तमिळनाडूतील कुन्नूर येथे लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या भीषण अपघातात संरक्षण दलांचे प्रमुख (सीडीएस) जनरल बिपिन रावत यांचं निधन झालं. दुर्घटनेत बिपिन रावत यांच्यासह त्यांची पत्नीचाही मृत्यू झाला. या दुर्घटनेत एकूण १३ जणांनी आपले प्राण गमावले. दुर्घटनेत एक जण गंभीर जखमी झाला असून, त्यांच्यावर लष्करी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जनरल बिपीन रावत हे ‘एमआय-१७ व्ही५’ हेलिकॉप्टरने तमिळनाडूतील वेलिंग्टन येथील संरक्षण दलाच्या महाविद्यालयातील (डीएसएससी) कार्यक्रमासाठी जात असताना हा भीषण अपघात झाला. या हेलिकॉप्टरमध्ये रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका यांच्यासह १४ जण होते.

अमेरिकेत शिक्षण ते भारताचे पहिले संरक्षण प्रमुख व्हाया गोरखा बटालियन… जाणून घ्या बिपीन रावत यांच्याबद्दल

बिपीन रावत सकाळी नऊ वाजता विशेष विमानाने पत्नीसोबत दिल्लीहून तामिळनाडूसाठी रवाना झाले होते. ११.३५ ला सुलूर हवाई तळावर त्यांचं आगमन झालं. कोईम्बतूरजवळील सुलूर हवाई तळावरून सकाळी ११.४८ वाजता उड्डाण घेतलेले हे हेलिकॉप्टर पाऊण तासात वेलिंग्टन येथे पोहोचणे अपेक्षित होते. मात्र, उड्डाणानंतर काही वेळातच (१२.२२ वाजता) ते निलगिरी जिल्ह्यातील कट्टेरी-नांचपंचथ्राम येथे कोसळले.

दरम्यान दुर्घटनेनंतर हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी ब्लॅक बॉक्स ताब्यात घेतला आहे. यामुळे या दुर्घटनेचं नेमकं कारण काय आहे ते समजण्यास मदत मिळणार आहे. यानिमित्ताने हा ब्लॅक बॉक्स म्हणजे नेमकं काय असतं हे जाणून घेऊयात…

कोणत्याही विमानाचा, हेलिकॉप्टरचा अपघात झाला की त्याचा ब्लॅक बॉक्स मिळवणं ही प्राथमिकता असते. एखाद्या विमान किंवा हेलिकॉप्टर दुर्घटनेनंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे फ्लाईट डेटा रेकॉर्डर (एफडीआर) ज्यामध्ये आकडेवारी दिलेली असते तर आणि कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर (सीव्हीआर) असते ज्याद्वारे संभाषण रोकॉर्ड केले जाते. यालाच ब्लॅक बॉक्स म्हणतात.

– ब्लॅक बॉक्स म्हणजे याचा रंग काळा असेल असं तुम्हाला अगदी सहज वाटून जाईल. मात्र तसे नसून या बॉक्सचा रंग केशरी असतो.

– तो इतक्या कठिण गोष्टींनी बनवलेला असतो की त्याच्यावर आग आणि पाणी या कशाचाच परिणाम होत नाही.

– हा बॉक्स सुरक्षित राहणे आवश्यक असल्याने तो विमानाच्या मागील भागात बसवला जातो. त्यामुळे तो सुरक्षित राहण्याची शक्यता जास्त असते.

– ब्लॅक बॉक्सच्या बॅटरीची क्षमताही अतिशय चांगली असून ती ३० दिवस टिकते. त्याच्या डेटाचा वापर अनेक वर्षांनंतरही करता येतो.

– ब्लॅक बॉक्सच्या तपासणीसाठी विमान निर्माण करणाऱ्या टीमकडून त्याच्या अनेक चाचण्या केल्या जातात. या कठिण चाचण्यांमधून गेल्याननंतरच हा बॉक्स विमानाला बसविण्यात येतो.

– विमानाचा ब्लॅक बॉक्स मिळाल्यानंतर तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवला जातो. यात रेकॉर्ड झालेल्या डेटाद्वारे विमान दुर्घटनेच्या कारणांचा पत्ता लागतो.

– ऑस्ट्रेलियाचे शास्त्रज्ञ डेव्हिड वॉरेन यांनी १९५०च्या दशकात ब्लॅक बॉक्सचा शोध लावला होता. मेलबर्नच्या वैमानिक संशोधन प्रयोगशाळेत काम करत असताना कमर्शिअल एअरक्राफ्ट अपघात झाल्याने त्यांनी हा शोध लावला. विमान दुर्घटना होण्याआधीच्या घडामोडी रेकॉर्ड करता येईल का असा विचार करुन त्यांनी फ्लाईट डेटा रेकॉर्डरवर काम करायला सुरुवात केली आणि त्यानंतर ब्लॅक बॉक्सचा शोध लागला.

– १९६० मध्ये ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा विमानात ब्लॅक बॉक्स लावला होता. तर भारतात नागरी उड्डाण संचलनालयाने जानेवारी २००५ पासून सर्व विमान आणि हेलिकॉप्टरमध्ये ही दोन्ही उपकरणे बसविणे अनिवार्य केले आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cds bipin rawat helicopter crash what is black box flight data recorder cockpit voice recorder sgy
First published on: 09-12-2021 at 12:22 IST