतर काही वेळाने चहलने ही पोस्ट डिलीट केली. तत्पूर्वी या स्टोरीचा देखील स्क्रीनशॉट व्हायरल झाला होता. अनेकांचं म्हणणं आहे की या पोस्टद्वारे चहलने त्याची पूर्वाश्रमीची पत्नी धनश्री वर्मा हिला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
धनश्रीला पोटगी म्हणून किती रुपये मिळाले?
धनश्री व युजवेंद्रने याच वर्षी अधिकृतरित्या घटस्फोट घेतला आहे. त्यावेळी बातमी समोर आली होती की युजवेंद्रने धनश्रीला ४ ते ५ कोटी रुपयांची पोटगी दिली आहे. मात्र, धनश्रीने चहलकडून नेमके किती रुपये घेतले याबाबत दोघांपैकी कोणीही आतापर्यंत अधिकृतरित्या रक्कम सांगितलेली नाही.
दरम्यान, चहलची इन्स्टा स्टोरी व धनश्रीला मिळालेली पोटगीची कथित रक्कम हे दोन विषय जोडून अनेकांनी समाजमाध्यमांवर गमतीदार मिम्स शेअर केले आहेत. काहींच्या मते ही स्टोरी म्हणजे चहलची ‘सॅव्हेज मूव्ह’ आहे. तर, काहींनी चहलला सल्ला दिला आहे की “तू आता ती गोष्ट (धनश्री वर्मा व घटस्फोट) मागे ठेवून पुढे जायला हवं. स्वतःच्या खेळावर मेहनत घ्यायला हवी.”
