देशावर सध्या ओमायक्रॉनचं संकट असून दुसरीकडे करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येने अनेक राज्यांची चिंता वाढवली आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, दिल्लीसह महाराष्ट्रातही निर्बंध लावण्यात आले आहेत. राज्यात मुंबईतील स्थिती सर्वात बिकट असल्याचं दिसत आहे. मंगळवारी राज्यात करोनाचे २१७२ नवे रुग्ण आढळल़े असून मुंबईत सर्वाधिक १३७७ नवे रुग्ण आढळले. मुंबईत गेल्या आठवडय़ात एक टक्क्यांपेक्षाही कमी असलेले बाधितांचे प्रमाण आता तीन टक्क्यांवर गेले असल्यामुळे शहर तिसऱ्या लाटेच्या उंबरठय़ावर असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. यानिमित्ताने जाणून घेऊयात मुंबईत सध्या काय स्थिती आहे.

सुमारे ६३ टक्के रुग्ण मुंबईत –

राज्यात गेल्या आठवडय़ात दैनंदिन रुग्णसंख्येने हजाराचा टप्पा पार केला होता. या आठवडय़ाच्या सुरुवातीलाच दैनंदिन रुग्णसंख्येने दोन हजाराचा आकडा पार केल्यामुळे जवळपास आठ ते नऊ दिवसांतच राज्यातील करोना रुग्णांचे प्रमाण दुपटीने वाढले आहे. राज्यात सर्वाधिक झपाटय़ाने करोनाचा प्रसार मुंबईत होत असून राज्यातील एकूण रुग्णसंख्येत सुमारे ६३ टक्के रुग्ण हे मुंबईत आढळले आहेत.

Covid: महाराष्ट्रातील निर्बंध अजून कडक करण्याचा राजेश टोपेंचा इशारा, म्हणाले “दोन दिवसात मुख्यमंत्री…”

तीन दिवसांत रुग्णसंख्या दुप्पट

मुंबईत गेले काही दिवस करोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असून, तीन दिवसांतच रुग्णसंख्या जवळपास दुपटीने वाढली आहे. २५ डिसेंबरला मुंबईत ७३५ नव्या रुग्णांचे निदान झाले होते. त्यानंतर आता २८ डिसेंबरला शहरात १३७७ रुग्णांची नव्याने भर पडली आहे. गेल्या आठवडय़ात शहरात बाधितांचे प्रमाण हे एक टक्क्यापेक्षाही कमी होते. या आठवडय़ात हे प्रमाण तीन टक्क्यांच्याही पुढे गेले आहे. मुंबईतील प्रतिबंधित गृहनिर्माण संकुलांची संख्या एका दिवसात २९ वरून ३७ झाली आहे. मुंबईत मंगळवारी ३३८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

मुंबईत चार टक्के पॉझिटिव्हीटी रेट

“मुंबईत रोज ५१ हजार चाचण्या केल्या जात आहे. त्यातून २२०० पॉझिटिव्ह येत असतील चार टक्के पॉझिटिव्हीटी रेट आहे जो चांगला नाही. त्यामुळे आपल्याला काळजी घेण्याची गरज आहे,” असा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे.

मुंबईत १३०० केसेस

“मागील आठ दिवसात पाहिलं तर २० डिसेंबरदरम्यान महाराष्ट्रात पाच ते सहा दरम्यान अ‍ॅक्टिव्ह रुग्ण होते, पण आता महाराष्ट्रात ११ हजार ४९२ रुग्ण आहेत. २० हजारांपर्यंत हा आकडा जाऊ शकतो. मुंबईची तुलना केली तर मुंबईत ३०० च्या आसपास केसेस होत्या, आज १३०० केसेस आहेत. आज संध्याकाळी रिपोर्ट होतील त्यातून अंदाजे २२०० केसेस रिपोर्ट होतील. सात दिवसात सात पटीने रुग्ण वाढले आहेत. दोन दिवसात डबलिंग होत आहे अशी परिस्थिती आहे,” अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

तिसऱ्या लाटेच्या उंबरठय़ावर

ऑगस्टमध्ये शहरातील निर्बंध शिथिल करण्यात आले होते. त्यानंतर गणेशोत्सव, दसरा, दिवाळी हे लागोपाठ सणवार सुरू असतानाही रुग्णसंख्येत फारशी वाढ झाली नाही. उलट करोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर ऑक्टोबरपासून ओसरायला लागला आणि नोव्हेंबरमध्ये प्रतिदिन रुग्णसंख्येचा आलेख सुमारे २०० पर्यत खाली आला. परंतु डिसेंबरपासून शहरातील रुग्णसंख्या पुन्हा हळूहळू वाढत असून गेल्या काही दिवसांत तर रुग्णसंख्येचा आलेख वेगाने वर जाताना दिसत आहे.

मुंबईत झपाटय़ाने वाढणारी रुग्णसंख्या लक्षात घेता मुंबई तिसऱ्या लाटेच्या उंबरठय़ावर असल्याचे मानले जाते. मात्र, आतापर्यंत आढळलेल्या सर्व रुग्णांना सौम्य लक्षणे आहेत. तसेच रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढलेली नाही. त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. परंतु करोनाचा प्रसार वेगाने वाढणार नाही, यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे, असे मत करोना कृती दलाचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्रातील निर्बंध अजून कडक करण्याचा इशारा

“दिल्लीत बऱ्यापैकी निर्बंध वाढवण्यात आले आहेत. जुने सर्व निर्बंध त्यांनी आणले आहेत. मॉल्स, रेस्तराँ, लग्न सर्वांवर निर्बंध लावले आहेत. आपल्याकडे जर आपण सहजासहजी गोष्टी घेतल्या तर याची किमंत संख्यात्मक वाढ होऊन चुकवावी लागेल. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत करोनाचे नियम कठोरपणे पाळावे लागतील. पण जर आपण नियम पाळणारच नसू तर निर्बंधांमध्ये काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही,” असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

Covid: डबलिंग रेट वाढल्याने राजेश टोपेंनी व्यक्त केली भीती, म्हणाले “गती जर अशीच वाढत गेली तर…”

पुढे त्यांनी सांगितलं की, “मुख्यमंत्री, टास्क फोर्स आणि आरोग्य विभाग यासंबंधी एकत्रितपणे निर्णय घेईल. मुख्यमंत्र्यांनी कालच्या बैठकीत टास्क फोर्सची बैठक घेऊन वाढत असलेला पॉझिटिव्हिटी रेट, रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासंबंधी सूचना दिल्या. मुख्यमंत्र्यांसोबत आज किंवा उद्या बैठक होणार असून निर्बंध अजून वाढवण्यासंबंधी निर्णय घेतला जाऊ शकतो. यासाठी टास्क फोर्सचं मत विचारात घेतलं जाईल”. “लग्न किंवा मोठ्या कार्यक्रमांमध्ये नियम न पाळता पार पडत आहेत. त्यामुळे पोलीस आणि प्रशासनाला यावर बंधनं आणावी लागतील,” असं राजेश टोपे म्हणाले आहेत.