लवकरच देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. त्यानंतर संपूर्ण देशात लोकसभेची निवडणूक होईल. (हे भविष्य नाही. आधीच माहीत असलेल्या गोष्टी सांगणे यास आमच्यात ‘भविष्यकथन’ म्हणत नाहीत!) ही निवडणूक आपल्या देशाच्या- म्हणजे भारतमातेच्या दृष्टीने अतिशय व अत्यंत महत्त्वाची आहे. का, की यातूनच केंद्रातील पुढील सरकार निवडले जाणार आहे. (आपल्या तरुण भारतास वाटते तसे फेसबुकवरून नव्हे! कृपया ध्यानी घ्या. फेसबुकवरील लाइक्स अजून निवडणुकीत ग्राह्य धरत नाहीत! सर्वोच्च न्यायालयाने तसा कोणताही निकाल दिलेला नाही. तद्वत केंद्रीय मंत्रिमंडळानेही तसा वटहुकूम काढलेला नाही.) हे सरकार आपला नेता- म्हणजे पंतप्रधान निवडेल. (नाही! आमुचे भाजप भाग्यविधाते नरेंद्र मोदी अजून पंतप्रधान झालेले नाहीत!!)
तर आता आपल्यासमोर दहा कोटींचा सवाल असा आहे की, पुढील पंतप्रधान कोण असेल?
(नाही हो! ते नाहीत! किती वेळा तेच ते बौद्धिक घ्यायचे?)
तर- हा अगदीच नागरिकशास्त्रीय सवाल झाला.
पुढचा पंतप्रधान कोण? म्हणजे पुढचे सरकार कोणत्या पक्षाचे?
एलिमेंटरी- डॉ. वॉटसन! उत्तर साधे व सुलभ आहे.
ज्या पक्षास बहुमत, त्याच पक्षाचा पंतप्रधान होणार!
तसे नसते तर आमुचे लाडके महाराष्ट्रवादी नेते व जाणते राजे शरदकाका पवार हे एव्हाना उजव्या, डाव्या, तिसऱ्या, झालेच तर चौथ्या अशा सर्व आघाडय़ांचे माजी पंतप्रधान होऊन निवृत्त नसते का झाले? पण नियम म्हणजे नियम! उगाच घटनेचा भंग नाही करायचा! ज्या पक्षास बहुमत, त्याच पक्षाचा पंतप्रधान! तेव्हा खरा प्रश्न असा आहे की, आगामी लोकसभा निवडणुकीत कोणत्या पक्षास तो महामायावी, महाजादुई, कल्याणकारी आकडा लागेल? तुम्हास सांगतो- या प्रश्नावर आम्ही आतापावेतो एवढा मेंदू शिणवला आहे, एवढी गणिते मांडली आहेत, एवढी आकडेमोड केली आहे, की त्या बळावर आम्ही कल्याण बाजारात सहजच नाव काढू शकू. गेलाबाजार दूरचित्रवाणी वाहिन्या तर कुठेच गेल्या नाहीत. आमचे हे गणिती कौशल्य आणि बोलघेवडेपणा या जोरावर कोणताही च्यानेल आम्हास निवडणूक विश्लेषक म्हणून एका पायी पाचारण करील.
आता आम्हास दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या स्टुडिओतले ते मोठमोठे टच्स्क्रीन वापरण्याची सवय नाही. त्यावरचे ते ग्राफिक्स आणि पायचार्ट यात आम्हांस गती व गम्य नाही. सलग आठाठ तास एका जागी बसण्याची आम्हास सवय नाही, की ब्रेकपूर्वी या स्टुडियोत, तर ब्रेकनंतर त्या वाहिनीवर अशी पळापळ करण्याची आदत नाही. परंतु वेळ आली व संधी प्राप्त झाली, तर मात्र आम्ही पठ्ठे मागे हटणार नाही. (कृपया, च्यानेलवरील गेस्टांचे संयोजन करणाऱ्या मंडळींनी याची नोंद घ्यावी.)
अखेर तेथे जाऊन विश्लेषकाने असेच तर विश्लेषण करायचे असते, की-
‘अजून तिसऱ्या फेरीची मतमोजणी होणे बाकी आहे. त्यामुळे या मतदारसंघातील निकालाविषयी या क्षणी भाष्य करणे उचित होणार नाही. येथे अमुक अमुक पक्षाच्या उमेदवाराने आघाडी घेतली असली, तरी खरे तर निकाल जाहीर झाल्यानंतरच कोणाला जास्त मते मिळाली, हे सांगणे योग्य ठरेल!..’
किंवा-
‘मनसेने खाल्लेली शिवसेनेची मते आणि अल्पसंख्याक व्होट बँकेवरील काँग्रेसचे वर्चस्व यामुळे या ठिकाणी युतीचे पारडे खाली दिसत असले, तरी भाजपला मोदी फॅक्टर तारून नेईल असे दिसते. त्यामुळे भाजपच्या मतांची टक्केवारी शून्य पूर्णाक नऊने घटेल, परंतु काँग्रेसच्या मतांवर मात्र फार परिणाम होईल असे दिसत नाही. त्यामुळे येथे भाजपचा उमेदवार निवडून आल्यास त्याचे सर्व श्रेय बसपने काँग्रेसच्या मतपेढीला जे िखडार पाडले त्याला द्यावे लागेल. अर्थात येथे काँग्रेसचा उमेदवारही निवडून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेवटी सर्व काही मतदारांच्या हाती आहे..’
किंवा-
‘काँग्रेस आणि मित्रपक्षांनी आतापर्यंत १०२ जागांवर आघाडी घेतली आहे. त्यांची घोडदौड अशीच सुरू राहिल्यास ते ब्रेक इव्हनला येऊ शकतात. तिकडे भाजप आघाडीनेही १२५ जागांवर आघाडी घेतलेली आहे. भाजपला जर २४५ जागा मिळाल्या तर त्यांना जादुई आकडा गाठण्यासाठी अजून २७ जागांची गरज पडेल. तेव्हा तेवढय़ा जागा त्यांना जिंकाव्या लागतील, किंवा काँग्रेसला जर २४५ जागा मिळाल्या तर त्यांनाही २७ जागा कमी पडतील. एकूण अजून चित्र स्पष्ट होण्यासाठी पुढील निकालांची वाट पाहावी लागेल..’
आता हे अशी गोलवाटोळी वटवट करणे आमच्यासारख्या अभ्यासू बोरुबहाद्दरास कणमात्र कर्मकठीण नाही. बोलावयाचे खूप; परंतु सांगावयाचे काहीच नाही, हे विज्ञान काय आम्हांसही जमू शकते! त्याकरिता निवडणूक आकडेशास्त्रीच हवा, असे कवण्या विद्वानाने सांगितले?
तुम्हास सांगतो- या आकडेशास्त्रींचा बरीक आम्हास हार्दिक आदरच वाटतो! एवढे सर्वेक्षण करून एवढी सुबक गाजराची पुंगी करायची, हे काही खावयाचे काम नाही! तसे म्हणा हल्ली कसल्याही व कोणत्याही गोष्टींचे सर्वेक्षण केले जाते. मागे एकदा एक्या कंपनीने लोकांच्या िशकण्याच्या सवयीचे सर्वेक्षण केले होते! करायचे तर करा बापडे. आमची त्यास ना नाही. किंतु त्याचे निष्कर्ष वर्तमानपत्रांतून छापून आणण्याचे काही कारण होते काय? भारतातील ३५ टक्के लोक िशकताना ‘आक् छी’ असा आवाज काढतात. ४३ टक्के लोकांस सटकन् िशक येते, तर ६८ टक्के लोकांस िशक येण्यापूर्वी नाकात जोरदार वळवळते! अरे? हे आकडे वाचून आम्ही काय करावे अशी आपली अपेक्षा आहे? परंतु काही लोक सर्वेक्षण करतात. काही ते प्रसिद्ध करतात व काही ते आवडीने वाचतात. ‘सर्वेपि सुखिन: सन्तु’ या न्यायाने सर्वाचेच बरे चालते! आम्हीही निवडणूक निकालाच्या मतचाचण्या अशाच मन लावून वाचतो. मज्जा येते! बरे, पुन्हा या मतचाचण्यांचे निष्कर्षही च्यानेल बदलावा तसे बदलत असतात. परिणामी कोणास वाईट वाटण्याचे कारणच उरत नाही. निकाल येईपर्यंत मनुष्ये कशी त्या आकडय़ांच्या आकडय़ात अडकलेली राहतात!
पण यातून पुढचे सरकार कोणाचे येणार, हा प्रश्नगुंता काही सुटत नाही. तेव्हा मग आपणापुढे दोनच पर्याय शिल्लक राहतात.
एक- ‘अरे, मी म्हण्तो काय फरक पडतो याने? कोणाचेही सरकार आले तरी तुमच्या-आमच्या बेसिकमध्ये काही फरक पडणार आहे का लेले?’ असा सवाल करावयाचा आणि निकालदिनी ईएसपीएनवर क्रिकेटची म्याच पाहात बसावयाची!
किंवा दोन- अंनिसची क्षमा मागून सरळ ग्रहगोलांस शरण जावयाचे!
वाचकांतील विज्ञाननिष्ठ स्त्री, पुरुष व अन्य हो,
हे वाचून आपण आम्हास खासच अंधश्रद्धाळू म्हणाल. परंतु त्यास आमुचा नाइलाज आहे. वस्तुत: काही दिसांपूर्वीपर्यंत आमचाही भविष्य, ज्योतिष अशा गोष्टींवर लवमात्र विश्वास नव्हता. नंतर बसला. आमुची ती विश्वासकथा अगदी एशियन स्काय शॉपच्या जाहिरातीत शोभावी अशी आहे. त्यात तो बिचारा, रंजलेला गांजलेला पुरुषप्राणी कसा हताशेने सांगत असतो, की- ‘पूर्वी माझा ज्योतिषावर भरोसा नव्हता. अजिबात नव्हता. मी कधीही कुंडली पाहत नव्हतो. पोपटवाल्यासमोर बसत नव्हतो. माझे दिवस असेच चालले होते. आज मला प्रवासाची संधी आहे का? जोडीदाराबरोबर वाद संभवतो का? वरिष्ठांची नाराजी ओढवेल का? असे पुढे काय होणार, हे मला काहीच समजत नव्हते. हे माझ्या देवा! मी अतिशय दुखात होतो! मला काहीच सुचत नव्हते! मग मला एक मित्र भेटला. त्याने मला शिवसेना नेते मनोहर जोशी सर यांच्याकडे पाहा, असे सांगितले. ते प्रत्येक गोष्ट ज्योतिषाला विचारून करतात. त्यामुळे त्यांची खूप प्रगती झाली. ज्योतिषाला विचारून त्यांनी एक गोष्ट केली नाही. त्यामुळे प्रगती त्यांच्यावर नाराज झाली. ते पाहून मीही ज्योतिषावर विश्वास ठेवू लागलो. आता रोज पेपरमधील राशीभविष्य वाचल्याशिवाय माझा दिवस सुरू होत नाही. त्यामुळे मी व माझी सुविद्य पत्नी खूप आनंदात आहे. हो ना प्रिये..?’
तर मुद्दा असा की, पुढे काय होणार, हे जाणून घेण्याचा एकमेव शास्त्रीय महामार्ग कोणता असेल, तर तो भविष्याचा आहे, याबाबत आता तरी आमुचे मनी शंका नाही. परंतु या वाटेवरही चकवे अधिक. भविष्यवेत्त्यांचेही आकडेशास्त्र्यांप्रमाणेच असते. एका ज्योतिषाच्या मते, काँग्रेसच्या कुंडलीवर शनीची छाया असेल, तर दुसऱ्यास तेथे नक्कीच रवीचा प्रकाश दिसतो. एकाच्या मते, पुढील पंतप्रधान भाजपचा असेल (यावेळी या मुद्दय़ावर बहुतेकांचे एकमत असणार. आमचे भविष्य लिहून घ्या!), तर दुसऱ्याच्या मते, अवघी लोकसभाच त्रिशंकू असणार! हे कमी की काय म्हणून काकाजी पवार यांसारखे हौशी होराभूषणही हळूच काडी टाकावी तशी भाकिते टाकणार! एकंदर या प्रांतीही जो जे वांछिल तो ते लाहो, अशीच गत! अशावेळी आपुल्यासारख्या जनसामान्य भविष्योत्सुकांनी करावे तर काय करावे?
परंतु वाचकांतील स्त्री, पुरुष व अन्य हो,
चिंता नको! भारतातील कुडमुडय़ा ज्योतिषांपासून टॅरो कार्ड व पोपटवाल्यांपर्यंत सर्वजण भविष्यात जी भाकिते करणार आहेत, त्याचे भविष्य जाणून घेऊन आम्ही त्याचा सुलभ व सार्थ लसावि काढलेला आहे. केवळ जनहितार्थ तो निचोड येथे प्रकाशित करीत आहोत. (टाळ्या!)
तर सहर्ष सादर आहे- शके १९३६ अर्थात् सन २०१४ चे राजकीय भविष्य..
काँग्रेस :
काँग्रेस हा भारतातील सर्वात जुना राजकीय पक्ष असून, त्यास थोर इतिहास आहे. (सगळे ज्योतिषी भविष्य सांगण्याची सुरुवात भूतकाळापासून का करतात कोण जाणे? पण असू दे. तेवढाच आपलाही इतिहास पक्का होतो!)
या पक्षाचे भविष्य एका शब्दात सांगता येईल- राहुल गांधी! समस्या एकच, की या राहुल गांधी यांचे भविष्य मात्र अजूनही चाचपडत आहे!
पक्षाच्या राशीमध्ये उच्चस्थानी सोनिया गांधी व दिग्विजयसिंह असून, सर्व स्थानांमध्ये असणारा, परंतु कधीही न दिसणारा अहमद पटेल यांच्यासारखा ग्रहही पक्षाच्या राशीस कायमचा आहे. हा ग्रह ऐन निवडणुकीच्या वेळी कोणत्या खेळी करतो व त्यास राहुल गांधी कशी मात देतात, यावर यावेळी पक्षाचे भवितव्य ठरेल.
‘हात’ हे निवडणूक चिन्ह असल्याने ते दाखवून अवलक्षण करण्यात हा पक्ष सराईत व पटाईत आहे. गेल्या सुमारे साडेचार वर्षांत तर राहुल गांधी यांचे गुरू डॉ. मनमोहन सिंग यांनी या कलेमध्ये चांगलीच प्रगती केलेली आहे. त्या बळावर हा पक्ष पुढील निवडणुकीस सामोरा जात असल्याने सगळेच चित्र धूसर आहे. ‘भारत निर्माण’च्या जाहिराती हाच सध्यातरी आशेचा किरण दिसतो. परंतु मोदी या गुर्जरी ग्रहामुळे या जाहिरातीही काळवंडल्या आहेत.
‘कठीण समय येता कोण कामास येतो?’ या सुभाषिताचा प्रत्यय या निवडणुकीनंतर काँग्रेसला येईल व ‘कठीण समय येता घडय़ाळही सोडून जाते’ अशी नवी राजकीय म्हण उदयास येईल.
एकंदरीत पुढील पाच वष्रे आम आदमी म्हणून बसण्याची सवय पक्षकार्यकर्त्यांना करावी लागेल असा सर्वच ग्रहांचा ग्रह दिसतो. (हल्ली तंत्रज्ञान किती सर्वव्यापी झाले आहे पाहा! ग्रहगोलांवरही सोशल मीडियाचा प्रभाव दिसतो! असो.)
भारतीय जनता पक्ष :
‘किती मौज दिसे ही पाहा तरी, हे विमान फिरते अधांतरी’ या काव्यपंक्ती भाजपला उद्देशून लिहिलेल्या नाहीत! पंतप्रधान (भावी) नरेंद्र मोदी यांच्यामुळे इतरेजनांस या ओळी आठवत असतील तर त्यास कोण काय करणार? अनेक भावी पंतप्रधानांचा पक्ष म्हणून ख्यातकीर्त असणाऱ्या भाजपचे राशीस्वामी सध्यातरी नरेंद्र मोदी हेच आहेत. त्यामुळे पक्षाला आगामी वर्ष जाहिरातदार म्हणतात त्याप्रमाणे आनंदाचे, सौख्याचे, समाधानाचे आणि खासकरून भरभराटीचे जाईल, याविषयी भाजपाईंच्या मनात कोणतीही शंका नाही. मात्र, भाजपची कुंडली काही वेगळेच सांगते. अष्टमीतील सीबीआयमुळे ऐन निवडणुकीच्या वेळी कोर्टकज्जे होतील. मोदी ग्रहाचे गुरुत्वाकर्षण बल काहीसे विचित्र आहे. ते एकाच वेळी खेचून घेते व दूरही लोटते. जसे की, ते सुषमाजी, नितीनजी यांना खेचते, पण लालजी यांना दूर लोटते. याचा पुनप्र्रत्यय आगामी निवडणुकीतही दिसेल. भाजपकडे मतदार आकर्षति होतील, तर मित्रपक्ष दूर जातील. द्राविड, उत्कल, बंग आदी राज्यांत व्रात्यस्तोमविधी केल्यास योग्य फळ मिळेल.
आगामी निवडणुकीत आपले खरे मित्र व शत्रू कोण, हेही मोदी यांना नीट पारखून घ्यावे लागेल. सध्याच्या ग्रहदशेनुसार भाजपला कोळसा, चारा, चीन, पाकिस्तान, राहुल, दिग्विजयसिंह यांची चांगलीच साथ मिळेल. मुलायमसिंह हेही मदतीस येतील. मात्र, त्यांचे साह्य घ्यावे की शौचालयाचा मुद्दा लावून धरावा, अशी गंभीर स्थिती निर्माण होईल.
लोकसभा निवडणुकीत एकटय़ाने २२० हून अधिक जागा मिळविल्यास मोदी यांना अमेरिकेचा व्हिसा मिळण्याची तसेच लालकिल्ल्यावर ध्वजारोहणाची संधी मिळेल. अन्यथा सभेतील प्रतिकृतीवरच समाधान मानावे लागेल!
तिसरी आघाडी :
जन्मवेळेपासूनच साडेसाती लागलेल्या या वाममार्गी पक्षाच्या कुंडलीतील कोणताही ग्रह एक सेकंद एका जागी राहील तर शप्पथ! प्रत्येक ग्रहाला नेमके दुसऱ्याचे स्थान हवे असते. ग्रहांच्या युत्या अत्यंत अस्थिर. बरे, कोणता शुभ ग्रह कधी पापग्रह बनेल याचा काही नेम नाही. परिणामी भविष्य वर्तविण्यास अत्यंत कठीण अशी या पक्षाची कुंडली असल्याचे सर्वच भविष्यवेत्त्यांचे मत आहे. पक्षाच्या कुंडलीत काही अदृश्य शक्ती कार्य करीत असल्याचे काही ज्योतिर्भास्करांना आढळले आहे. या शक्तींमुळे पक्षास अनपेक्षित सत्तायोग संभवतो. काँग्रेसने बाहेरून पािठबा दिल्यास ते शक्य होईल. मात्र, तत्पूर्वी तिसरी आघाडी तयार होणे गरजेचे आहे! राष्ट्रवादी मंडळींची ती काळाची गरज आहे!!
राष्ट्रवादी काँग्रेस :
पक्षाच्या घडय़ाळाचा काटा दहा जागांच्या वर जाणे हीसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसची काळाची गरज आहे. परंतु नेमका तेथेच ग्रहघोटाळा आहे. तो दूर करण्याकरिता पक्षाच्या सुभेदारांना त्यांच्या त्यांच्या सुभ्यातून निवडून दिल्लीस धाडणे हा एक मार्ग आहे. मात्र, त्यासाठी आधी कुंडलीतील चुलत शनीची शांत करावी लागेल. कोणत्याही पक्षाबरोबर छत्तीसच्या छत्तीसच नव्हे, तर बहात्तर गुण जुळणारी कुंडली हे या पक्षाचे वैशिष्टय़. ते या निवडणुकीतही अबाधित राहील. चुलत शनीमुळे काँग्रेसबरोबर जागावाटपाचे वाद, पाडापाडीचे खेळ रंगतील. त्यातून लोकांचे व काकांचे मनोरंजन होईल. नंतर व्हायचे तेच होईल! काका करायचे तेच करतील!
शिवसेना :
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘बेबंदशाही खपवून घेतली जाणार नाही,’ असा सक्त इशारा दिल्यापासून कुंडलीमधील शाखे-शाखेतील ग्रह जाम टरकले आहेत! भाजपबरोबर जागांवरून वाद संभवतात. नाराज मंडळी पक्ष सोडून जातील. त्यामुळे पक्षातील बेबंदशाही निपटून निघेल व त्याऐवजी मििलदशाही, आदित्यशाही अशा विविध शाखा तेवढय़ाच दिसतील. रामदास आठवले नामक प्लुटो ग्रहास कुंडलीतील कोणत्या घरात ठेवायचे, हा मोठाच प्रश्न पडेल. ‘आठवले तर आठवले, नाही तर ऑप्शनला टाकले..’ हा पर्याय विद्यापीठाच्या परीक्षेत चालतो, निवडणुकीत नाही- हे आदित्यला समजावून सांगावे लागेल. एरवी कुंडलीत यंदा मोदीयोग असल्याने पक्षास तसे काळजीचे कारण नाही. निवडणूक काळात पक्षप्रमुखांनी कॅमेऱ्यास चार हात दूर ठेवले म्हणजे झाले!
याशिवाय बसप, मनसे, सप, द्रमुक, अण्णा द्रमुक, माकप, भाकप असे अनेक पक्ष निवडणूक िरगणात आहेत. बसप हा पक्ष कुंडली मानत नसला तरी भविष्य निश्चितच मानतो. सप हा समाजवाद्यांचा पक्ष असल्याने तो गुपचूप कुंडली मानतो आणि उघडपणे भविष्यही. या दोन्ही पक्षांचे ग्रह उत्तर प्रदेशच्या आकाशातच एकमेकांभोवती िपगा घालत काटाकाटी करीत असतात. या निवडणुकीतही तेच होणार आहे. बसपच्या कुंडलीत यावेळी अँटी-इन्कम्बन्सीचा जोर आहे, तर सपच्या कुंडलीतील नेहमीचा अल्पसंख्याक योगही यावेळी दिसत नाही. आमचे लाडके नेताजी मुलायमसिंह यांना पंतप्रधान बनण्याची भारी हौस. परंतु त्यांच्यावर शनीची माया! त्याला कोण काय करणार? मायावतींच्या राशीलाही सीबीआयचा मंगळ आहे. केंद्रात मोदी येवोत वा गांधी- निवडणुकीनंतर त्यांचा प्रभाव कमी होईल अशी चिन्हे आहेत. मायावतींचेही फार काही मागणे नाही. तेवढे झाले तरी त्यांना पुरे. पुतळे बांधायला उत्तर प्रदेशात अजून चिकार जागा आहे! द्रमुक, अण्णा द्रमुक या दोन्ही पक्षांमध्ये तसा फार फरक नसतो. फरक असलाच तर तो चष्मा आणि साडीचाच. या दोन्ही पक्षांच्या कुंडल्यांतील ग्रहही अगदी आयाराम-गयाराम असतात. पाच वष्रे ते द्रमुकला शुभफळे देतात, तर त्याच्या पुढची पाच वष्रे अण्णा द्रमुकला. या हिशेबाने पुढची पाच वष्रे जयललिता यांची दिसतात. मोदी यांना अद्याप याचा नीटसा पत्ता नसावा. परंतु सत्तेवर आल्यास त्यांना मायावती, जयललिता आणि ममता या तीन नक्षत्रांचा सामना करायचा आहे. एकूण पुढच्या पाच वर्षांत मोदी यांचा पुरता वाजपेयी होणार असे दिसते. ग्रहांची माया खूप अगाध हेच खरे!!