Indian Railways Chain Pulling Rules : भारतीय रेल्वेने दररोज कोट्यावधी लोक प्रवास करतात. प्रवाशांना अप्रतिम प्रवासाचा अनुभव देण्यासाठी रेल्वेकडूनही अनेक सेवा-सुविधा दिल्या जातात. पण, ट्रेनने प्रवास करताना काहीवेळा आपत्कालीन परिस्थिती उद्भवते. अशावेळी ट्रेन थांबवणं हा एकमेव पर्याय असतो. अशा परिस्थितीत ट्रेन थांबवण्यासाठी प्रवासी साखळी ओढतात.

आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांच्या मदतीसाठी गार्ड आणि लोको पायलट पटकन धावून येऊ शकत नाही, त्यामुळे ट्रेन थांबवण्यासाठी प्रत्येक ट्रेन कोचमध्ये आपत्कालीन (किंवा अलार्म) चेन बसवलेल्या असतात, जी ओढल्यानंतर काही मिनिटांत ट्रेन पूर्णपणे थांबते.

पण, ट्रेनमधील साखळी ओढण्यासाठीदेखील रेल्वेचे काही नियम आहेत, जे तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे; अन्यथा तुमच्यावर रेल्वे नियमानुसार, कायदेशीर कारवाई होऊ शकते, तुम्हाला तुरुंगवासही भोगावा लागू शकतो. हे नियम काय आहेत जाणून घेऊ…

अलार्म चेन पुलिंग (ACP) कसं काम करतं?

भारतात बहुतांश ट्रेनमध्ये एअर ब्रेक सिस्टीम वापरली जाते. या पद्धतीत संपूर्ण ट्रेनमधून एका पाइपमध्ये दाबयुक्त हवा (Compressed Air) सतत प्रवाहित होते. ही हवा ब्रेक्सना ‘रिलीज’ स्थितीत ठेवत असते. जेव्हा आपत्कालीन स्थितीत साखळी ओढली जाते तेव्हा एक छोटा वॉल्व उघडतो. वॉल्व उघडताच ब्रेक पाइपमधील हवा बाहेर पडते, ज्यामुळे ट्रेनचा वेग कमी होतो.

लोको पायलटला हवेच्या दाबात घट झाल्याचे लगेच लक्षात येते आणि तो ट्रेनला मार्गदर्शन करण्यास सुरुवात करतो. आधुनिक ट्रेनमध्ये ड्रायव्हरच्या पॅनेलवर चेन ओढली गेल्याचं इंडिकेशन मिळतं. यावेळी सगळ्या कोचमधील ब्रेक्स लागतात आणि ट्रेन थांबते.

पण, ट्रेन लहान रुळांवर धावत असल्याने असंतुलनामुळे रुळावरून घसरण्याचा धोका असतो, त्यामुळे ती एकदम पूर्णपणे थांबवता येत नाही. ११० किमी/ताशी वेगाने जाणारी ट्रेन साखळी ओढल्यापासून ३-४ मिनिटांत पूर्णपणे थांबू शकते. ट्रेनचा प्राथमिक ब्रेकिंग पाईप अलार्म साखळींशी जोडलेला असतो.

पुढील तपासणी आणि कायदेशीर कारवाई

ट्रेन थांबल्यानंतर ट्रेनचा गार्ड किंवा आरपीएफ कर्मचारी त्वरित त्या कोचपर्यंत पोहोचतात. हे कसे शक्य होते हे अनेकांसाठी एक गूढ आहे. दुसरीकडे ट्रेनच्या डब्यांच्या बाजूच्या भिंतींवर आपत्कालीन फ्लॅशर्स असतात. जेव्हा तुम्ही आपत्कालीन साखळी ओढता, तेव्हा ओढलेल्या कोचवरील फ्लॅशर्स चालू होतात.

गार्ड, सहाय्यक ड्रायव्हर आणि आरपीएफ कर्मचारी साखळी ओढलेल्या कोचपर्यंत पोहोचण्यापूर्वी आणि मॅन्युअली चेन रीसेट होण्यापूर्वी, लोकोमोटिव्ह पायलटच्या सिस्टम पॅनेलवर एक लाइट चमकू लागते आणि आवाज करू लागते. साखळी ओढल्यानंतर हवेचा दाब हळूहळू सामान्य होतो आणि ट्रेन ऑपरेशनसाठी तयार होते.

साखळी ओढणे : शिक्षा आणि दंड

भारतीय रेल्वे कायद्याच्या कलम १४१ नुसार, वैध कारणाशिवाय साखळी ओढणे कायद्याने गुन्हा आहे. रेल्वे कायद्याच्या कलम १४१ मध्ये नमूद केल्याप्रमाणे, वैध कारणाशिवाय प्रवाश्याने साखळी ओढल्यास त्याला भारतीय रेल्वेच्या कामकाजात अडथळा आणल्याबद्दल दोषी ठरवले जाऊ शकते. दोषी आढळल्यास, गुन्हेगाराला जास्तीत जास्त रु. १,००० दंड किंवा एक वर्ष तुरुंगवास होऊ शकतो.

टीप: दोषी आढळल्यास, किमान शिक्षा तीन महिने तुरुंगवास (दुसऱ्या किंवा त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी) किंवा रु. ५०० दंड (पहिल्या गुन्ह्यासाठी) आहे.

ट्रेनमध्ये साखळी कधी ओढू शकतो?

१) कोचमधील एखाद्या प्रवाशाला त्वरित वैद्यकीय मदतीची आवश्यकता असल्यास.
२) दरोडा, चोरी, लूटमार आणि कोणी तुम्हाला त्रास देऊन पळून जाण्याचा प्रयत्न केल्यास.
३) चालत्या ट्रेनमधून एखादा प्रवासी पडला.
४) ट्रेनमध्ये आगीची घटना घडली.
५) ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचे मूल स्टेशनवरच मागे राहिलं तर
६) वृद्ध, अपंग व्यक्ती ट्रेनमध्ये चढत असताना ट्रेन सुटली तर

संबंधित रेल्वे अधिकाऱी प्रथम आपत्कालीन परिस्थितींचे मूल्यांकन करतो, त्यानंतर तो साखळी ओढण्याचे वैध कारण समजून घेतो. पण, विनाकारण साखळी ओढल्यास तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते, त्यामुळे प्रत्येकाच्या सुरक्षिततेसाठी हे नियम पाळले पाहिजेत.