गेल्या काही वर्षांत भारतातील अनेक शहरांची, रस्ते आणि उद्यानांची नावे बदलण्यात आली. अनेक लोक नाव बदलण्याच्या बाजूने उभे राहताना दिसले, तर काही जण विरोध करताना दिसले. यात अनेक शहरांची नावे बदलण्यावरून वाद सुरू आहे. पण आज आपण एखाद्या शहराचे नाव बदलण्यासाठी सरकारला किती पैसा खर्च करावा लागतो याविषयी जाणून घेणार आहोत. कोणत्याही गावाचे, शहराचे नाव बदलण्याची संपूर्ण प्रक्रिया खूप मोठी आहे. फक्त बोर्डातून एक नाव पुसून दुसरे नाव लिहिले असे होत नाही. या कामासाठी बराच सरकारी पैसा खर्च होतो, जो जनतेच्या माध्यमातून प्रत्यक्ष- अप्रत्यक्षरीत्या सरकारपर्यंत पोहोचतो.
कोणत्या राज्यात सर्वाधिक ठिकाणांची नावे बदलण्यात आली?
भारतात गेल्या काही वर्षांत उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक नावे बदलण्यात आली. येथे मुगलसराय रेल्वे स्थानकाचे नाव बदलून पंडित दीनदयाल उपाध्याय आणि अलाहाबादचे नाव बदलून प्रयागराज करण्यात आले. त्यामुळे फैजाबादचे नाव बदलून अयोध्या करण्यात आले. तर अलीगढ, फारुखाबाद यांसारख्या अनेक जिल्ह्यांची नावे आगामी काळात बदलू शकतात. त्याचबरोबर मध्य प्रदेश, हरयाणा, कर्नाटक आणि दिल्लीदेखील या शर्यतीत मागे राहिली नाही. दिल्लीतही अनेक ठिकाणांची नावे बदलण्यात आली आहेत. तर महाराष्ट्रातही औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करण्यात आले आहे.
कोणत्याही ठिकाणाचे नाव कसे बदलले जाते?
कोणत्याही शहराचे, गावाचे, रस्त्याचे नाव असेच बदलले जाऊ शकत नाही. यासाठी एक संपूर्ण प्रक्रिया आहे, ती पाळावी लागते. गृहमंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, कोणत्याही शहराचे, गावाचे किंवा रस्त्याचे नाव बदलण्यापूर्वी तेथील स्थानिक लोकांच्या भावनांचा आदर करणे आवश्यक आहे. त्या नावामुळे लोकांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत ना हे लक्षात घेतले पाहिजे. एखाद्या रस्त्याचे नाव बदलण्यात स्थानिक महापालिका, नगरपालिका यांसारख्या संस्थांचा महत्त्वाचा वाटा आहे. दुसरीकडे जिल्ह्याचे किंवा शहराचे नाव बदलायचे असेल तर त्यासाठीचा प्रस्ताव मंत्रिमंडळाकडे जातो. मंत्रिमंडळात प्रस्ताव मंजूर झाल्यानंतरच शहर किंवा जिल्ह्याचे नाव बदलण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले जाते. मंत्रिमंडळात प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर त्यानंतर नवीन नावाचे राजपत्र तयार केले जाते. आणि मग त्या नवीन नावावर अधिकृत शिक्कामोर्तब होते.
हेही वाचा : इंटरनॅशनल फ्लाइटमध्ये जन्मलेले बाळ कोणत्या देशाचे नागरिक मानले जाते? वाचा काय आहेत कायदे
एखाद्या ठिकाणाचे नाव बदलण्यासाठी किती खर्च येतो?
एखाद्या ठिकाणाचे नाव बदलण्यामागे किती पैसा खर्च होतो हे कोणते नाव बदलायचे आहे यावर अवलंबून आहे. एखाद्या रस्त्याचे किंवा परिसराचे नाव बदलायचे असेल तर त्यासाठी फारसा खर्च येणार नाही. मात्र एखाद्या शहराचे नाव बदलायचे असल्यास सुमारे २०० ते ५०० कोटी रुपये खर्च करावे लागतात. तर सरकारने एखाद्या राज्याचे नाव बदलण्याचा निर्णय घेतल्यास ५०० कोटींहून अधिक खर्च येतो.