महान चित्रपट दिग्दर्शक गुरुदत्त याच्या ‘प्यासा’ या चित्रपटाच्या अनेक आशयसूत्रांपैकी एक सूत्र- कलावंताला मरणोत्तर मिळणारा सन्मान आणि त्यातील वैय्यर्थ, हे होते. खुद्द गुरूच्या आयुष्यालाही हे सूत्र लागू व्हावे, हा केवढा योगायोग आहे. गुरूने त्याच्या ३९ वर्षांच्या अल्प आयुष्यात आठ चित्रपटांची निर्मिती केली. पाच चित्रपटांचे दिग्दर्शन केले. त्याच्या हयातीत त्याला एक मान्यवर निर्माता-दिग्दर्शक म्हणून ओळखले जाऊ लागले होते. पण त्याच्यातील असामान्यत्व ध्यानात येण्यास त्याच्या मृत्यूनंतर २० वर्षे जावी लागली. १९८० नंतर त्याच्या चित्रपटांचे पुन्हा एकदा मूल्यांकन सुरू झाले. जगभरच्या चित्रपट महोत्सवांतून त्याचे चित्रपट दाखवले जाऊ लागले. फिल्म इन्स्टिटय़ूटमध्ये त्याचा अभ्यास केला जाऊ लागला. आज हिंदी सिनेसृष्टीचा अभ्यास त्याच्या चित्रपटांच्या मूल्यमापनाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. आपल्या कामाला आपल्या हयातीत मान्यता मिळणार नाही असे गुरूलाही वाटत असावे. कारण मृत्यूपूर्वी लिहिलेल्या एका लेखात त्याने नमूद केले आहे- ”My work is understood less and less as time passes. Indeed posthumous acclaim has been the tragic fate of many creators of classics.”
मात्र, काही कलावंत असे असतात, ज्यांना जिवंतपणीही योग्य तो मान मिळत नाही व मृत्यूनंतरही त्यांची उपेक्षा सुरूच राहते. अब्रार अल्वी हे असे कलावंत आहेत; ज्यांना त्यांच्या कार्याबद्दल योग्य तो सन्मान कधी मिळालाच नाही. ते स्वत: आणि त्यांचे कार्य हे पुन्हा गुरुदत्तशीच संबंधित आहे, हा केवळ योगायोग नसावा. दहा वर्षे गुरूच्या सान्निध्यात राहिल्यानंतर आयुष्यावर अशी सावली पडणे, ही आश्चर्याची गोष्ट नाही. अब्रार अल्वी यांनी गुरुदत्त फिल्म्ससाठी ‘साहिब, बीबी और गुलाम’ हा अप्रतिम चित्रपट १९६२ साली दिग्दर्शित केला. हा चित्रपट आजही एक अभिजात व असामान्य कलाकृती म्हणून ओळखला जातो. पण त्याचे सारे श्रेय मात्र गुरुदत्तलाच दिले जाते. गुरूने केवळ डमी म्हणून अब्रारचे नाव श्रेयनामावलीत टाकले, असे ठासून सांगितले जाते. आपल्या या दारुण उपेक्षेचे दु:ख मनात बाळगतच अब्रार अल्वी २००९ साली वारले. या विस्मृतीत गेलेल्या (की टाकल्या गेलेल्या?) कलावंताच्या जीवनातील एका ठसठसत्या जखमेची ही कहाणी.. भारतीय चित्रपटसृष्टीच्या या शताब्दी वर्षांत तरी या उपेक्षित कलावंताला न्याय मिळावा, या उद्देशाने हा लेखनप्रपंच!
अब्रार अल्वींचा जन्म १९२७ साली झाला. लहानपणापासून त्यांना वाचनाची खूप आवड होती. ते एम. ए.- एल.एल. बी. होऊन कामाच्या शोधात मुंबईला आले होते. कॉलेजमध्ये असताना त्यांनी अनेक नाटकांचे लेखन व दिग्दर्शन केले होते. मुंबईला त्यांची भेट राज खोसलाशी झाली. राज त्यावेळी गुरुदत्तचा असिस्टन्ट होता. गुरू ‘बाझ’ या चित्रपटात नायकाची भूमिका करीत होता आणि त्या चित्रपटाचा दिग्दर्शक, कथा-पटकथाकारही तोच होता. एके दिवशी गुरुदत्तच्या सूचनेप्रमाणे राज खोसला एक प्रसंग लिहून काढीत होता. तेव्हा त्याने सहज अब्रारला एका संवादाबद्दल त्याचे मत विचारले. अब्रार म्हणाले, ‘वाक्य व्याकरणदृष्टय़ा बरोबर आहे, पण प्रसंग काय आहे, बोलणारा कोण आहे, हे समजल्याशिवाय ते योग्य आहे की नाही, हे सांगता येत नाही.’ राज खोसलाने या शेऱ्याकडे लक्ष दिले नाही, पण शेजारी बसलेल्या गुरुदत्तच्या ध्यानात त्यांचे हे वाक्य चांगलेच राहिले. दोन दिवसांनी त्याने अब्रारला बोलावून घेतले व त्याला एक प्रसंग  लिहावयास सांगितला. ते लेखन गुरूला एवढे आवडले, की त्याने लगेच अब्रारला आपल्यासोबत संवादलेखक म्हणून काम करण्याची ऑफर दिली. दहा वर्षांच्या दीर्घ सहजीवनाची ही सुरुवात होती. सहज बोललेले एक वाक्य माणसाचे आयुष्य कसे बदलून टाकू शकते, याचे हे नमुनेदार उदाहरण आहे.
अब्रार गुरूकडे आले व लवकरच ते गुरूच्या जवळच्या माणसांपैकी एक बनले. पटकथा-संवादलेखक म्हणून ते आले असले तरी चित्रपटाच्या अनेक अंगांत त्यांना रस निर्माण झाला. त्यांनी स्वत:ची संवादलेखनाची शैली विकसित केली. ती लोकप्रियही झाली. हळूहळू नटांना संवाद सांगायचे व त्यांच्याकडून ते पाठ करून घ्यायचे, ही कामे अब्रारकडे आली. गुरुदत्त प्रॉडक्शनच्या ‘आरपार’, ‘मि. अ‍ॅण्ड मिसेस ५५’, ‘प्यासा’ आणि ‘कागज के फूल’ या चित्रपटांचे संवाद अब्रारनेच लिहिले होते. या सहा वर्षांत अब्रार गुरुदत्त प्रॉडक्शनचा एक अविभाज्य आणि महत्त्वाचा भाग बनून गेले होते.
‘प्यासा’पर्यंत गुरुदत्तच्या यशाची चढती कमान होती. गुरुदत्त फिल्म्सनेच काढलेला, पण राज खोसलाने दिग्दर्शित केलेला ‘C.I.D.’ हा चित्रपटही तुफान लोकप्रिय बनला होता. पण ‘कागज के फूल’ने सारेच चित्र पालटले. हा चित्रपट आर्थिकदृष्टय़ा तर अपयशी ठरलाच; पण टीकाकारांनाही त्याचे मोल कळले नाही. स्वत: गुरूही या चित्रपटाबद्दल असमाधानी होता. कधी नव्हे ती स्वत:च्या कर्तृत्वाविषयी त्याच्या मनात शंका निर्माण झाली होती. तो राज खोसलाला यासंदर्भात एकदा म्हणाला, ”Raj, I might not have been able to communicate. Why should the audience not understand me?” १९६३ साली फिल्म फेअरला दिलेल्या मुलाखतीतही तो हेच बोलला- ”That film was good in patches. It was too slow and it went over the heads of the audiences.”
‘कागज के फूल’ आज जरी एक असामान्य कलाकृती, एक अभिजात चित्रपट मानला जात असला तरी तो प्रदर्शित झाला तेव्हा फार थोडय़ांना तो आवडला होता. या चित्रपटासाठी ज्यांनी अप्रतिम गीते लिहिली, त्या कैफी आझमी यांनाही तो आवडला नव्हता. या चित्रपटाबद्दल व नंतरच्या गुरूच्या मन:स्थितीबद्दल कैफी म्हणाले होते, ”What Guru wanted to say in that film was not clear. His mental state was like that.  He was not clear. The failure of the film did effect him a lot. He lost a lot of confidence.”
‘कागज के फूल’ आर्थिकदृष्टय़ा कोसळला. पण गुरूला जास्त दु:ख झाले ते प्रेक्षकांनी त्याकडे पाठ फिरविल्यामुळे. तो अगदी खचून गेला होता. निराश झाला होता. त्याच्याजवळ इच्छाशक्ती उरली नव्हती. दुसरीकडे त्याचे वैवाहिक जीवनही तणावपूर्ण बनले होते. गीता व त्याचे संबंध तुटण्याच्या टोकापर्यंत आले होते. वहिदा रहमानचे व त्याचे संबंधही ताणलेले होते. तो अगदी एकाकी झाला होता. अर्थात, आर्थिक नुकसान हीदेखील गंभीर बाब होतीच. शिवाय एक संस्था चालू ठेवायची होती. त्यासाठी काही करणे भाग होते. गुरूने एक हलकाफुलका चित्रपट निर्माण करण्याचे ठरविले. मुस्लीम पाश्र्वभूमी असलेल्या ‘चौदहवी का चांद’ या चित्रपटाचे दिग्दर्शन त्याने एम. सादिक याला दिले. पटकथा-संवाद यांची जबाबदारी सागीर उस्मानीवर सोपविली. या चित्रपटात अब्रारचा कसलाच सहभाग नव्हता. आतापावेतो अब्रार ‘गुरुदत्त प्रॉडक्शन’चे पगारी नोकर होते. त्यांना महिना २५०० रु. पगार दिला जायचा. काटकसरीचा एक उपाय म्हणून गुरूने त्यांना पत्र पाठवून कळविले की, यापुढे त्यांनी इतरत्र काम करण्यास हरकत नाही. याचाच एक अर्थ असा होता की, यापुढे त्यांना पगार मिळणार नाही. अब्रार यांनी निमूटपणे हे स्वीकारले. लेखक म्हणून त्यांचे नाव झालेले होते. दुसरीकडे काम मिळण्यात अडचण नव्हती. तसे त्यांना मिळालेही.
‘चौदहवी का चांद’ बऱ्यापैकी लोकप्रिय ठरला. त्याचे रवीने दिलेले संगीतही लोकांना आवडले. आता गुरूने नव्या चित्रपटाची योजना आखण्यास सुरुवात केली. त्याच्या मनात बिमल मित्र यांच्या ‘साहिब, बीबी और गुलाम’ या कादंबरीवर चित्रपट काढण्याचे विचार घोळू लागले. ही कादंबरी त्याने मूळ बंगालीत वाचली होती. तिच्यावर आधारित बंगाली चित्रपट व नाटकही त्याने पाहिले होते. बिमल मित्रांच्या सुमारे सातशे पृष्ठांच्या महाकादंबरीवर चित्रपट काढणे हे अवघड काम  होते. यावेळी गुरूला पुन्हा अब्रार अल्वीची आठवण झाली. अब्रार तेव्हा मद्रासमध्ये होते. गुरूने तातडीने त्यांना बोलावून घेतले व या कादंबरीवरून पटकथा लिहिण्याचे काम त्यांच्याकडे सोपविले. अशा रीतीने अब्रारच्या आयुष्यातील एका नव्या आणि सर्वाधिक महत्त्वाच्या पर्वाला सुरुवात झाली.
‘साहिब, बीबी..’ची पटकथा अब्रारने लिहावयाचे ठरले, पण एक नवी अडचण निर्माण झाली. अब्रारना बंगाली येत नव्हते. गुरुदत्तने यावर एक नामी उपाय शोधून काढला. त्याने सरळ बिमल मित्र यांनाच मुंबईला येऊन राहण्याची विनंती केली. त्यांच्या राहण्या-जेवणाचा सारा खर्च गुरूने उचलला. खंडाळा येथे त्याने त्यांच्यासाठी एक बंगलाच वर्षभरासाठी भाडय़ाने घेतला. मनात एकदा अमुक एक गोष्ट बसली, की त्यासाठी गुरू लागेल तेवढा खर्च करी. या बंगल्यात बसून बिमल मित्र व अब्रार अल्वी चर्चा करीत. काही दिवस मुखर्जी नावाचा एक दुभाषाही गुरूने शोधला होता. पण नंतर अब्रार व बिमल मित्रांचे सूर जुळले. कादंबरी खूप दीर्घ होती. तिच्यातील अनेक व्यक्तिरेखा अब्रारनी पटकथेत गाळून टाकल्या. विशेषत: चित्रपटातील भूतनाथाची व्यक्तिरेखा ही अब्रारची निर्मिती आहे. त्याचा भांबावलेला चेहरा, त्याचे करकरणारे बूट या साऱ्यांतून सहज विनोदनिर्मिती व्हावी अशी योजना त्यांनी केली. कथेतील गडद गांभीर्य थोडे सुसह्य़ व्हावे, एखादे विनोदी पात्र असावे असा गुरूचा लकडा होता. कारण मग गुरूला त्याचा जिवलग मित्र जॉनी वॉकर याला ती भूमिका देता आली असती. अब्रार अल्वीच्या मते, नायकाच्या वागण्यामुळे प्रसंगात जो नर्मविनोदाचा शिडकावा होतो तो पुरेसा होता. ‘विनोदी’ पात्र निर्माण करण्याच्या ते विरोधात होते. शेवटी गुरूने अब्रारचे म्हणणे ऐकले. ‘कागज के फूल’मधील असह्य़ जॉनी वॉकर ज्यांनी पाहिला आहे, त्यांना या निर्णयाचे महत्त्व पटेल. किमान ‘साहिब, बीबी..’मधील (धुमाळने अविस्मरणीय केलेली) बन्सीची भूमिका जॉनीने करावी, असा आग्रह गुरूने धरला होता. पण अब्रारनी त्यालाही ठाम नकार दिला.
सुमारे वर्षभर अब्रार या पटकथेवर काम करीत होते. अधूनमधून बिमल मित्र कोलकात्याहून येत. सरतेशेवटी अब्रारच्या मनाजोगी पटकथा तयार झाली. ‘गुरुदत्त फिल्म्स’च्या इतिहासात प्रथमच चित्रणापूर्वी संपूर्ण पटकथा लिहून तयार होती. अब्रार दुसऱ्या निर्मात्याबरोबरही काम करीत होते. त्यामुळे गुरूने त्यांना ती पटकथा त्यांच्या आवाजात टेप करून देण्यास सांगितले. या कामासाठी जवळजवळ तीन आठवडे लागले. स्टुडिओत जाऊन खास पद्धतीने ती टेप करण्यात आली. याप्रसंगी पूर्वी केलेल्या नाटकांचा व रेडिओवरील कामाचा अनुभव अब्रारच्या कामी आला. त्यांनी सारे संवाद आपल्या आवाजात टेप केले. ते पाहून गुरू फार प्रभावित झाला. तो अनेकदा ती टेप लावून ऐकत बसे.
आता या चित्रपटातील भूमिकांसाठी पात्रयोजना ठरविण्याचे काम सुरू झाले. भूतनाथच्या भूमिकेसाठी प्रथम विश्वजीतचा विचार केला गेला होता. कारण त्याने बंगाली नाटकात ती भूमिका केली होती. छोटी बहूच्या भूमिकेसाठी छाया आर्यला विचारणा केली गेली. गुरुदत्त या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्यास पूर्वीपासूनच तयार नव्हता. त्याने प्रथम सत्येन बोस यांना विचारले. सत्येनदा तयार झाले, पण त्यांनी अट घातली की, तंत्रज्ञांचे युनिट ते स्वत: ठरवतील. गुरूला हे मान्य नव्हते. त्याची स्वत:ची अशी एक टीम तयार झाली होती व तो ती बदलावयास तयार नव्हता. नंतर गुरूने नितीन बोसना विचारले, पण त्यांनी उत्सुकता दाखविली नाही. आता मात्र गुरूने ठरविले की, हा सिनेमा अब्रार अल्वी दिग्दर्शित करतील. या घटनाक्रमांतून हेच दिसून येते की, गुरू दिग्दर्शनाची जबाबदारी घ्यावयास तयार नव्हताच. त्याला दिग्दर्शनाचे श्रेय देणाऱ्यांनी या गोष्टीचा विचार करायला हवा.
एके दिवशी संध्याकाळी गुरू अब्रारच्या घरी गेला. ड्रिंक घेता घेता त्याने अचानक अब्रारना विचारले, ‘हा चित्रपट तू का दिग्दर्शित करीत नाहीस?’
‘तुम्हीच का करीत नाहीत?’ अब्रारनी उलट प्रश्न केला.
‘माझे मन होत नाही. तूच दिग्दर्शन कर. जसे तू लिहिले आहेस, जसे आवाजातून प्रकट केले आहेस तसेच पडद्यावर आण. मला आवडेल.’
अब्रारनी हा प्रस्ताव नाकारला. तीन-चार दिवसांनी गुरूने पुन्हा अब्रारना विचारले. पुन्हा त्यांनी नकार दिला. चार दिवसांनी गुरूने अब्रारना ऑफिसमध्ये बोलावून घेतले. अब्रार आल्यावर गुरू म्हणाला, ‘या सर्वासमोर मी तुला विचारतो आहे- नव्या चित्रपटाचे दिग्दर्शन तू करणार का?’
‘मी करेन असे तुम्हाला वाटत असेल तर ही जबाबदारी घेण्यास मी तयार आहे.’
रामसिंग नावाचा गुरूचा मित्र तेथे बसलेला होता. तो म्हणाला, ‘विषय अवघड आहे, अब्रारला तो पेलवेल की नाही शंकाच आहे.’
‘मी अब्रारच्या बाजूने शर्त लावण्यास तयार आहे..’ गुरूने उत्तर दिले व त्या दिवशी पुढील सूत्रे अब्रारच्या हवाली केली.
मध्यंतरी बराच वेळ गेला होता म्हणून आता चित्रीकरणास वेग आणला गेला. गुरूजवळ बाकीची टीम तर तयार होतीच. छायाचित्रण व्ही. के. मूर्ती यांच्याकडे सोपविण्यात आले. कला- दिग्दर्शनाची जबाबदारी बिरेन नाग यांच्यावर टाकण्यात आली. संकलन वाय. जी. चव्हाण यांनी करण्याचे ठरले. छोटी बहूची भूमिका करण्यासाठी निवडलेल्या छाया आर्यचे काही प्रसंग चित्रित करण्यात आले, पण ते गुरूला पसंत पडले नाहीत. त्यामुळे त्याने तिला बदलून टाकले. जबाच्या भूमिकेसाठी गुरूने आधीच वहिदाची निवड केली होती. ती अब्रारला पसंत नव्हती. पण त्याबाबतीत गुरू ठाम होता. भूतनाथच्या भूमिकेसाठी विश्वजीतनंतर शशी कपूरचाही विचार करण्यात आला. पण शेवटी गुरूनेच ती भूमिका करण्याचे ठरविले. दोघा जमीनदार भावांच्या भूमिकेसाठी रेहमान व सप्रूची निवड केली गेली. रेहमानचे ‘गुरुदत्त फिल्म्स’शी जवळचे संबंध होते. सप्रू तर गुरूचा जुना मित्र होता. त्याला मझलेबाबूची भूमिका शोभून दिसली. मात्र, चित्रीकरणादरम्यान अब्रारना सप्रूची संवाद बोलण्याची पद्धत नाटकी वाटू लागली. त्यामुळे त्यांनी त्याचे संवाद कमी करून फक्त तीन-चार वाक्येच ठेवली. पण न बोलताही त्याची जरब वाटावी अशा प्रकारे चित्रण केले. आपले संवाद कमी केले म्हणून सप्रू नाराज झाला होता, पण अब्रारने त्याला समजावले की, मितभाषी असल्यामुळे या भूमिकेला वेगळेच बळ मिळेल. तुझ्या केवळ दर्शनातून प्रेक्षकांना अंदाज येईल की, आता काहीतरी भीषण घडणार आहे. आणि झालेही तसेच. सप्रूची ही भूमिका अतिशय परिणामकारक वठली. शेवटची व अत्यंत महत्त्वाची निवड ‘छोटी बहू’च्या भूमिकेसाठी करावयाची होती. या भूमिकेसाठी गुरूने प्रथम नर्गिसला विचारले होते. पण तिने नकार दिल्यावर मीनाकुमारीला करारबद्ध करण्यात आले. अशा तऱ्हेने पात्रयोजना पक्की झाल्यावर वेगाने चित्रपटाच्या चित्रणास सुरुवात झाली.
‘साहिब बीबी..’ला दोन नायिका असल्या तरी चित्रपटात त्या एकमेकींसमोर कधीच येत नाहीत. जबाच्या घराचा सेट स्टुडिओत तयार करण्यात आला व तिथे तिचे व भूतनाथचे सीन चित्रित करण्यात आले. जबा व भूतनाथच्या स्वभावरेखांचा अब्रारनी बारकाईने विचार केला होता. शिवाय संपूर्ण पटकथा स्वत:च्या आवाजात टेप केल्यामुळे प्रत्येक प्रसंगातील भावभावना, त्यांचे चढउतार त्यांच्या मनात पक्के होते. चित्रीकरण करताना प्रकाशयोजना कशी करावयाची, याचाही सूक्ष्म विचार त्यांनी केला होता. प्रसिद्ध सिनेपत्रकार सत्या सरण यांनी अब्रार अल्वी यांची दीर्घ मुलाखत घेतली व त्यावर आधारित ”Ten Years With Guru Dutt- Abrar Alvi’s Journey’  या नावाचे पुस्तक प्रकाशित केले आहे. त्यात ‘साहिब बीबी..’च्या चित्रीकरणाविषयी अब्रारनी तपशीलवार चर्चा केली आहे. अब्रार यांच्या मते, गुरूने दिग्दर्शनाची जबाबदारी त्यांच्यावर टाकली असली तरी वहिदाच्या सीनमध्ये तो अनेक सूचना करीत असे. यावरून त्यांचे अनेकदा खटकेही उडत. जबाचे वडील मरण पावतात तो सीन अब्रार चित्रित करीत होते. या सीनमध्ये अब्रारनी कॅमेरा एका तीन इंच उंचीच्या स्टुलावर ठेवावयास सांगितला. जबा खोलीत आल्यानंतर तिच्या चेहऱ्यावर उजेड असेल, कॅमेरा Tilt केला जाऊन चेहऱ्याचा क्लोजअप घेतला जाईल, अशा सूचना अब्रारनी कॅमेरामनला दिल्या. गुरूला ते पटले नाही. त्याला कॅमेरा eye level वर पाहिजे होता. शेवटी अब्रारना ते मान्य करावे लागले. पण ते गुरूला म्हणाले, ‘माझ्या समाधानासाठी आपण अजून एकदा माझ्या पद्धतीने शॉट घेऊ.’ गुरूने ते मान्य केले. नंतर जेव्हा रशेस पाहिल्या तेव्हा गुरूला दुसरा शॉटच आवडला व तसे त्याने मोठेपणाने कबूल केले.
मुंबईच्या स्टुडिओतले बहुतेक चित्रीकरण संपल्यावर आता छोटी बहूच्या हवेलीचा व लोकेशनचा शोध सुरू झाला. त्यासाठी गुरूने बिमल मित्र आणि कोलकात्याचे दोन डिस्ट्रिब्युटर यांची मदत घेतली. शेवटी कोलकातापासून ४० मैलांवर असलेले धनापोरिया हे गाव निवडण्यात आले. या गावात एक जुनी हवेली होती; जी कादंबरीतील हवेलीशी बरीच मिळतीजुळती होती. ती मोडकळीला आलेली होती. पण तिच्यात अजून माणसांचा वावर होता. या हवेलीत सारे चित्रण करावयाचे ठरले. त्या मोबदल्यात ती हवेली दुरुस्त करून देण्याचे गुरूने मान्य केले.
दिग्दर्शनाची जबाबदारी अब्रारवर टाकलेली असल्यामुळे गुरूने त्यांनाच धनापोरियाला जाऊन त्या हवेलीत मनाजोग्या सुधारणा करण्यास पाठविले. त्याप्रमाणे अब्रार एक महिनाभर तेथे जाऊन राहिले. हवेलीच्या बाहेरच्या भागाला रंगकाम करून घेतले. पाण्यासाठी टय़ूबवेल खोदल्या. एक कारंजे उभारले व नोकरांसाठी काही खोल्याही बांधून घेतल्या. त्या हवेलीचे दर्शनी स्वरूपच अब्रारनी बदलून टाकले. या कामात बराच वेळ खर्च झाला. मुंबईचे सर्व युनिट कोलकात्याला येऊन थांबले होते. बऱ्याचजणांना लवकर परत जायचे होते. त्यामुळे शूटिंगसाठी फक्त दहा दिवस हाताशी होते. एवढय़ा कमी वेळात, दिवस-रात्र एक करून अब्रारनी चित्रण पूर्ण केले.
या शूटिंगच्या वेळचे दोन-तीन प्रसंग अब्रारचा चित्रीकरणातील वाटा स्पष्ट करणारे आहेत. हवेलीची भव्यता प्रेक्षकांच्या मनावर ठसावी म्हणून अब्रारना तिचा एक लाँग शॉट घ्यायचा होता व रात्रीच्या वेळी सप्रू एकटाच गच्चीवर उभा राहून पाहतो आहे असे दाखवायचे होते. मनात त्यांनी तो सीन ‘पाहिला’ होता. पण प्रत्यक्षात शूटिंग करताना त्यांना दिसले की, सप्रूच्या चेहऱ्यावर उजेड येत नाही. लाइट लावले तर लाँग शॉट असल्यामुळे ते फ्रेममध्ये दिसतील. मूर्ती व अब्रार यांनी बराच विचार केला. शेवटी अब्रार यांनी खांबांच्या मागे बेबी लाइट्स दडवून ठेवले व अंधूक प्रकाश सप्रूच्या चेहऱ्यावर येईल अशी योजना केली. जेव्हा गुरूने या सीनचे रशेस पाहिले त्यावेळी त्याने मुक्तकंठाने अब्रारची प्रशंसा केली. शूटिंग सुरू करण्याआधी गुरूने अब्रारला सल्ला दिला होता- ‘सीन लिहिताना व रेकॉर्ड करताना तुझ्या मनात जी दृश्यप्रतिमा उमटली असेल त्याप्रमाणेच शूटिंग कर.’ ‘साहिब, बीबी..’चे चित्रण सुरू झाले त्यावेळी मीनाकुमारी ही कीर्तीशिखरावर असलेली अभिनेत्री होती, तर दिग्दर्शक म्हणून अब्रारचा हा पहिलाच चित्रपट होता. त्यामुळे तिचे सीन घेण्यापूर्वी ते बरीच मेहनत घेत. छोटी बहू व भूतनाथ यांच्या पहिल्या भेटीचा चित्रपटातील सीन अत्यंत गाजला आहे. जाणकारांनी या सीनमधील प्रकाशयोजना, कॅमेरा अँगल व त्यातून निर्माण होणारी भावस्थिती यांची मुक्तकंठाने तारीफ केली आहे. (आणि त्याचे श्रेय गुरुदत्तला दिले आहे.) वास्तविक हा सीन अब्रारनी लिहिल्याप्रमाणेच चित्रित झाला आहे. या सीनचे शूटिंग झाल्यावर गुरूने जेव्हा रशेस पाहिल्या तेव्हा त्याला चित्रण आवडले होते. पण अब्रार स्वत: समाधानी नव्हते. गुरूने त्यांना त्याचे कारण विचारले. ते म्हणाले की, ‘या सीनमध्ये मीनाकुमारी अप्रतिम लावण्यवती दिसली पाहिजे. तिच्या सौंदर्याचा प्रभाव भूतनाथवर, तसेच प्रेक्षकांवरही पडला पाहिजे.‘ ज्या कोनातून चित्रण झाले होते त्या कोनातून तिचा चेहरा काहीसा बेढब वाटत होता. गुरूला ते मान्य झाले. त्याने त्यावर एक उपाय सुचविला. मीनाकुमारीचे वेगवेगळ्या अँगलमधून फोटो घेऊन अब्रारना त्याचा अभ्यास करायला सांगितला. फोटो पाहताना एका विशिष्ट कोनातून तिचा चेहरा सुंदर दिसतो, हे त्यांच्या ध्यानात आले. त्यानुसार अब्रारनी पुन्हा चित्रीकरण केले. पुढे मीनाचे शूटिंग करताना ते तर ही गोष्ट ध्यानात ठेवीतच; पण मीनाही त्याबाबत जागरूक असे.
‘साहिब बीबी..’चे श्रेय गुरुदत्तला दिले जाते याचे एक कारण- त्याच्यातील गाण्यांचे चित्रण हे होय. या चित्रपटातील गाणी गुरुदत्तने चित्रित केली होती व हे अब्रारनेही नाकारले नाही. गुरुदत्तचे गाण्याचे टेकिंग इतके अप्रतिम होते, की याबाबतीत त्याची बरोबरी हिंदीतील तीन-चारच दिग्दर्शक करू शकतील. स्वत: गुरूलाही या गोष्टीचा अभिमान होता. ‘साहिब बीबी..’मधील गाणी मीच शूट करणार, असे त्याने अब्रारला सांगितले व तो निर्माता असल्यामुळे अब्रारला निमूटपणे ते मान्य करावे लागले. गुरूचा अधिकार अब्रारना मान्य होता.
पण त्यांचा स्वाभिमानही थोडा दुखावला गेला होताच. गुरू ज्यावेळी गाण्याचे शूटिंग करी, त्यावेळी ते सेटवर जात नसत. यासंदर्भातील एक प्रसंग अब्रारनी सत्या सरणला सांगितला- ‘ना जाओ सैया’ या गाण्याचे चित्रीकरण गुरू करीत असताना अब्रार बाहेर निघून गेले. सीन गाण्यानंतरही चालू राहणार होता. त्यामुळे गाण्यातील शेवटचे दृश्य चित्रित करताना गुरूने अब्रारला बोलावले. अब्रार म्हणाले, ‘तुम्ही सीन पूर्ण करा, मग मी येईन.’ गुरू गाण्याचे चित्रीकरण करून निघून गेला. मग अब्रार सेटवर आले व त्यांनी साहाय्यकाला विचारले, ‘गाणे संपले तेव्हा रेहमान व मीनाकुमारी कोठे उभे होते?’
‘रेहमान खोलीच्या मध्यावर व मीनाजी त्यांच्या पायाशी.’
‘रेहमानच्या पायात चपला होत्या का?’
‘नाही, त्या पलीकडे काढून ठेवल्या होत्या.’
‘ठीक. आता रेहमानला चपलांकडे जाऊ द्या. तो पायात चपला घालताना कॅमेरा त्याच्या पायावर असेल. मग हळूहळू त्याची पूर्ण आकृती फ्रेममध्ये येऊ द्या. तो मागे वळेल व संवाद म्हणेल, ‘क्या नयी बात कह रही हो तुम?’ येथे सीन कट् करा.’
रात्री बराच वेळ अब्रार शॉट डिव्हिजन करीत जागत होते. ते सरणला म्हणाले, ‘आज कोणीही म्हणू शकणार नाही, की हा सीन दोघांनी शूट केलेला आहे.’
अब्रारची कामात पूर्ण झोकून देण्याची वृत्ती, तो घेत असलेले अपार कष्ट हे मीनाकुमारीच्याही ध्यानात आले होते. चित्रपट प्रदर्शित झाल्यावर तिच्या कामाची सर्वत्र प्रशंसा होऊ लागली. अनेकांनी तर ही तिच्या आयुष्यातील सर्वश्रेष्ठ भूमिका आहे, असा निर्वाळा दिला. मीनाकुमारीनेही अब्रारचे ऋण मान्य करताना म्हटले, ‘अब्रारने माझ्यातील सर्वोत्तम बाहेर आणले’. तिने ‘गुरुदत्त’ने असा उल्लेख केला नाही, हे महत्त्वाचे आहे. याचे कारणही स्पष्ट आहे. तिला भूमिका समजावून देणे, संवाद पाठ करून घेणे, संवाद म्हणण्याची पद्धत घोटून घेणे व ती पडद्यावर कशी दिसेल याचाही विचार करणे, हे सारे अब्रारने केले होते. गाण्यांचे चित्रण नसेल तर गुरू कधी सेटवर येतच नव्हता.
‘साहिब, बीबी..’ला लोकमान्यता मिळाली, तसेच समीक्षकांनी व टीकाकारांनी त्याची एक श्रेष्ठ कलाकृती म्हणून प्रशंसा केली. अब्रार अल्वीला सवरेत्कृष्ट दिग्दर्शकाचे फिल्मफेअर अ‍ॅवार्ड मिळाले. हिंदीतील सर्वोत्तम चित्रपट म्हणून त्याला राष्ट्रपतींकडून पारितोषिकही मिळाले. परंतु चित्रपट प्रदर्शित झाल्या झाल्या अशी चर्चाही सुरू झाली, की अब्रार अल्वी हे Ghost Director असून, सिनेमाचा खरा दिग्दर्शक गुरुदत्त हाच आहे. नंतरही जेव्हा जेव्हा ‘साहिब, बीबी..’बद्दल लिहिले गेले त्यावेळी काही मान्यवर समीक्षकांनी व सिनेअभ्यासकांनी त्या चित्रपटाला ‘गुरुदत्तची निर्मिती’ असे म्हटले. परिणाम असा झाला की, हा गुरूचाच चित्रपट आहे, असे मिथ तयार झाले. एवढी मोठी मान्यवर मंडळी म्हणताहेत तर ते खरेच असेल असे मानले जाऊ लागले. शिवाय या गोष्टीचा छडा लावण्याची गरज कुणाला होती? चित्रपटविषयक गंभीर अभ्यासाची आपल्याकडे आधीच वानवा आहे. या समीक्षकांचा सिनेमा या माध्यमाचा अभ्यास आणि जाण नाकबूल करता येत नाही. या साऱ्या समीक्षकांनी ‘साहिब, बीबी..’बद्दल जे काय म्हटले आहे तेही मला मान्य आहे. हा एक असामान्य चित्रपट आहे यात वाद नाही. फक्त हा चित्रपट गुरूचा नाही; हा अब्रार अल्वीचा चित्रपट आहे. गुरुदत्तच्या तंत्राचा फार मोठा प्रभाव या सिनेमावर आहे, हेही मी मानतो. अब्रार आठ वर्षे गुरूच्या सान्निध्यात होते. ते त्याच्याकडून त्याची टेकिंगची पद्धती, प्रकाशयोजना अशा अनेक गोष्टी शिकले. ‘प्यासा’, ‘कागज के फूल’ या दोन्ही सिनेमांच्या निर्मितीत त्यांचा मोठा सहभाग होता. तेव्हा गुरूच्या तंत्राची काहीशी सावली त्यांच्यावर पडणे साहजिकच होते. पण एवढय़ावरून त्याला गुरूचा सिनेमा म्हणणे चुकीचे तर आहेच; शिवाय अब्रारवर अन्याय करणारेही आहे.
गुरुदत्तची काम करण्याची पद्धती त्याच्या तंत्रज्ञांना एवढी सवयीची झाली होती, की अब्रार काही नवे करू लागले की त्यांचा गोंधळ उडे. एकदा मीनाकुमारी व रेहमानचा शॉट अब्रारनी इतक्या वेगळ्या प्रकारे चित्रित केला, की छायाचित्रकार मूर्ती त्यांना म्हणाले, ‘हे तुम्ही काय करीत आहात? अशा प्रकारचा शॉट ‘गुरुदत्त फिल्म्स’च्या इतिहासात अद्यापि कुणी घेतलेला नाही.’ त्यावर अब्रार मूर्तीना म्हणाले, ‘‘गुरुदत्त फिल्म्स’चा इतिहास अजून पूर्ण झालेला नाही. मी म्हणतो त्याप्रमाणे चित्रित करा.’ यासंदर्भातील आत्यंतिक महत्त्वाचा पुरावा अब्रार अल्वींजवळ होता. सत्या सरणला दिलेल्या दीर्घ मुलाखतीदरम्यान त्यांनी ही आठवण सांगितली आहे. एकदा असाच चित्रीकरणावरून वाद झाला. प्रकरण गुरूपर्यंत गेले. कधी नव्हे तो गुरू चिडला व म्हणाला, ‘तू स्वत:ला काय समजतोस? हा सिनेमा माझा आहे.’ अब्रार काही बोलले नाहीत, पण संध्याकाळी त्यांनी आपला राजीनामा पाठवून दिला. दुसऱ्या दिवशी गुरूने त्यांना पत्र लिहिले, ‘हा सिनेमा तुमचाच आहे. तुम्हीच तो दिग्दर्शित करीत आहात. चांगल्या-वाईटाची जबाबदारी तुमचीच.’ आमचे सिनेअभ्यासक मात्र सारी जबाबदारी गुरूवर टाकून मोकळे झाले आहेत.
वाय. बी. चव्हाण हे ‘साहिब बीबी..’चे संकलक. त्यांचे याबाबतीत म्हणणे आहे- ‘या चित्रपटाच्या संकलनासाठी अब्रार माझ्यासोबत बसत होते. त्यांनी या सिनेमावर खूप कष्ट घेतले, पण त्याचे श्रेय लोकांनी त्यांना दिले नाही.’ चित्रपट दिग्दर्शक गुलझार मला एकदा म्हणाले होते, ‘फिल्में दो टेबलों पर बनती है। एक रायटिंग टेबल पर और दुसरे एडिटिंग टेबल पर.’ या दोन्ही टेबलांवर फक्त अब्रारनी काम केलेले आहे. शिवाय त्या काळात गुरूसोबत काम करणाऱ्या अनेकांचे म्हणणे आहे की, गुरू प्रसंगांच्या चित्रीकरणादरम्यान सेटवर फिरकतही नसे. असे असताना दिग्दर्शनाचे श्रेय गुरूला देण्यात काय अर्थ आहे? महत्त्वाचे म्हणजे गुरूने त्याच्या हयातीत हे श्रेय घेण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. केवळ चित्रीकरणावर गुरूच्या पद्धतीची छाया आहे म्हणून तोच दिग्दर्शक, असे कसे म्हणता येईल? (फार फार तर अब्रारना discredit करावयाचे असेल तर त्यांनी गुरुदत्तची नक्कल केली आहे, असे म्हणा.) वास्तविक पाहता ‘साहिब बीबी..’च्या निर्मितीच्या दरम्यान गुरू मनाने खूपच खचला होता. त्याचा स्वत:वरचा विश्वास उडाला होता. या काळात त्याने आत्महत्येचा अयशस्वी प्रयत्नही केला होता. आपल्या हातून काही घडणार नाही असे त्याला वाटू लागले होते. म्हणूनच त्याने ‘साहिब बीबी..’साठी दुसरे दिग्दर्शक शोधण्याचाही प्रयत्न केला होता. एखाद्याने जे केले नाही त्याचे श्रेय त्याला देण्याचा खटाटोप विलक्षणच आहे. जगाच्या पाठीवर असे दुसरे उदाहरण सापडणार नाही. कलावंतांच्या प्रतिमेचा किती परिणाम व्हावा? चित्रपटांवर अभ्यासपूर्ण लेखन करणाऱ्या नसरीन मुन्नी कबीर यांनी लिहिले आहे-  ”If this confusion (whether Guru directed the film or not) tales us anything at all, it is how little Guru Dutt cared for public recognition at this stage of his life.” असे म्हणणे म्हणजे गुरूला glorify करणेच नव्हे काय? यासंदर्भात मला दुसरे एक उदाहरण आठवते. ‘जागते रहो’ हा ‘आर. के. प्रॉडक्शन’चा अप्रतिम चित्रपट. स्वत:चा चित्रपट असूनही राजने दिग्दर्शन शंभू मित्रांना दिले. पण हा चित्रपट राजने दिग्दर्शित केला, असे कुणीही म्हणत नाही. (अगदी अनेक प्रसंगांवर राजच्या शैलीची छाया असली तरी!)
गुरुदत्तला असंख्य प्रशंसक आहेत. त्यापैकी अनेक त्याचे भक्त असल्यासारखे आहेत. मला ठाऊक आहे- गुरूचे प्रेमी माझ्यावर संतापतील, चिडतील. ‘प्यासा’ किंवा ‘कागज के फूल’मधील प्रसंगांची उदाहरणे देऊन ‘साहिब बीबी..’मधील प्रसंगांच्या टेकिंगशी त्यांचे किती साम्य आहे, हे दाखविण्याचा प्रयत्न करतील. पण ते एक गोष्ट नजरेआड करतात की, कोणताही शिष्य जाणता-अजाणता गुरूची नक्कल करीत असतो. इथे एक गोष्ट स्पष्ट करणे मला आवश्यक वाटते की, मला गुरूवर टीका करावयाची नाही. मीही गुरूचा प्रशंसक आहे. त्याचे श्रेष्ठत्व वादातीत आहे. ‘प्यासा’ व ‘कागज के फूल’ या दोन चित्रपटांद्वारे जागतिक दर्जाचा श्रेष्ठ दिग्दर्शक असा नावलौकिक त्याने कमावला आहे. ‘साहिब बीबी..’चे श्रेय नाकारल्याने त्याचे नुकसान होणार नाही. पण अब्रारच्या आयुष्यातील सवरेत्कृष्ट कामगिरीचे श्रेय त्याला न देऊन त्याच्यावर आपण अन्याय का करतो आहोत? असे करून आपण त्याचे कर्तृत्व केवळ लेखनापुरते मर्यादित का करीत आहोत? ‘साहिब बीबी..’ ही अब्रारच्या आयुष्यातील एक-अंकी शोकांतिकाच ठरली. त्यानंतर त्यांना दिग्दर्शनासाठी चित्रपट तर मिळाला नाहीच, पण या चित्रपटाचे श्रेयही मिळाले नाही. आपल्याला ‘साहिब बीबी..’चा दिग्दर्शक मानले जात नाही, ही खंत अब्रारच्या मनात शेवटपर्यंत होती. त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांचे दुर्दैव संपले नाही. त्यांच्या निधनानंतर एका इंग्रजी वृत्तपत्रात जी बातमी आली तिची सुरुवात अशी होती- ‘प्यासा’ व ‘कागज के फूल’ या चित्रपटांचे लेखक अब्रार अल्वी यांचे बुधवारी निधन झाले.
हे वर्ष भारतीय सिनेसृष्टीचे शतकी वर्ष आहे. या वर्षांत तरी या कलावंतावरचा अन्याय दूर व्हावा, एवढीच इच्छा!

Salman Khan announces new film Sikandar on Eid
सलमान खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’, नव्या चित्रपटाची केली घोषणा, दाक्षिणात्य दिग्दर्शक सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर
Percival Everett is an American writer American fiction cinema Oscar
बुकबातमी: भटकबहाद्दराची मिसिसिपी मुशाफिरीच, पण भिन्न नजरेतून..