Paithani : गणेश उत्सव, दिवाळी असे सणासुदीचे दिवस असोत किंवा लग्नकार्य असो महिला वर्गाची पसंती असते ती म्हणजे पैठणी ( Paithani ) साडीला. पदरावर असलेली मोराची नक्षी, साडीवरची खास नक्षी, खास पैठण्यांना लावण्यात येणारी सोन्याची जर यामुळे ही साडी खुलून दिसते यात काही शंकाच नाही. भर्जरी आणि ठेवणीतल्या खास साड्यांमध्ये पैठणीची गणना होते. पैठणी ही महाराष्ट्राची ओळख आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. या पैठणीची निर्मिती कशी केली जाते? आपण जाणून घेणार आहोत.
पैठणी वापरणारा वर्ग उच्चभ्रू
पैठणी ( Paithani ) वापरणारा वर्ग हा उच्चभ्रू आहे हे कायमच पाहिलं गेलं आहे. राजकीय नेते, खासदार, आमदार, सिनेसृष्टीतले कलाकार या वर्गाकडून पैठणीला सर्वाधिक मागणी असते. तसंच पैठणी ही चोखंदळ महिला वर्गाच्या पसंतीनेही तयार केली जाते. नाशिकजवळ असलेलं येवला हे पैठणीचं ( Paithani ) माहेरघर आहे यात काही शंका नाही. पैठणीचं वैशिष्ट्य म्हणजे ती हातमागावर विणली जाते.
पैठणीला पैठणी का म्हटलं जातं?
पैठणमध्ये तयार होणारी साडी म्हणून पैठणी. मात्र पैठणच्या पैठणीत ( Paithani ) आणि येवल्याच्या पैठणीत ( Paithani ) काहीही फरक नाही. येवल्यातल्या पैठणीत हातमागावर साडी म्हणजेच पैठणी तयार करणारे कारखानदार मोठ्या प्रमाणावर आहेत. तर पैठणमध्ये सरकारी युनिट आहे. ‘कापसे पैठणी’चे ( Paithani ) सर्वेसर्वा बाळकृष्ण कापसे यांनी एका मुलाखतीत ही माहिती दिली. पैठणमध्ये ७० ते ८० हातमाग आहेत. तर येवल्यात साधारण ५ हजार हातमाग आहेत जिथे पैठणीची निर्मिती केली जाते.
येवल्यात पैठणी तयार होण्याची परंपरा किती जुनी आहे?
कापसे यांनी दिलेल्या माहितीनुसार ४०० वर्षांपासून येवल्यात पैठणी विणली जाते आहे. येवतल्या तयार करण्यात आलेली एक पैठणी ( Paithani ) ११ लाख रुपये या किंमतीला विकली गेली आहे. या पैठणीत सोन्याची जर असते, तसंच नक्षीकाम मोठ्या प्रमाणावर असतं. ही पैठणी तयार करायला दोन कारागीरांना ५ महिन्यांचा कालावधी लागतो. चांदी आणि सोन्याची जर वापरण्यात येते. सर्टिफाईड सोन्याची जर पैठणीला वापरलं जातं. येवल्याची ओरिजनल पैठणी ( Paithani ) हातमागावरच तयार करते. २००१ नंतर हा व्यवसाय वाढला.
सेमी पैठणीचा उगम का झाला?
सेमी पैठणी म्हणजे पैठणीसारखीच साडी, मात्र ती हातमागावर नाही तर मशीनवर तयार केली जाते. अनेक पॅटर्न सेमी पैठणीत तयार होतात. ग्राहकांची गरज असल्याने अशी साडी तयार करण्यात येते. तसंच सेमी पैठणी फक्त महाराष्ट्रातच नाही तर इतर राज्यांमध्येही तयार होते.
हातमागावर विणलेल्या पैठणीची खासियत नेमकी काय?
पैठणीच्या पदराची समोरची बाजू आणि मागची बाजू एक सारखी असते. तसंच पैठणीवरचं डिझाईन हे दोन्ही बाजूने एक सारखं दिसतं. पैठणीचे काठ हे देखील एक सारखे असतात. पैठणीचा कपडा कसा आहे ते स्पर्शानेही कळतं, मात्र त्यासाठी तसा अभ्यास महत्त्वाचा असतो. तसंच सेमी पैठणी आणि पैठणीच्या किंमतीत साधारण सहापटींचा फरक असतो. सेमी पैठणी जर ६ हजारांची असेल तर ओरिजनल पैठणी ७० ते ७५ हजारांच्या घरात असते. पेशवे काळात तयार होणाऱ्या पैठणींचे रंग हे झाडांच्या सालीपासून आणि फुलांपासून तयार केले जात, ज्यांचं आयुष्य चिरकाळ असे. अशी माहितीही कापसे यांनी दिली आहे.
पैठणी कशी तयार केली जाते?
उच्च दर्जाच्या सिल्क कापडाची निवड केली जाते, साडीच्या काठ, पदरांवर जरी काम केलं जातं. सोनं आणि चांदीच्या धाग्यांचा वापर पैठणीत केला जातो. सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे पैठणी हातमागावर विणली जाते. एक साडी विणण्यासाठी साधारण तीन ते पाच महिन्यांचा कालावधीही लागू शकतो. पैठणीची परंपरा महाराष्ट्रात पेशव्यांच्या काळापासून आहे. लग्न समारंभ आणि सांस्कृतिक उत्सवांमध्ये महिला वर्गाची पहिली पसंती याच साडीला असते.