पाऊस असा लागला होता मुंबईला; अन् तसंच दामूचं पिणंसुद्धा. पाच दिवस झाले. दिवस-रात्र सतत पीत होता दामू. आणि पाच दिवस झाले- आकाशसुद्धा बरसत होतं. दोघांना चढलीये असं वाटत होतं. आणि थांबायला कुणी तयार नाही. हट्टाला पेटल्यासारखे..
दामूचं हे नेहमीचंच. असाच होता दामू. पिणार म्हटलं की त्याला कुणी रोखू शकणार नाही. वीस-वीस दिवस सकाळ-संध्याकाळ दारू. फक्त दारू. दारू पुरवण्याचं काम लक्ष्याचं. दामूची बायको लक्ष्याला मना करायची. तर हा बेटा कुठनं कुठनं दारू मिळवायचा. बिछान्याखाली असलेल्या सतरंजीतनं, डाळीच्या डब्यातनं, छपराच्या फळकुटांमधून. आणि दामूची दारू रिचवण्याची ताकद प्रचंड. प्यायला की गडी खूश व्हायचा. इतरांप्रमाणे भांडणतंडण नाही. आणि सोडली म्हटल्यावर तीन-तीन महिने, चार-चार महिने, तर कधी अगदी सहा-सहा महिनेसुद्धा दारूला हात लावत नसे. अन् त्या न पिण्याच्या काळात दामूसारखा माणूस नाही उभ्या वस्तीत. मग त्याच्यासारखा बाप नाही, त्याच्यासारखा नवरा नाही, अन् ना त्याच्यासारखा कारागीर.
परंतु हे घडणार सटीसामासी. यावेळी तर असं झालं की, पहिल्या पावसाबरोबर दामू सुरू झाला- आणि पाऊससुद्धा. काय पाऊस! गेल्या शंभर वर्षांत असा पाऊस पडला नाही.
पहिला दिवस गेला. जाऊ दिला अंगावरनं. नेहमीप्रमाणे मुंबईच्या लोकल गाडय़ा बंद पडल्या, सुरू झाल्या आणि पुन्हा बंद पडल्या. दुसऱ्या दिवशी बाहेरगावचे ट्रक्स मुंबईला आले नाहीत. भाजीपाला, तेल वगैरेची आवक थांबली. वस्तुमालाचे भाव सशाच्या कानाप्रमाणे वाढत गेले. रस्त्यांवर ट्रकांच्या रांगा दिसू लागल्या. पाऊस सुरूच होता. मुसळधार आणि एका वेगात. अन् त्याच गतीत सुरू होतं दामूचं पिणं.
तिसऱ्या दिवशी संकटाची चाहूल लागली. पाऊस, पावसासोबत वारा. गल्लीबोळात पाणी भरू लागलं. दामूची बायको बाहेरचं सामान खोलीत आणू लागली. वीतभर खोलीत दामू, त्याची बायको शोभा आणि मुलगी कृष्णा असे तिघेजण. पुढच्या महिन्यात कृष्णाचं लग्न आहे. तीन माणसं खोलीत जेमतेम मावतात- न मावतात तो शोभानं बकरीला धरून घरात आणलं. दामू चिडला.
‘‘च्यायला ह्य़ा भेन..ला घरात आणण्याची गरज काय?’’
‘‘बाहेर उभ्या उभ्या किती वेळ अशी भिजत राहणार ती?’’
‘‘अगं, एवढा जाडा लोकराचा कोट चढवलायन् ना तिनं अंगावर.. दोन तास भिजू शकत नाही?’’
‘‘दोन तास म्हणे! दोन दिवस झाले पावसाला. आज तर गल्ली सगळी भरून गेली आणि नाला तुडुंब भरून वाहतोय. पुनियाची सगळी झोपडपट्टी पाण्याखाली जाणारेयसं वाटतं.’’
दामू गप्प. उजव्या हातातल्या चिमटीतलं थोडं मीठ त्यानं चाटलं आणि डाव्या हातातला अर्धा पेला पोटात रिता केला. दारूतलं नवसागर थेट दामूच्या काळजाला भिडलं. त्यानं भट्टीवाल्याला एक शिवी हासडली.
‘‘साला, एवढा नवसागर टाकतो दारूत. बॅटरीतलं अ‍ॅसिड टाकलंय असं वाटतं.’’
शोभा काहीच बोलली नाही. एका कडेला तिनं बकरीला बांधलं आणि कृष्णाला म्हणाली, ‘‘ऊठ बाळा, जमिनीवरचं सामान उचलून वर ठेव. पलंगावर ठेवून दे. थोडं पाणी खोलीत भरणारेयसं वाटतं. पाऊस थांबण्याची लक्षणं दिसत नाहीत. उलट वाढलाय..’’
एवढं शोभा म्हणतेय न् तोच गल्लीत एकच गलका सुरू झाला.
‘‘पुनियाचं झोपडं गेलं वाटतं.’’
शोभानं दारात जाऊन पाहिलं. मुकादमच्या घराचं आख्खं छप्पर कोसळून गल्लीत पडलं होतं. लोक छप्पर उचलायला धावले. आता काय उपयोग? गल्लीतलं पाणी घरात शिरत होतं ते राहिलं बाजूला; आता थेट आकाशातलं पाणी घरात शिरू लागलं, अन् घरभर झालं. आकाशसुद्धा ना हट्टाला पेटलं होतं!
कृष्णाला खरं तर बाहेर जायचंय. शोभानं तिला थांबवलं. ‘‘तू बैस. पुढच्या महिन्यात लग्न आहे तुझं. हात-पाय तुटलेबिटले तर..’’ असं बरंच काहीतरी सांगत सांगत शोभा बाहेर गेली. मुलीशी दोन शब्द बोलावेत असं दामूला वाटलं. घरात आता तिघेजण. दामू, कृष्णा आणि बकरी.
‘‘कांदा आहे का बाळा? एक कांदा कापून, मीठ लावून दे.’’
कृष्णा शांतपणे कांदा कापू लागली. खिडकीवर ठेवलेली बाटली दामूनं उचलली आणि पुन्हा ग्लास भरला.
‘‘माठातनं पाणीसुद्धा दे गं मुली.’’
एक चकार शब्द न बोलता कृष्णानं पाण्याचा मग दामूपुढे ठेवला. अर्धा ग्लास दारू, अर्धा ग्लास पाणी. कृष्णा जाण्यासाठी वळली तर दामूनं आपला थरथरता हात तिच्या डोक्यावर ठेवला. काही वेळ दामूचा हात वाऱ्यावर झुलत राहिल्यासारखा. वाऱ्याच्या विरुद्ध दिशेनं उडणाऱ्या पक्ष्याप्रमाणे. आणि दामूनं कृष्णाला आशीर्वाद दिला..
‘‘काळजी करू नकोस, बेटा. खूप थाटामाटात करीन तुझं लग्न. पंचवीस हजारांची खोली, पंचवीस हजारांचे कपडे, दागिने आणि पंचवीस हजार तुझ्या नवऱ्याला. पूर्ण एक लाख रुपये आणीन. सगळे तुझ्या लग्नासाठी.’’
मग दामूनं स्वत:च हिशेबात दुरुस्ती केली.
‘‘एक लाख जास्त झाले काय?.. चल, पन्नास हजार आणीन.’’ नशेत असताना दामूनं ही गोष्ट पंचवीस हजारदा तरी सांगितली असेल. आणि दर खेपेला शोभा त्याला दरडवायची-
‘‘कुठनं आणणार पैशे? रेसला जाणार की काय? की चोरी करणार?’’ प्रत्येक वेळी शोभा असं म्हणायची- आणि दारू प्यायल्यानंतर दामू निदान एकदा तरी कृष्णाच्या डोक्यावर हात ठेवून एवढंच म्हणायचा : ‘‘तू काळजी करू नकोस..’’
कांदा आणि मीठ दामूपुढं ठेवून कृष्णा पुन्हा सामान हलवण्याच्या कामाला लागली. पाणी एव्हाना खोलीत आलं होतं. किचनच्या छपराखाली ठेवलेल्या बादलीत पाण्याचा आवाज सतत. इतका वेळ शांत बसून राहिलेली बकरी उभी राहिली.
बराच वेळ झाला तरी शोभा परतली नाही म्हणताना कृष्णा तिला शोधायला बाहेर पडली. तर तीसुद्धा अर्धा तास गायब. दामूला घरातल्या सामानाची काळजी वाटू लागली. सगळ्यात आधी आपली एक लिटर दारू त्यानं नीटपणे वर ठेवून दिली. डाळीच्या डब्यात लपवलेली ती वेगळी. मग पाण्याचा एक मोठा जग दामूनं भरून ठेवला. कपडय़ांच्या दोन पेटय़ा माळ्यावर ठेवल्या. तिसरी पेटी जड होती. ओढताना दामूच्या पायाला लागली. त्यानं तिथंच ठेवून दिली ती पेटी.
बकरी एकदम कोपऱ्यात घुसली अन् उभी राहिली. हात बांधून नमाजासाठी उभी असल्याप्रमाणे. एका डब्यात कुरमुरे भरलेले होते. दामूनं थोडे खिशात भरले. थोडे मुठीत. आणि पुन्हा आपल्या जागेवर येऊन बसला. खोलीत पाणी भरू लागलं.
शोभाला शोधायला बाहेर पडलेली कृष्णा परत आली नाही. शोभा आली. तिनं साडी गुडघ्यापर्यंत वर खोचली होती अन् आरडाओरडा करत होती : ‘‘हे पाहा, आज घरी रांधणं जमणार नाही. खालच्या हॉटेलात र्अध पाणी भरलंय. लोक वरच्या गॅरेजांना पळताहेत.’’
दारूच्या नशेत होता दामू. आठवण मात्र पक्की!
‘‘मुकादमाचं काय झालं? घर भरून गेलं असेल ना त्याचं?’’
‘‘सगळं सामान वर पाठवतोय बिचारा. हीरो, गोपाळ, सुलेमान.. सगळे जुंपलेत कामाला. पण काय करायचं? म्हाताऱ्याकोताऱ्यांना, मुलाबाळांना सांभाळायचं की सामानाची काळजी करायची?’’
शोभा खाण्यापिण्याच्या वस्तू वर ठेवत होती. वडा-पाव आणला होता तिनं. तो दामूसाठी तयार करता करता म्हणाली, ‘‘केवढी मुलं जन्माला घालतात वस्तीतले लोक! एका साइजची दहा-दहा मुलं सहज सापडतील. आपलं एकच आहे ते बरं!’’
बायकोघरी परत आली म्हणताना दामूच्या जीवात जीव आला. डोकं पुसता पुसता म्हणाला, ‘‘तुझं पोट पडू नसतं लागलं तर आतापावेतो इथंसुद्धा लाइन लागली असती.’’
मानेला एक झटका देत शोभा म्हणाली, ‘‘देव आहे ना, तो वाचवतो. घे.. खाऊन घे.’’
दामूनं तिचा दंड धरला.
‘‘तो काय तुझ्या नात्यात लागतो?’’
‘‘हात सोडा,’’ शोभा करडय़ा सुरात म्हणाली. ‘‘इथनं निघण्याची तयारी करा. खाली किती पाणी भरलंय ते पाहा.’’
शोभानं दोन पेटय़ांवर खुर्ची ठेवली. दामू उठला आणि आस्ते आस्ते खुर्चीवर चढून बसला. ‘‘इतक्या उंचावर तर तुझे नातेवाईकसुद्धा यायचे नाहीत. पाणी कसलं येतंय?’’
‘‘खुर्चीतून पडूबिडू नकोस. उचलायला कुणी नाहीए इथं,’’ शोभा म्हणाली.
‘‘तू कुठं चाललीयेस?’’
‘‘गॅरेजच्या गच्चीवर. थोडी मदत करते कामात. कृष्णा तिथंच आहे.’’
‘‘ती कधी यायची?’’
‘‘पाणी थोडं ओसरलं की आम्ही सगळे परत येऊ.’’
परंतु ओसरलं तर कुणीच नाही. ना पाऊस, ना दामू. गल्लीतला प्रवाह वेगानं वाढत राहिला. नाल्याचा झाला समुद्र. मुकादमचा लहान मुलगा पाण्यात पडला आणि गटांगळ्या खात खात वाहून गेला. लोक त्याला वाचवायला धावले. हाती लागला नाही. या पळापळीत काहींना इजा झाली. जिथं पाण्याचा भोवरा झाला, तिथलं एखादं मॅन-होल उघडं असणार. अन् तिथंच मुकादमच्या मुलाला पाण्यानं खेचून नेलं, असं अनेकांचं म्हणणं.
घरात वीज नाही. किंवा विजेचं कनेक्शन मुद्दाम बंद करण्यात आलं असेल. नाही तरी शॉर्टसर्किटचा धोका होताच वस्तीला. संध्याकाळ होता होता आख्खं शहर पाण्यासकट काळोखात बुडालं.
वस्तीच्या वरच्या बाजूला तीन गॅरेजं. तिथं सहा फूट पाणी भरलं होतं. दुरुस्तीसाठी इंजिन काढलेल्या गाडय़ांचे सांगाडे कबरीत असल्याप्रमाणे पाण्यावर तरंगत होते. काहींनी छपरांच्या खाचांमधलं सामान पाण्यात फेकून दिलं आणि मोकळ्या खाचांमध्ये आश्रय घेतला. पाऊस थांबत नाही अन् पाणी ओसरत नाही तोवर ती माणसं खाली उतरण्याची शक्यता नाही.
बादलीसुद्धा थेंबे थेंबे भरून पाण्यावर हेलकावे खात होती. बाहेरचा कोलाहल आता निवळला होता. वस्ती रिकामी होत होती. कधीमधी मोठय़ानं आरडणं-ओरडणं, बस्स! क्रिकेटची मॅच सुरू असल्याप्रमाणे. विकेट गेली म्हणा किंवा कुणी षट्कार ठोकला की कसा गलका होतो- तसा गलका अधनंमधनं ऐकू येत होता. तेवढं सोडलं तर सगळीकडे आवाज छपराचा, पावसाचा, पाण्याच्या प्रवाहाचा. जणू आकाश अंगाईगीत ऐकतंय.. आणि डोळे जड जड होत होते.
ज्यांना बाहेर पडणं शक्य झालं ते बाहेर पडले आणि दूरच्या इमारतींच्या गच्च्यांच्या, हॉस्पिटलच्या आवाराच्या आणि शाळांतल्या वर्गाच्या आसऱ्याला गेले. कृष्णा हॉस्पिटलच्या व्हरांडय़ात स्वत:ला घट्ट आवरून बसली होती. तिला कुणी सांगितलंच नाही. वस्तीतल्या लोकांनी शोभाला पाण्यात बुडताना पाहिलं होतं. काहींचं म्हणणं की, शोभाला साप चावला. पाण्यात ठिकठिकाणी साप वळवळत होते.
संध्याकाळ होण्यापूर्वी दोन तरुणांनी कंबरेला दोरखंड बांधून दामूच्या खोलीपर्यंत जाण्याचा निष्फळ प्रयत्न केला. पाणी मानेपर्यंत आलेलं. बकरी दारात उलटी अडकलेली. मेली होती. भिंतीलगतचं पाणी खूप वेगानं खालच्या दिशेनं वाहत होतं. मागची खिडकी पाण्यात बुडाली होती. दामूनं महत्प्रयासानं भांडी ठेवण्याचं टेबल वरच्या फळकुटावर खेचून त्यावर खुर्ची ओढून घेतली. काही भांडी पाण्यावर तरंगत होती, काही पाण्यात वाहून गेली. कान फाटतील की काय असा पावसाचा, पाण्याचा आवाज. त्या दोन तरुणांनी दामूला खूप हाका मारल्या.
एका हातात दारूची बाटली अन् दुसऱ्या हातात एक लांबच्या लांब दांडी. दामू दांडीनं पाण्यात तरंगणारे टोमॅटो पकडत होता. घराच्या बाहेर पडण्याविषयी ना त्यानं कुणाचं ऐकलं, ना कुणाला सांगितलं. कदाचित तो विचारसुद्धा त्याच्या मनाला शिवला नसेल. दामू पाण्याच्या वर होता. आणि त्यानं आकाशाकडे एकच हट्ट धरला होता-
ही झड आधी कोण बंद करणार?