ऑक्टोबरचा दुसरा आठवडा संपत आला तरी मुंबईतील पावसाच्या परतीचा प्रवास संपण्याच्या मार्गावर नसल्याने त्याचा फटका रंगीबेरंगी झिरमिळ्यांचे आकर्षक व पारंपरिक आकाशकंदील बनवणाऱ्या माहीमच्या प्रसिद्ध ‘कंदील गल्ली’तील कंदील निर्मितीच्या कामाला बसतो आहे.

माहीमच्या कादरी वाडी, कवळे वाडी, राव वाडीतील अनेक कुटुंबांमध्ये दिवाळीच्या तोंडावर नक्षीदार व रंगीबेरंगी कागदांपासून कंदील बनविले जातात. त्यामुळे या गल्ल्या कंदील गल्ली म्हणून ओळखल्या जातात. हे पारंपरिक कंदिल खऱ्या अर्थाने पर्यावरणपूरक ठरतात. कंदिल विकत घेण्यासाठी मुंबई, ठाण्यातून लोक येते येतात. त्यामुळे दिवाळीत या कंदिलांना चांगलीच मागणी असते, परंतु परतीच्या पावसाच्या विघ्नामुळे गेल्या काही दिवसात येथे कंदील बनविण्याचे काम म्हणावे तसे जोर पकडू शकलेले नाही. आता दिवाळी अवघ्या चार दिवसांवर आल्याने येथील लहानथोर प्रत्येकाचे हात कामाचा ‘बॅकलॉग’ भरण्याकरिता लागले आहेत.

सुमारे १०० वर्ष जुन्या कादरी वाडीतील साधारण ७० ते ८० मध्यमवर्गीय कुटुंबे दिवाळीपूर्वी कंदील तयार करण्याच्या कामात गुंतलेली असतात. साधारण ७० वर्षांपूर्वी वाडीत राहणाऱ्या साळगावकर नामक गृहस्थांनी कागदी कंदील बनवून विकण्याचा व्यवसाय सुरु केला. त्यांच्यापासून प्रेरणा घेत वाडीतील अनेक कुटुंबांनी कंदील निर्मितीला सुरूवात केली. वाडीतील कंदील कारागिरांचे पोटापाण्याचे मूळ उद्योगधंदे वेगळे असले तरी अनेक वर्षांची परंपरा जोपसण्याबरोबरच वरकमाईचा आनंद देणारा हा व्यवसाय आता येथील प्रत्येक कुटुंबात स्थिरावला आहे. गणपती विसर्जनानंतर वाडीत खऱ्या अर्थाने कंदील तयार करण्याच्या कामाला सुरुवात होते. बांबूच्या काडय़ा विकत घेऊन त्यापासून कंदीलाचा सांगाडा या काळात तयार करुन ठेवला जातो. दसरा झाल्यावर त्यावर कागदी पटय़ा, नक्षी, फुले चिटकवण्यास सुरुवात होते. यंदा मात्र दसरा झाल्यानंतरही पाऊस बराच काळ रेंगाळल्याने कंदिलाचे काम सुरू करता आलेले नाही. वाडीतील घरे लहान असल्याने घरासमोरील मोकळ्या जागेत अथवा पोटमाळ्यावर कंदील तयार करण्याचे काम केले जाते. पावसाच्या पाण्याने कागद ओला होऊन कंदील खराब होतो. त्यामुळे पाऊस गेल्यानंतरच काम सुरु केल्याचे वाडीतील कंदील कारागीर राजेश पाटील यांनी सांगितले. ‘वाडीत छोटय़ा कंदीलांबरोबर राजकीय पक्षांच्या मागणीवरून मोठे कंदील देखील तयार होतात. मात्र, पाऊस असल्याने कंदिलाचे काम सुरू करता आले नाही,’ असे संजय साळवी यांनी सांगितले.

दिवाळीच्या एका आठवडय़ाआधीच विक्रीसाठीचे बहुतांश कंदील तयार होतात आणि त्याची विक्री सुरु होते. मात्र यंदा दिवाळीला तीन दिवस राहिले तरी कंदील तयार करण्याची लगबग सुरु आहे. त्यामुळे आमची दिवाळी यंदा उशीरा सुरू होणार आहे.  – राजेश राऊळ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.