pink moon april 2023 : एप्रिल महिन्यातील पौर्णिमेच्या आकाशात भारतीयांनी अलीकडेच एका अद्भभूत खगोलीय घटनेचा अनुभव घेतला. यावेळी रात्री आकाशात चंद्र रोजच्या पेक्षा आकाराने मोठा दिसला. या घटनेला पिंक मून असे म्हटले जाते. हनुमान जयंतीला म्हणजे ६ एप्रिल रोजी भारतीयांना पिंक मून पाहता आला. ही एक खगोलीय घटना आहे ज्यादरम्यान चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो. ज्यामुळे चंद्राचा आकार खूप वाढतो आणि तो तेजस्वी दिसतो.
आपल्याकडे एप्रिल महिन्यात वसंत ऋतू सुरू असतो. वसंतातील पौर्णिमेच्या चंद्राला पिंक मून किंवा गुलाबी चंद्र म्हटले जाते. यावेळी प्रत्यक्षात चंद्राचा रंग हा गुलाबी दिसत नाही, तरी या घटनेला पिंक मून या नावानेच ओळखले जाते. मग पिंक मून हे नाव कसे पडले जाणून घेऊ..
पिंक मून हे एप्रिलमध्ये येणाऱ्या पौर्णिमेला उगवणाऱ्या चंद्राला देण्यात आलेले टोपण नाव आहे. पण हे नाव चंद्राच्या रंगावरून नाही तर वसंत ऋतूत जगात वेगवेगळ्या ठिकाणी फुलणाऱ्या गुलाबी रानफुलांमुळे पडले आहे. वसंत हा अनेक झाडं तसंच वनस्पतींचा बहरण्याचा काळ आहे.
विशेषत: अमेरिकेत या हंगामात फ्लॉक्स सुबुलाटा नावाच्या फुलांना बहर येतो, ही रानफुलं गडद गुलाबी छटांनी फुललेली दिसतात. या फुलामुळेच पौर्णिमेला दिसणाऱ्या चंद्राला पिंक मून म्हटले जाते. या फुलांच्या गडद रंगामुळे याला मॉस पिंक असे देखील म्हणतात. या काळात चंद्र नेहमीपेक्षा १४ टक्क्यांनी मोठा आणि ३० टक्क्यांनी अधिक चमकतो.
कार्डिफ युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ फिजिक्स अँड अॅस्ट्रॉनॉमीच्या डॉ ख्रिस नॉर्थच्या म्हणण्यानुसार, पूर्वीच्या काळी लोकांनी विशिष्ट पौर्णिमेला विविध नावं दिली आहेत ज्यात आश्चर्याची गोष्ट नाही.
कारण मानवाने जेव्हा पहिल्यांदा आकाशाकडे पाहिले तेव्हापासून तो चंद्र आणि इतर खगोलीय वस्तूंनी आकर्षित झाला. याच खगोलीय घटनांनुसार तो आपली कार्य निश्चित करु लागला. जसे की, शेतीची कामे, प्रवासाची वेळ, शिकार
मेन फार्मर्स पंचांगाने 1930 च्या दशकात पौर्णिमेची नावे प्रकाशित करण्यास सुरुवात केली, तेव्हापासून पिंक मून हे नाव व्यापक सांस्कृतिक स्थानिक भाषेत दाखल झाले. अंतराळ इतिहासकार ओस्नाट कॅटझ यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितल्यानुसार, पंचांगाने नावांची यादी प्रकाशित करण्यास सुरुवात करण्यापूर्वी जगभरातील विविध संस्कृतींमध्ये पौर्णिमेला वेगवेगळी नावे देण्यात आली होती.
या पौर्णिमेच्या घटनेला अमेरिकेत स्प्राउटिंग ग्रास मून, एग मून आणि फिश मून नावानेही ओळखले जाते. ख्रिश्चन कॅलेंडरनुसार, गुलाबी चंद्र पास्कल मून म्हणून ओळखला जातो. हे इस्टरच्या आगमनाचे संकेत आहे. यहुदी धर्मात या घटनेला पेसाच किंवा पासओव्हर मून आणि बौद्ध धर्मात बाक पोया म्हणून ओळखले जाते. याशिवाय हिंदू धर्मात या सुमारास हनुमान जयंतीचा सण साजरा होतो.