What is Dhenugal? आज वसुबारस आहे. आजच्या दिवशी गाय-वासराची पूजा केली जाते. याच निमित्ताने भारतीय संस्कृतीत महत्त्व असलेल्या एका आगळ्यावेगळ्या प्रतिकाबद्दल जाणून घेणे नक्कीच माहितीपूर्ण ठरणारे आहे. हे प्रतीक म्हणजे ‘धेनुगळ’. महाराष्ट्राच्या (कर्नाटक आणि गुजरातमध्येही) संस्कृतीचा इतिहास सांगणाऱ्या प्रतिकाचे अस्तित्त्व आपल्याला अनेक आडवाटांवर, किल्यांच्या- मंदिरांच्या परिसरात आढळून येते. हा गळ ज्या वाटेवर किंवा परिसरात आढळतो त्या परिसराला नक्कीच प्राचीन इतिहास असतो. धेनुगळ हा उभा आयताकृती दगड असतो. त्या दगडावर गाय- वासराची आकृती कोरलेली असते. तर वरच्या बाजूस दोन्ही कोपऱ्यांमध्ये चंद्र- सूर्य कोरलेले असतात. मूलतः हे एक दानपत्र आहे. दान दिलेल्या जमिनीची- गावाची सीमा दाखवण्यासाठी हा धेनुगळ उभारला जातो. धेनू म्हणजे गाय तर गळ हा शब्द कळ या कन्नड शब्दावरून आला आहे, गळ म्हणजे दगड.

अधिक वाचा: 2,000-year-old temple:समुद्राखाली सापडलेले २००० वर्षे प्राचीन मंदिर कोणता इतिहास सांगते?

धेनुगळातील गाय- वासराचे प्रतीक काय सांगते?

गाय हे राजाचे प्रतीक आहे तर वासरू हे प्रजेचे. गाय ज्याप्रमाणे वासराचे पालन करते तसेच राजा प्रजेचे पालन करतो. या गाय वासरू दगडांवर काही ठिकाणी शिलालेखही कोरलेले असतात.

पौराणिक संदर्भ

हिंदू पौराणिक कथांमध्ये पृथ्वी- भूमी नेहमीच गायीच्या स्वरूपात येते. किंबहुना आपल्याला पृथ राजाच्या कथेचा संदर्भ सापडतो. या राजाने आपल्या प्रजाजनांसाठी भूमीचा पाठलाग केला होता. या पाठलागादरम्यान भूमीने गायीचे रूप धारण केले होते.

वैदिक संदर्भ

वेदांनी अदितीला आणि पृथ्वीला ‘गो’ म्हटले आहे. निरुक्तानुसार ‘गो’ हा पृथ्वीचा नामपर्याय आहे. गौरिती पृथिव्या नामधेयं यदस्यां भूतानि गच्छंती । (निरुक्त, २.१.१) …गौ हे पृथ्वीचे नाव आहे, कारण भुते तिच्या ठायी गमन करतात, असा संदर्भ निरुक्तामध्ये सापडतो. पृथ्वीची गो रूपात पुराणांनी परिपुष्टी केली आहे. पृथ्वीचे दोहन करून नाना द्रव्ये प्राप्त केली गेली. त्या दोहनासाठी प्रत्येकवेळी वत्स, पात्र आणि दोग्धा या भूमिका कोणी पार पाडल्या याचे सविस्तर वर्णन पुराणांनी केले आहे. गंधवेड्या गंधर्वांनी चित्ररथाला वत्स करून पद्म पात्रात पृथ्वीचे दोहन केले आणि सुगंध मिळवले. दैत्यांच्या भाराने अथवा अन्याय अत्याचारांच्या अतिरेकाने त्रस्त झालेली पृथ्वी प्रत्येकवेळी गोरूप धारण करून परमात्म्याकडे जाते आणि त्याला दुष्टांच्या निर्दालनासाठी अवतार घ्यायला प्रवृत्त करते. अशा प्रकारच्या कथांचे पुराणात वैपुल्य आढळते. (संदर्भ: लज्जागौरी: रा. चिं. ढेरे).

अधिक वाचा: Viral Black Cat-Golden Retriever: ‘ब्लॅक कॅट’ गर्लफ्रेंड म्हणजे काय? हा व्यक्तिमत्त्वाचा प्रकार नातेसंबंधांवर कसा परिणाम करू शकतो?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकूणात, भारतीय संस्कृतीत पृथ्वीला गायीच्या स्वरूपात पाहिले जाते. कारण ती आपल्या अपत्यांच भरणं-पोषण करते. त्यामुळेच तिला दुभत्या गायीची उपमा देण्यात येते. राजाही आपल्या प्रजेचे पालन पोषण करतो. म्हणूनच धेनुगळात गाय, वासरू यांच्या माध्यमातून राजा आणि प्रजा तसेच भूमी आणि सजीव यांचे रूपक साधले आहे.