Vote From Home Eligibility and Procedure : देशात लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यापासून सर्व पक्ष तयारी करीत आहेत. तसेच निवडणूक आयोगदेखील तयारीला लागला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी देशभरात निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. १६ एप्रिल ते १ जून यादरम्यान सात टप्प्यांमध्ये ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर, जूनमध्ये मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे. पण, या निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावे यासाठी निवडणूक आयोगामार्फत काही नागरिकांना आता घरबसल्या मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पण, घरबसल्या मतदान करण्याच्या सुविधेचा वापर नेमका कोण करू शकणार आहे? त्यासाठी कोणत्या नोंदणीची आवश्यकता असते? याची सर्व प्रक्रिया आपण जाणून घेऊ…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशातील मतदारांची संख्या

देशात ९७ कोटींहून अधिक मतदार आहेत. त्यातील बहुसंख्य मतदार हे वृद्ध आणि दिव्यांग आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मते, १० मार्च २०२४ पर्यंत देशात ८५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे ८२ लाख ज्येष्ठ नागरिक मतदार होते. १०० वर्षे ओलांडलेल्या मतदारांची संख्या २१.१८ लाख होती आणि दिव्यांग मतदारांची संख्या ८८.३५ लाख होती.

घरबसल्या मतदान करण्यासाठी कोण पात्र?

त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने १०० वर्षे ओलांडलेल्या, ८५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या आणि दिव्यांग मतदारांना घरबसल्या पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करण्याचा पर्याय देण्यात आला आहे.

त्यामुळे जे नागरिक घरबसल्या मतदानाचा पर्याय निवडतील; ते थेट मतदान केंद्रांवर जाऊन मतदान करण्यास पात्र नसतील. त्यांच्यासह पोस्टल बॅलेटचा हा पर्याय प्रसारमाध्यमांच्या पत्रकारांनाही देण्यात आला आहे. त्यामध्ये जे पत्रकार निवडणुकांचे कव्हरेज करीत आहेत आणि ज्यांच्याकडे निवडणूक आयोगाचे अधिकृत पत्र आहे अशांचा समावेश असेल.

Election 2024: घरबसल्या मतदार यादीत करा तुमच्या नावाचा समावेश; ‘असा’ करा ऑनलाईन अर्ज

घरबसल्या मतदानासाठी नोंदणी कशी करावी?

१) ज्या नागरिकांना या सुविधेचा लाभ घ्यायचा आहे, त्यांना फॉर्म 12D भरावा लागेल.

२) जे ज्येष्ठ नागरिक किंवा अपंग मतदार व्यक्ती घरून मतदान करू इच्छित आहेत, त्यांना मतदानाची अधिसूचना जारी झाल्यापासून पाच दिवसांच्या आत निवडणूक आयोगाच्या जवळच्या कार्यलयातील बूथ लेव्हल अधिकाऱ्यांकडे फॉर्म 12 D भरून जमा करावा लागेल.

२) निवडणूक आयोगाच्या http://www.eci.gov.in या अधिकृत वेबसाइटवरून हा फॉर्म डाउनलोड करता येईल. तसेच हा फॉर्म 12D लोकसभा मतदारसंघाच्या प्रतिनिधी जिल्हा अधिकारी कार्यालयात जाऊनही घेऊ शकता. काही शहरांमध्ये या फॉर्मचे वाटप सुरू झाले आहे.

२) काही ठिकाणी बूथ लेव्हल ऑफिसरदेखील मतदारांच्या घरी येऊन हा फॉर्म भरून घेत आहेत.

(Form 12D लिंकसाठी इथे क्लिक करा)

https://old.eci.gov.in/files/file/12269-form-12d-letter-of-intimation-to-assistant-returning-officer-for-absentee-voters/

३) ‘द हिंदू’च्या वृत्तानुसार घरबसल्या केल्या जाणाऱ्या पोस्टल बॅलेट मतदान प्रक्रियेवर देखरेख करण्यासाठी पाच जणांचा समावेश असणार आहे. यासाठी एका पथकाची स्थापना केली जाईल. प्रत्येक पथकात मतदान केंद्राध्यक्ष दर्जाचा अधिकारी, केंद्रस्तरीय अधिकारी, मदतनीस, पोलीस आणि चित्रीकरण करणारी व्यक्ती यांचा समावेश असणार आहे

४) जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणजेच जिल्हाधिकारी घरबसल्या मतदानाची तारीख ठरवतील.

५) पोस्टल बॅलेटवर संबंधिताने मत नोंदविल्यानंतर त्याची नियमानुसार घडी घालून ती पाकिटबंद केली जाईल. या प्रक्रियेचे चित्रीकरण करण्यात येणार आहे.

६) मतदाराला एसएमएस किंवा पोस्टद्वारे पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करण्यासाठीची तारीख आणि वेळ याबद्दल पूर्वसूचना मिळेल.

७) वृद्ध आणि अपंग मतदारांना पोस्टल मतपत्रिका घरपोच पुरविल्या जातात. त्या मतपत्रिकेद्वारे ते पसंतीच्या उमेदवाराला मतदान करू शकतात.

८) या मतदान करण्याच्या संपूर्ण प्रक्रियेला केवळ २० मिनिटे लागतात.

९) प्रत्यक्ष मतदानाच्या तीन दिवस आधीच घरबसल्या मतदानाची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.

ईव्हीएम मशीन कशी काम करते? त्यातून मतदान कसे होते? अधिकाऱ्यांनी Video तून दिली माहिती

वृद्ध, दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रावर मिळणार ‘या’ सुविधा

वृद्ध आणि दिव्यांग व्यक्तींना सक्षम अॅपद्वारेही या सर्व सुविधांचा लाभ घेता येईल. इतकेच नव्हे, तर सर्व १० लाख ४८ हजार मतदान केंद्रांवर वृद्ध, दिव्यांग मतदारांच्या मदतीसाठी स्वयंसेवक आणि व्हीलचेअरची व्यवस्था सुनिश्चित करण्यात आली आहे. त्यासह वृद्धांसाठी वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्याविषयीही चर्चा सुरू आहे.

निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात एकूण मतदारांची संख्या ९६.८ कोटी आहे. त्यामध्ये ४९.७ कोटी पुरुष आणि ४७ कोटी महिला मतदार आहेत. पाच लाख मतदान केंद्रे आहेत. १.५ कोटी निवडणूक कर्मचारी आहेत; तर ५० लाख ईव्हीएम यंत्रे आहेत. १.८ कोटी नवमतदार आहेत; जे आता मतदान करण्यास पात्र असतील.

Know Your Candidate या अॅप्लिकेशनद्वारे उमेदवाराची माहिती मिळणार आहे. उमेदवार गुन्हेगारी स्वरूपाचा असेल, तर वर्तमानपत्रात गुन्ह्यांची माहिती द्यावी लागणार. मतदार यादीत महिलांचे प्रमाण वाढत आहे. १२ राज्ये / केंद्रशासित प्रदेशांत महिला मतदारांचे प्रमाण पुरुष मतदारांपेक्षा अधिक आहे. यंदाच्या निवडणुकीत ८५ लाखांहून अधिक महिला मतदार सहभागी होतील.

तर, यंदाच्या निवडणुकीत निवडणूक आयोगाने चार ‘एम’ आव्हाने सांगितली आहेत. मसल (गुन्हेगारी), मनी (पैसा), मिस इन्फॉर्मेशन (चुकीची माहिती), एमसीसी (आचारसंहितेचा भंग) यावर निवडणूक आयोग जाणीवपूर्वक लक्ष ठेवणार आहे.

दरम्यान, महाराष्ट्राचा विचार केल्यास महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यांत निवडणूक होणार आहे.यात १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे व २० मे रोजी मतदान होणार आहे. तसैच २६ विधानसभा जागांवर पोटनिवडणूक होणार असून, त्यात महाराष्ट्रातील एका जागेचा समावेश आहे.

पहिल्या टप्प्यात रामटेक, नागपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली चिमूर, चंद्रपूर या पाच मतदारसंघांत मतदान होणार आहे. तर, २६ एप्रिल २०२४ च्या दुसऱ्या टप्प्यात आठ मतदारसंघांमध्ये निवडणूक होणार आहेत, ज्यात बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ वाशीम, हिंगोली, नांदेड, परभणी या मतदारसंघांचा समावेश आहे. तिसरा टप्पा हा ७ मे रोजी होणार असून, त्यात रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले अशा ११ लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. विशेष म्हणजे चौथा टप्पा १३ मे रोजी पार पडणार असून, त्यात नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड या मतदारसंघांचा समावेश आहे. तसेच पाचवा टप्पा २० मे २०२४ रोजी पार पडणार असून त्यात धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण अशा एकूण १३ मतदारसंघांत मतदान होणार आहे.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lok sabha election 2024 whats the vote from home facility know who is eligibility and procedure how to register www eci gov in ltdc sjr
First published on: 10-04-2024 at 23:51 IST