Use Of NailCutter: निरोगी आरोग्यासाठी शरीराचा चांगली स्वच्छता राखणे फार आवश्यक आहे, ज्यामुळे विविध आजार आणि त्यांच्या संक्रमणाचा प्रसार रोखता येतो. त्यामुळे बहुतेक लोक रोज अंघोळ करून केस आणि शरीराची स्वच्छता राखतात. अंघोळीमुळे त्वचा तजेलदार दिसते. त्याशिवाय त्याचे इतरही अनेक फायदे आहेत; पण शरीराबरोबर नखांची काळजी घेणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. कारण- नखांमधून घाण आपल्या पोटात जाते. अशा वेळी तुमच्यापैकी अनेक जण नखे कापत असतील; पण नेलकटरने नखे कापताना तुम्हाला कधी असे प्रश्न पडले आहेत का की, नेलकटरमध्ये नेल कटिंग ब्लेडशिवाय आणखी दोन ब्लेड का असतात आणि त्यांचा नेमका काय उपयोग असतो. चला, तर मग जाणून घेऊ त्याबाबत सविस्तर…
नेलकटर ही नखांच्या स्वच्छतेसाठी वापरली जाणारी एक महत्त्वाची वस्तू आहे. नखांची योग्य प्रकारे काळजी घेण्यासाठी नेलकटरमध्ये आणखी दोन अतिरिक्त ब्लेडचा समावेश असतो. फार पूर्वी जेव्हा लोकांकडे नेलकटर नव्हते तेव्हा ते ब्लेडने नखे कापायचे. ब्लेडने नखे कापणे खूप धोकादायक असते; पण नेलकटरमुळे नखे योग्य पद्धतीने कापता येणे शक्य झाले. तुम्ही अनेकदा पाहिले असेल की, नेल कटिंग ब्लेडशिवाय नेलकटरमध्ये आणखी दोन ब्लेड बसविलेली असतात.
नेलकटरचा वापर नखे कापण्याव्यतिरिक्त इतर अनेक कारणांसाठीही केला जाऊ शकतो. नेलकटरमध्ये नेल कटिंगसह तीन ब्लेड असतात. नेलकटरच्या मागे आणखी दोन ब्लेड असतात; जी सहज बाजूला बाहेर काढून वापरता येतात. त्यातील पहिले ब्लेड टोकदार व डिझाईनचे असते आणि दुसरे ब्लेड छोट्या तलवारीसारखे असते.
टोकदार ब्लेडचा उपयोग कशासाठी केला जातो?
टोकदार ब्लेड जे खालच्या बाजूने थोडेसे वक्राकार असते. नखांमध्ये अडकलेली घाण साफ करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. त्याशिवाय या ब्लेडच्या मध्यभागी एक डिझाईन असते; ज्याचा वापर कोल्ड ड्रिंकची बाटली उघडण्यासाठी केला जातो.
छोट्या तलवारसदृश ब्लेडचा उपयोग काय?
नेलकटरमधील दुसरे ब्लेड म्हणजे एक प्रकारचा चाकू असतो; ज्याचा वापर नख कापल्यानंतर त्यांना योग्य आकार देण्यासाठी केला जातो. नखे कापल्यानंतर त्यांची वरची बाजू असमान होते आणि त्यांच्या कडांना थोडी धार येते. अशा नखांमुळे नकळतही कोणाला जखम होण्याची शक्यता असते. त्यामुळे नखे कापल्यानंतर त्यांना या ब्लेडच्या मदतीने नीट आकार दिला जातो. या ब्लेडचा दुसरा उपयोग म्हणजे भाजीपाल्यासारख्या हलक्या गोष्टी कापण्यासाठीही होतो. प्रवास करताना नाजूक गोष्टी (जसे की फळे किंवा लिंबू) कापण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो.
पोर्टेबिलिटी स्वरूपाचा हा नेलकटर कुठेही सहज घेऊन जाता येतो. पण, विमानतळ किंवा फ्लाइटमध्ये सुरक्षेच्या कारणास्तव नेलकटर आपल्याबरोबर नेता येत नाही.