सरकारकडून सर्वसामान्यांकरिता अनेक लहान बचत योजना चालवल्या जातात. गुंतवणूकदार आणि मध्यम ते कमी उत्पन्न गट यांच्यामध्ये बचतीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने याची सुरुवात केली आहे. या योजनांकरिता सरकार दर तिमाहीत व्याजदर निश्चित करते. उदाहरणार्थ- एप्रिल ते जून २०२५ या चालू तिमाहीसाठीचे दर ३१ मार्च रोजी जाहीर करण्यात आले. लहान बचत योजना काय आहेत? सरकार कोणत्या आधारावर दर निश्चित करते? या योजनांची वैशिष्ट्ये काय? या योजना कोणत्या? त्याविषयी जाणून घेऊ…
लहान बचत योजना म्हणजे काय?
बचत योजना लोकांमध्ये लोकप्रिय आहेत. या योजनांमध्ये बँक मुदत ठेवींपेक्षा जास्त परतावा मिळतो. त्यांना हमी आणि कर लाभदेखील मिळतात. २०१६ पासून अर्थ मंत्रालय तिमाही आधारावर लहान बचत योजनांवरील व्याजदरांचा आढावा घेत आहे. विविध लहान बचत योजनांतर्गत प्राप्त झालेल्या सर्व ठेवी राष्ट्रीय लघु बचत निधीमध्ये जोडल्या जातात. निधीतील हे पैसे केंद्र सरकार त्यांच्या वित्तीय तूट भरून काढण्यासाठी वापरते.
लहान बचत योजनांची प्रमुख वैशिष्ट्ये कोणती?
- कमी जोखीम (भारत सरकारद्वारे समर्थित)
- स्थिर आणि आकर्षक व्याजदर (दर तिमाहीत)
- सर्व नागरिकांसाठी उपलब्ध
- काही योजनांसाठी कलम ८० सी अंतर्गत कर लाभ
भरघोस परतावा देणाऱ्या लहान बचत योजना कोणत्या?
पोस्ट ऑफिस ठेवी : या ठेवींमध्ये बचत ठेव, आवर्ती ठेव, मुदत ठेवी व मासिक उत्पन्न खाते यांचा समावेश आहे. मुदत ठेवीचा कालावधी १, २, ३ व ५ वर्षे इतका आहे. सध्या तीन वर्षांच्या ठेवीसाठी व्याजदर प्रतिवर्ष ७.१ टक्के आहे आणि एक वर्षाच्या ठेवीसाठी ६.९ टक्के आहे. बचत ठेवीवर सध्या वार्षिक ४ टक्के व्याज देते. आवर्ती ठेवीवर पाच वर्षांच्या कालावधीसाठी ६.७% व्याजदर आहे. मासिक उत्पन्न खाते ही एक जोखीममुक्त गुंतवणूक आहे, कमी जोखीम असलेली गुंतवणूक आहे, जी ७.४०% व्याजदर देते.
बचत प्रमाणपत्रे : राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र आणि किसान विकास पत्र ही बचत प्रमाणपत्रे आहेत. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र हा पाच वर्षांच्या कालावधीचा सर्वसमावेशक कार्यक्रम आहे. दरवर्षी ही योजना ७.७% दराने व्याज देते आणि पाच वर्षांच्या शेवटी एकरकमी व्याज दिले जाते. बचत प्रमाणपत्र एनएससी आयकर कायद्याच्या कलम ८०सी अंतर्गत कर बचतीसाठीदेखील पात्र आहे. किसान विकास पत्र सर्वांकरिता आहे. ही योजना लोकांमध्ये दीर्घकालीन गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती. त्यात दरवर्षी ७.५% परतावा मिळतो. किसान विकास पत्र योजनेची किमान गुंतवणूक रक्कम १,००० रुपये आहे आणि कोणतीही कमाल मर्यादा नाही.
सामाजिक सुरक्षेच्या योजना : सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ), सुकन्या समृद्धी खाते व ज्येष्ठ नागरिक बचत या योजना सामाजिक सुरक्षा योजनेचा भाग आहेत. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी ही समृद्ध भविष्य सुनिश्चित करण्यासाठीची एक लोकप्रिय बचत योजना आहे. ही योजना दरवर्षी ७.१% व्याजदर देते आणि ही योजना गुंतवणूक आयकर कायद्याच्या कलम ८०सी अंतर्गत करमुक्तीसाठी पात्र आहे. या योजनेचा कालावधी १५ वर्षे आहे. जमा झालेली रक्कम आणि मिळणारे व्याज काढताना करातून सूटदेखील मिळते.
सुकन्या समृद्धी योजना २०१५ मध्ये बेटी बचाओ, बेटी पढाओ मोहिमेंतर्गत केवळ मुलींसाठी सुरू करण्यात आलेली विशेष योजना आहे. या योजनेत सामील होण्यासाठी मुलीचे वय १० वर्षांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. ही योजना दरवर्षी ८.२% परताव्याची हमी देते आणि आयकर कायद्याच्या कलम ८०सी अंतर्गत कर करमुक्तीसाठी पात्र आहे. ठेवीचा कालावधी खाते उघडल्याच्या तारखेपासून २१ वर्षे आहे आणि या योजनेत एका वर्षात जास्तीत जास्त १.५ लाख रुपये गुंतवता येतात. ज्येष्ठ नागरिक बचत योजना ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींसाठी आहे. त्यावर ८.२% वार्षिक व्याजदर मिळतो. बचत खात्यात दर तीन महिन्यांनी एकदा व्याज जमा केले जाते. ही योजनादेखील गुंतवणूक आयकर कायद्याच्या कलम ८०सी अंतर्गत करमुक्तीसाठी पात्र आहे.