Paris Olympics 2024 Medal Winner: पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा पार पडली. भारताकडून भालाफेकपटू नीरज चोप्राने रौप्य पदक जिंकले, तर मनू भाकेर, सरबज्योत सिंग, स्वप्निल कुसाळे आणि अमन सेहरावत यांनी कास्य पदकाची कमाई केली. या खेळाडूंवर राज्य सरकार आणि उद्योगपतींकडून बक्षिसांची उधळण झाली. कुणी भेटवस्तू दिल्या, तर कुणी विविध पुरस्कारांनी सन्मानित केले. मात्र पदकाच्या बदल्यात मिळणाऱ्या बक्षिसांवर कर द्यावा लागतो का? असा प्रश्न यानिमित्ताने विचारला जात आहे.

पदक विजेत्यांना बक्षिसांवर कर द्यावा लागतो?

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा फ्रान्समध्ये संपन्न झाली. फ्रान्समध्ये सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूला ८० हजार, रौप्य पदक विजेत्या खेळाडूला ४० हजार तर कास्य पदक विजेत्या खेळाडूला २० हजार रुपये दिले जातात. यावर कोणताही कर लागत नाही. भारतातही पदक विजेत्या खेळाडूंना दिलेल्या रोख बक्षिसे आणि इतर भेटवस्तूंवर कर लादला जात नाही. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या (Central Board of Direct Taxes – CBDT) माहितीनुसार, ऑलिम्पिक, राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेत पदक जिंकणाऱ्या खेळाडूंना केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळणाऱ्या रोख बक्षिसांवर प्राप्तिकर कायद्याच्या (Income-Tax (I-T) Act) कलम १० (१७अ) नुसार कोणताही कर लागत नाही.

हे वाचा >> Paris Olympics 2024 : भारतात पदक विजेत्या खेळाडूंना किती रक्कम मिळते, कोणत्या देशात दिले जाते सर्वाधिक बक्षीस? जाणून घ्या

भारतीय नेमबाज मनू भाकेरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन कास्य पदक जिंकले, तिला ३० लाखांचे तर सरबज्योत सिंगला २२.५ लाखांचे रोख बक्षीस जाहीर झाले आहे. या दोघांनाही यावर कर लागणार नाही. भारतीय हॉकी संघानेही कास्य पदक जिंकले. संघातील खेळाडूंना पंजाब आणि ओडिशा सरकारने दिलेल्या बक्षिसांवरही कर लागणार नाही.

अमेरिकेत कर लावला जातो का?

अमेरिकेत आतापर्यंत ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूंना मिळणाऱ्या पुरस्कारांवर कर लावला जात होता. मात्र २०२६ पासून ज्या खेळाडूंचे वार्षिक उत्पन्न १ दशलक्ष डॉलरच्या पुढे असेल त्यांनाच कर लावला जाणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पदकावर कर लागतो का?

खेळाडूंनी जिंकलेले पदक हे दागिन्यात मोडले जात नाही. रोजच्या वापरातील चैन किंवा सोनसाखळीप्रमाणे ते रोज गळ्यात घातले जात नाही. प्राप्तिकर कायद्याच्या कलम ५६(२)(एक्स) अन्वये जंगम मालमत्ता जर ५० हजारांच्या वर असेल तर त्यावर कर लावला जाईल. यामध्ये शेअर्स, रोखे आणि दागिने यांचा उल्लेख आहे. मात्र पदकाचा उल्लेख नाही.