Pustakanch Gaav In Maharashtra: अगदी ट्रेन, बसने प्रवास करताना ते सुट्टीच्या दिवशी बाल्कनीत निवांत बसून पुस्तक वाचण्याचा अनेकांचा छंद असतो. मराठी, इंग्रजी, हिंदी आदी कोणत्याही भाषेतील पुस्तक ह्यांच्या हातात द्या ते तुम्हाला काही दिवसांत त्याचे वाचन पूर्ण करून तुमच्याकडे परत सोपवतील. तसेच या पुस्तकातील एखादी महत्वाची गोष्ट इतरांपर्यंत पोहचवण्यातही या पुस्तक प्रेमींना स्वर्गसुख असते. पण, तुम्हाला माहिती आहे का महाराष्ट्रात असं एक गाव आहे जे ‘पुस्तकांच गाव’ म्हणून ओळखलं जाते? नाही… तर त्याचबद्दल आपण या लेखातून सविस्तर जाणून घेऊ या…

पाचगणी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण आहे. पाचगणी हे महाबळेश्वर पासून जवळ १८ कि.मी.अंतरावर आहे. तर महाबळेश्वर व पाचगणीजवळ एक भिलार नावाचे गाव आहे. भिलार हे गाव जगाच्या नकाशावर ‘पुस्तकांचे गाव’ म्हणून ओळखले जाते. कारण – या गावातील प्रत्येक घरात एक ग्रंथालय (लायब्ररी) आहे. २०१७ मध्ये महाराष्ट्र सरकारने हा अनोखा उपक्रम सुरु केला आणि २५ घरांमध्ये १५ हजारहून अधिक पुस्तकांसह गावाला साहित्यिक केंद्रात रूपांतरित केलं.

हेही वाचा…Pune Vitthal Temple : पुण्यातील या मंदिरात घडल्या असंख्य ऐतिहासिक घटना; काय आहे विठोबा मंदिराचा रंजक प्रवास; जाणून घ्या

प्रतीक्षा जैस्वाल @bingelife या युजरने शेअर केलेल्या इन्स्टाग्राम व्हिडीओ नुसार, भिलार या गावात मराठी संस्कृतीला खूप मान देण्यात आला आहे. मराठीचा वारसा आणखीन पुढे नेण्यासाठी मंदिरे, शाळा, घरांमध्ये तुम्हाला छोटं ग्रंथालय (लायब्ररी) पाहायला मिळेल ; या ग्रंथालयांमध्ये कविता, इतिहास, पर्यावरण आणि बऱ्याच गोष्टींची मराठीत पुस्तके उपलब्ध आहेत. या गावाला भेट देणारे पर्यटक येथील या छोट्या-छोट्या ग्रंथालयांमध्ये फिरू शकतात, ही पुस्तके फ्री (मोफत) वाचू शकतात आणि तेथील स्थानिक रहिवाशांशी संवाद देखील साधू शकतात. काही घरांमध्ये वाचकांना मुक्काम करण्याची सोय, तर वाचकांना चहा-कॉफी किंवा नाश्ता माफक दरामध्ये दिला जातो. याव्यतिरिक्त या गावात नियमित साहित्यिक कार्यक्रम, कार्यशाळा, नामवंत लेखकांच्या भेटी-गाठी, अभिवादन सत्रे आयोजित केली जातात ; त्यामुळे हे पुस्तक प्रेमी व सांस्कृतिक रसिकांसाठी एक आश्रयस्थान बनते.

भारतातील पहिलीच नावीन्यपूर्ण कल्पना :

राज्य सरकारचा मराठी भाषा विभाग आणि राज्य मराठी विकास संस्था यांच्यातर्फे भिलारमध्ये पुस्तकांच गाव ही भारतातील पहिलीच नावीन्यपूर्ण कल्पना साकारली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘पुस्तकाच्या गावा’चे उद्घाटन झाले होते. भिलारच्या ग्रामपंचायतीने ठराव करून साडेतीन एकराची जागा सरकारकडे हस्तांतरित केली आहे. या प्रकल्पामध्ये निवड झालेल्या प्रत्येक घराला प्रत्येकी एक लाख रुपयांचे अनुदान देण्यात आले. तर पहिल्या टप्प्यात पुस्तकांचे कपाट, रॅक आणि पुस्तकांच्या खरेदी यासाठी ८० हजार रुपये देण्यात आले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जर तुम्ही या गावाला भेट दिली असेल तर तुमचा अनुभव कसा होता ? तुम्हाला महाराष्ट्रातील ‘पुस्तकाचं गाव’ या गावाला भेट द्यायला आवडेल का, हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा.