How Gold Loan Works: आपतकालीन परिस्थितीत जर कुटुंबाला तात्काळ रोख रकमेची आवश्यकता भासत असेल तर हल्ली सोने तारण कर्जाचा पर्याय वापरला जातो. आपल्या जवळ असलेले सोन्याचे दागिने तारण ठेवून तात्काळ कर्ज मिळवून देण्याची सोय अनेक वित्तीय संस्था आणि बँकांकडून उपलब्ध करून दिली जाते. सोने तारण कर्ज हा कर्जाचा एक सुरक्षित प्रकार मानला जातो. सामान्यतः सोन्याच्या बाजार मूल्याच्या ७५ टक्के रकमेपर्यंतचे कर्ज मिळवता येते. बँकेत सोने तारण ठेवताना बँक सोन्याचे मूल्यांकन करते, त्यानंतर निश्चित केलेल्या व्याजदरानुसार कर्ज दिले जाते. कर्जाची परतफेड झाल्यानंतर सोने परत केले जाते.
भारतात सोन्याला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. लग्न समारंभ आणि इतर महत्त्वाच्या सणांना सोने खरेदी करण्यास अनेकजण प्राधान्य देत असतात. त्याशिवाय गुंतवणुकीचा पारंपरिक मार्ग म्हणूनही सोन्याकडे पाहिले जाते. अडीअडचणींना आणि आणीबाणीच्या प्रसंगी सोने, दागिने विकून पैसे मिळवले जातात.
सोने तारण कर्ज म्हणजे काय?
सोने किंवा सोन्याच्या दागिन्यांवर घेतलेल्या कर्जाला सोने तारण कर्ज (गोल्ड लोन) म्हणून ओळखले जाते. विशिष्ट रकमेच्या बदल्यात आपल्याकडचे सोने बँकेकडे गहाण ठेवता येते. विशिष्ट मुदतीसह, किफायतशीर व्याजदार आणि कमीतकमी कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर सोने तारण कर्ज मिळविता येते.
सोने तारण कर्ज कोण मिळवू शकते?
२१ ते ६० वर्ष वयोगटातील कोणतीही भारतीय नागरिक असलेली व्यक्ती बँकेच्या माध्यमातून सोने तारण कर्ज प्राप्त करू शकते. तसेच खासगी वित्तीय संस्था २१ ते ७० वयोगटातील व्यक्तींनाही कर्जपुरवठा करतात. अशा खासगी संस्थांमध्ये क्रेडिट स्कोअरसाठीचे निकष फार कठोर नाहीत. पगारदार किंवा स्वयंरोजगार असलेलेही लोक यासाठी अर्ज करू शकतात.
सोने तारण कर्ज मिळण्याची प्रक्रिया कशी आहे?
सोन्याचे मुल्यांकन – सोन्याचे मूल्य निश्चित करण्यासाठी बँक किंवा खासगी वित्त संस्था सोन्याची शुद्धता, वजन यांचे मूल्यांकन करते. त्यानंतर सोन्याच्या मूल्यानंतर कमाल कर्जाची रक्कम स्थापित केली जाते.
कर्जाचा प्रस्ताव – कर्जदार बँक किंवा संस्था मूल्यांकन पूर्ण झाल्यानंतर कर्जाची रक्कम, व्याज दर, कर्जाचा कालावधी याचा प्रस्ताव सादर करतो.
कागदपत्रांची पूर्तता – कर्जाचा प्रस्ताव स्वीकारल्यानंतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. त्यानंतर सोने तारण ठेवले जाते.
कर्जाच्या रकमेचे वितरण – कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर कर्जाची रक्कम थेट बँक खात्यात जमा केली जाते किंवा डिमांड ड्राफ्ट किंवा चेकने पाठविली जाते.
सोने तारण कर्जाची परतफेड न झाल्यास काय?
सोने तारण कर्जाच्या हप्त्याची वेळेत परतफेड न केल्यास बँक किंवी वित्तीय संस्था ईमेल आणि मेसेजद्वारे हप्ता भरण्याची आठवण करून देतात. निर्धारित कालावधी उलटल्यानंतर काही दंड किंवा अतिरिक्त व्याज कर्जावर आकारले जाते. ठरलेल्या मुदतीत कर्जाची रक्कम परत न केल्यास बँक किंवा वित्तीय संस्था सदर सोन्याचे दागिने विकून किंवा लिलावात काढून कर्जाची रक्कम मिळवते.