आपल्या देशावर अनेक वर्ष परकीयांनी राज्य केलं. त्यामुळे परकीयांच्या अनेक भाषा इथल्या भाषेत मिसळल्या आहेत. अनेक परकीय शब्द इथल्या भाषांमध्ये मिसळून इतके घट्ट झाले आहेत की ते शब्द परकीय भाषेतून आले आहेत हे सांगितल्यावर अनेकांचा विश्वास बसणार नाही. तसेच आपल्या देशात अनेक महान संतही होऊन गेले. या संतांचे अभंग, किर्तनं, भजनं, दोहे जगभर प्रसिद्ध झाले. अनेक संतांनी जगभर भ्रमण केलं. त्यामुळे त्यांच्या माध्यमातूनही अनेक शब्द एका भाषेतून दुसऱ्या भाषेत गेले आणि आता ते वेगवेगळ्या भाषेत असे मिसळले आहेत की हे शब्द आता भाषेपासून वेगळे करणं अवघड आहे.
स्मशान आणि मसणवाट हे शब्द मराठी भाषेतले नाहीत असं जर तुम्हाला कोणी सांगितलं तर त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. परंतु, हे खरं आहे. स्मशान आणि मसणवाट हे दोन्ही शब्द संत कबीरांकडून मराठीला मिळाले आहेत. संत कबीरांचा एक दोहा आहे. ‘ज्या घट प्रेम न संचरै, सो घट जान मसान’ आपण मराठी माणसांनी या मसानाचंच मसणवाट केलं. ‘मसणात जा’, ‘मसणात जाशील’ ही तर खेड्यांतल्या भांडणांतील नेहमीची वाक्यं आहेत. संस्कृतमधल्या ‘श्मन’ या शब्दाचा अर्थ आहे प्रेत, जेथे शव शयन करते ती जागा म्हणजे शमशान. याचंच पुढे समशान झालं आणि त्याहीपुढे मराठीत स्मशान हा शब्द प्रचलित झाला.
हे ही वाचा >> डॉल्बी साऊंड म्हणजे नेमकं काय? हे विशिष्ट नाव कसं पडलं?
वि. स. खांडेकरांच्या कवितेत एक ओळ आहे ‘स्मशानातल्या दिव्य महाली निजनाथासह पतिव्रता, सौभाग्यी सीमा नुरली उजळायाला या जगता’. त्याचप्रमाणे, ‘स्मशानवैराग्य’ हा शब्दही याच स्मशान शब्दाची देणगी आहे. ‘कहाणी शब्दांची’ या पुस्तकात सदानंद कदम यांनी या शब्दाचा अर्थ लिहून ठेवला आहे.