कोणत्याही समाजाच्या सांस्कृतिक धारणा या मुळातच काही विशिष्ट तत्त्वांच्या धाग्यांनी विणल्या गेलेल्या असतात. या धारणा त्या-त्या संस्कृती किंवा व्यवस्थेला विशिष्ट सामूहिक ओळख मिळवून देण्याचे काम करतात, हे या धारणांची चिकित्सा करताना सहजगत्या प्रत्ययास येते. ख्रिस्तोफ ब्रौमान हे मानववंशशास्त्रज्ञ म्हणतात त्यानुसार, ‘संस्कृती व समाजाविषयीच्या रूढ समजुती या नेहमीच एकजीव, परस्परपूरक, अपरिवर्तनीय मानल्या गेलेल्या काही गृहीतकांवर आधारलेल्या असतात. मात्र, सामाजिक वास्तव सामाजिक संरचनांच्या गती व प्रवाहांचे असातत्य, संघर्ष, परिवर्तन व व्यक्तिकेंद्रिततेवर बेतलेले असते.’

ब्रौमान यांच्या मतावर विचार करता असे लक्षात येते, की विशिष्ट एकसाचेबद्ध गृहीतकांवर आधारलेल्या धारणांतूनच संबंधित समाज आपली सामूहिक-सांस्कृतिक ओळख बनवू पाहातो आणि पुढे जाऊन या विशिष्ट धारणांशी निबद्ध अशी चौकट तयार होण्याच्या प्रक्रियेचे रुपांतर आयडेंटिटी-पॉलिटिक्समध्ये होते. त्या त्या काळातील साहित्यव्यवहारात किंवा लोकव्यवहारात वापरल्या गेलेल्या संज्ञा किंवा कल्पनांचे आकलन आणि विवेचन वर्तमानकाळातील समाज किंवा राजकीय व्यवस्था कशाप्रकारे करते आणि त्या कल्पनांचे विशिष्ट प्रकारे अध्यारोपण होऊन त्या त्या काळातील सामूहिक धारणा आणि स्मृती कशा विकसित होतात, याचा आढावा आपण पुढील काही लेखांत घेणार आहोत. धारणांच्या या अशा अनेक धाग्यांपैकी काही प्रमुख व महत्त्वपूर्ण धागे उलगडताना, आणि आजच्या समाजातील सामूहिक धारणांची जडणघडण तपासताना आजच्या भारतातील व दक्षिण आशियायी भूभागातील लोकांच्या स्वत:विषयीच्या भौगोलिक-सामूहिक-सांस्कृतिक धारणांच्या विकसनाची उकल सर्वात आधी व्हायला हवी.

अगदी लहानपणी कळू लागतं तेव्हापासून सामान्य ज्ञान व निरीक्षण असलेल्या व्यक्तीने ‘भारतवर्ष’ हा शब्द अनेकदा ऐकलेला-वाचलेला असतो. टीव्हीवरील पौराणिक मालिका असोत किंवा कुणा राष्ट्रीय नेत्याचे भाषण असो, ‘भारतवर्ष’ हा शब्द अजूनही प्रचारात आहे. स्वातंत्र्योत्तर काळात- १९४७ नंतर- समाजाच्या सामूहिक आयडेंटिटीला फाळणी व द्विराष्ट्रवादाचे मापदंड लाभले असले तरीही दक्षिण आशियायी भूभागाची ‘भारतीय उपखंड’ अशी ओळख टिकून आहे. या पाश्र्वभूमीवर, आज २०१८ या वर्षांत प्रवेश करताना ‘भारतवर्ष’ या शब्दाविषयीचे आकलन व त्याविषयीचे सांस्कृतिक मापदंड कसे बदलत गेले आणि हा शब्द कसा वापरला जातो याविषयीची चर्चा पुढील काही भागांत आपण करणार आहोत. ही चर्चा करताना आपल्या आजच्या राष्ट्रविषयक धारणा आणि संवेदनांचा विचार तर आपण करणार आहोतच, पण आपल्या पूर्वजांच्या या संकल्पनांविषयीच्या धारणा नेमक्या काय होत्या? त्यांचे विकसन कसे होत गेले? प्राचीन व मध्ययुगीन काळात ‘आपण आणि ते’, ‘आपला आणि परका’ अशा धारणा होत्या का? जर असल्याच तर कशा होत्या? असे उपप्रश्न-उपविषयदेखील आपण हाताळणार आहोत. विविध काळात विविध हेतूंमुळे या भूभागात वास्तव्यासाठी आलेल्या, राहत असलेल्या जनसमूहांच्या धारणा या आधुनिक काळातील राष्ट्रवाद, देशी अस्मिता व अन्य पुनरुज्जीवनवादी विचारांशी जोडल्या गेल्यामुळे या विषयाकडे पाहणे आज अतिशय अगत्याचे झाले आहे. इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावर ‘भारतवर्ष’ आणि ‘भारतराष्ट्र’ या संकल्पनांविषयीच्या धारणा कशा बदलत गेल्या हे एका लेखात पाहणे जागेच्या मर्यादांमुळे शक्य नसले, तरीही १९ व्या शतकातील ऐतिहासिक विषयांवरील लेखनाद्वारे भारतवर्ष व आपल्या सामूहिक ओळखींविषयीचे विविध मापदंड व सामूहिक ओळख कशी बनत गेली हे आपण क्रमश: पाहू या.

भारताच्या प्राचीन इतिहासाकडे पाहिले असता ऋग्वेदामध्ये भारतवर्ष किंवा भारत ही संज्ञा अगदी भौगोलिक संदर्भातदेखील विशिष्ट प्रदेशाला उद्देशून वापरली गेली आहे असं दिसत नाही. ‘भरत’ नामक एका समूहाचा उल्लेख ऋग्वेदात येत असला, तरी त्या समूहाशी निबद्ध असलेल्या कोणत्याही एका विशिष्ट भूभागाचा निर्देश ऋग्वेदात दिसत नाही. कर्मकांडाचे विवेचन करणाऱ्या ब्राह्मणग्रंथांमध्ये उत्तरकुरू, उत्तरमद्र, सात्वंत, कुरु-पांचाल, इत्यादी समूह व त्यांचे राजे अमुक दिशांना वास्तव्य करतात असे संदर्भ दिसतात. विशिष्ट समूहाद्वारे शासित होत असलेले जनपद/राज्य अथवा विशिष्ट भूभाग ज्या दिशांना वसलेला आहे त्या दिशांचा उल्लेख ऐतरेय, शतपथादिक ब्राह्मणांमध्ये दिसून येतो. प्राचीन बौद्ध साहित्यामध्येदेखील विविध जनपदे/समूहशासित राज्ये जंबुद्वीपाच्या कोणत्या भागात वसलेली आहेत याचा निर्देश आहे. बौद्ध तत्त्वज्ञानानुसार पृथ्वीवरील चार महाद्वीपकल्पांपैकी सर्वात मोठे असलेले जंबुद्वीप हा असा एकमेव भाग आहे, जिथे अनेक बुद्ध (ज्ञानी) आणि चक्रवर्ती सम्राट जन्माला येतात. मात्र, तरीही बौद्ध साधनांकडे काळजीपूर्वक पाहिले असता प्रत्येक क्षितिजावर (‘चक्रवाल’ असा मूळ शब्द) एक जंबुद्वीप आहे असे अंगुत्तरनिकायादि बौद्ध साधने सांगतात. या काहीशा संदिग्ध व गूढ मांडणीमुळे जंबुद्वीपाविषयीच्या प्राचीन बौद्धांच्या कल्पना नेमक्या कशा होत्या याचा अंदाज येणे काहीसे कठीण होऊन बसते. पुढे अशोकाच्या शिलालेखांकडे पाहिल्यास आजच्या अफगाणिस्तानापासून दख्खनच्या पठारापर्यंतचा भाग जम्बुद्वीप असल्याचे सांगण्यात येते. कलिंगदेशाचा राजा खारवेल याच्या शिलालेखातदेखील तो आपल्या देशातून भारतवर्ष जिंकण्यासाठी बाहेर पडला असा संदर्भ मिळतो. (भारतवर्ष- आर्यावर्त – हिंदुस्थानचे दक्षिण भारतीय राज्यांपासून भौगोलिक वेगळेपण व स्वतंत्र आयडेंटिटी दाखवणारे संदर्भ पुढील इतिहासात पेशवाईनंतरच्या १८५७ च्या बंडावेळच्या साधनांमध्येही दिसून येतात. पाहा : विष्णुभटजी गोडसे लिखित ‘माझा प्रवास’ ) थोडं पुढच्या काळामध्ये डोकावून पाहिलं, तर पुराणेदेखील भारतवर्षांची परस्परसुसंगत व्याख्या देताना दिसत नाहीत. विष्णुपुराणातील प्रसिद्ध व्याख्येनुसार-

‘उत्तरं यत्समुद्रस्य हिमाद्रेश्र्चैव दक्षिणम्।

र्वष तद्भारतं नाम भारती यत्र सन्तति:।।’

(अर्थ: समुद्राच्या उत्तरेला व हिमालयाच्या दक्षिणेला असलेला भूभाग हा भारतवर्ष म्हणून ओळखला जातो.)

याच पुराणात कथन केल्याप्रमाणे, ‘भारतवर्षांच्या पूर्वेला किरातांचे राज्य आहे, पश्चिमेला यवनांचे राज्य आहे, तर मध्यभागात ब्राह्मण-क्षत्रिय-वैश्य आणि शूद्र आपापली वर्णविहित कर्तव्ये पार पाडीत जगत असतात.’ तर वायुपुराणात म्हटलं आहे –

‘तैरिदं भारतं र्वष नवभागैरलंकृतम्।

तेषां वंशप्रसूतैश्चभुक्तेयं भारती पुरा।।’

(अर्थ: हे भारतवर्ष नऊ वेगळ्या भागांनी अलंकृत असे आहे आणि या नऊ भागांतल्या वंशात जन्मलेल्या प्रजेने पूर्वी येथे (आनंद/सौख्य) उपभोगले.)

अभिजात संस्कृत साहित्यामध्ये विविध दिशांमध्ये वसलेली जनपदे आणि तेथील राजवंश इत्यादींचे भारतवर्षांमधील स्थान यांचा तपशील पाहता प्राचीन भारतीय उपखंडाच्या प्राचीन इतिहासामध्ये तीन वेगळे कालखंड दिसतात. ऋग्वेद व पूर्ववैदिक साहित्यामध्ये जन-जनपदे यांच्या अनुषंगाने विशिष्ट भौगोलिक प्रदेशांविषयीचे निर्देश मिळतात. ब्राह्मण-ग्रंथांमध्ये ‘दिश्’ (दिशा) या तत्त्वाच्या आधारे वेगवेगळ्या देशांचे-भूप्रदेशांचे उल्लेख आढळतात. देश हा शब्द ‘दिश्’वरूनच बनला आहे हे यातून दिसून येतं. ‘विशिष्ट दिशेला वसलेला भूभाग तो अमुक देश’ अशा पद्धतीने ‘देश’ या संकल्पनेचे आदिम रूप आपल्याला तेथे दिसून येते. (आणि त्या शब्दामागील मूळ कल्पनेत कोणताही विशिष्ट वंश-समूह अध्याहृत धरलेला नाही, हेही लक्षात घ्यायला हवं). स्मृती, पौराणिक ग्रंथ व आर्ष महाकाव्यांतील अनेक संदर्भानुसार आज आपण ज्याला भारत देश म्हणतो त्या भूभागातील अनेक प्रदेश हे भद्र-सभ्य-आर्य वगैरे विशेषणांनी युक्त असलेल्या अभिजन-प्रतिष्ठित लोकांना राहण्यास/प्रवेश करण्यास निषिद्ध मानले गेले आहेत. ‘मनुस्मृती’सारख्या स्मृतीमध्ये किंवा अन्य स्मृतींमध्ये मध्यदेश (म्हणजे आजचा मध्यभारत) आणि पाकिस्तानातील पूर्व आणि उत्तरभागातील राज्ये यांना ‘आर्यावर्त’ अशी संज्ञा दिलेली दिसते.

त्या त्या विशिष्ट काळातील धारणांचे मापदंड आणि रूढ अर्थ बदलले, की संबंधित कल्पनादेखील पूर्णत: वेगळे व टोकाची विसंगती दाखविणारे अर्थ धारण करतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे विशिष्ट धर्माभिमानाने भारत देशाला उद्देशून वापरले जाणारे ‘हिंदुस्थान’ हे नाव. सप्तसिंधुंचा प्रदेश असलेल्या सिंधू-स्थानाला फारसी भाषेच्या प्रभावातून (‘स’ या वर्णाचा उच्चार फारसी भाषेत ‘ह’कारामध्ये परिवर्तित होतो) हिंदू-स्थान असे नाव मिळाले हेदेखील आपण जाणतो. आजचे सिंधू नदीचे खोरे हे फाळणीनंतर पाकिस्तानात गेल्याने हिंदुस्थान हे नाव व मूळ कल्पना आपल्या आजच्या राष्ट्रीय धारणा आणि अस्मितांशी किती टोकाची विसंगती दाखवते व त्यावरून निर्माण झालेल्या अस्मितांचे औचित्यानौचित्य किती काळजीपूर्वक तपासले गेले पाहिजे, याची जाणीव आपल्याला होते.

प्राचीन व मध्ययुगीन काळात ‘राष्ट्र-राज्य’ कल्पना आजच्यासारखी एककेंद्री व संघटित नसल्याने त्या-त्या जनपदात व राज्यांत राहणाऱ्या लोकांची तत्कालीन ओळख ही कोसल, मगध, गांधारादि जनपदांशीच जोडली गेली होती. त्यामध्ये आर्यावर्त किंवा भारतवर्ष अशी एकछत्री सामूहिक ओळख किंवा त्याविषयीचा आग्रह प्राचीन वा मध्ययुगीन इतिहासांत दिसून येत नाही. मन्वादिक स्मृतींमध्ये, अभिजात साहित्यांत व महाकाव्यांमध्ये आर्यावर्ताच्या भोवती असलेल्या चीन, यवन, हूण, शक, पहलव, इत्यादी जमातींचा उल्लेख येतो. अनेकदा हा नामोल्लेख त्या समूहांच्या प्रादेशिक उगमानुसार केलेला दिसतो, तर कधी त्यांनी धारण केलेल्या किंवा त्यांना मिळालेल्या सामूहिक संबोधनानुसार झालेला दिसतो. या विविध व्याख्या-उपव्याख्या आणि ऐतिहासिक व आधुनिक धारणांमधील विसंगती पाहता स्वतंत्र भारत गणराज्याने स्वीकारलेल्या संविधानात ‘India, that is Bharat, shall be a union of states…’ अशा शब्दात मांडलेली सोपी-सहज आणि समावेशक व्याख्या व तिचे औचित्य अधोरेखित होते.

जागेच्या मर्यादेमुळे भारतवर्ष किंवा आर्यावर्त आदी कल्पनांविषयी अधिक सखोल चर्चा एका लेखात करता येणे शक्य नसल्याने पुढच्या काही भागांत आज चर्चा केलेल्या संकल्पनांना काही पुरवण्या जोडून हा विषय क्रमश: विस्तारत जाणार आहोत. आधुनिक काळातील राष्ट्र-राज्य कल्पना आणि वर्तमान युगातील धारणांचे धागे उलगडण्यासाठी उपरोल्लेखित समूहांविषयीचे प्राचीन ग्रंथांतील मूळ संदर्भ, त्या शब्दांना आज मिळालेले नवे अर्थ आणि परिमाणे, उपखंडामधील जनसमूहांचे मूळ, एतद्देशीयत्व-परकीयत्व, स्वकीय-परकीय या कल्पनांविषयीच्या ऐतिहासिक धारणा, तद्नुषंगिक ‘आयडेंटिटीज्’, त्यांचे तत्कालीन राजकारण, धर्मकारण, समाजकारण यांकडे पाहणे गरजेचे आहे. त्याचाच भाग म्हणून यवन, म्लेंच्छ, स्वदेश, विदेश, सीमा (borders), परकीय आक्रमणे अशा कळीच्या मुद्दय़ांना हात घालत त्यांच्या ऐतिहासिक चिकित्सेतून आपल्या आजच्या धारणा तपासायचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे.

हेमंत प्रकाश राजोपाध्ये

rajopadhyehemant@gmail.com

(लेखक जर्मनीतील ग्योटिंगेन विद्यापीठात पीएच. डी. संशोधक असून, ऑब्झव्‍‌र्हर रीसर्च फाऊंडेशन, मुंबई येथे वरिष्ठ संशोधक म्हणून कार्यरत आहेत.)