scorecardresearch

भारतात एकूण किती प्रकारची कारागृहे आहेत; त्यात कैदी कसे राहतात, काय करतात? जाणून घ्या

कारागृहात कैदी काय करतात, कसे राहतात आणि त्यांचा दिनक्रम कसा असतो जाणून घ्या.

types of prisons in india Central jail District jail Sub jail Open jail Special jail Womens jail read more information on indian prison system
भारतात किती प्रकारची कारागृहे आहेत? (लोकसत्ता ग्राफिक्स)

कारागृह हे कैद्यांसाठी असले तरी त्याबद्दल जाणून घेण्याची अनेकांना इच्छा असते. कारागृह कसे असते, तिथे कैदी काय करतात आणि कारागृहातील त्यांच्या आयुष्याबद्दलच्या अनेक गोष्टी आजवर आपण फक्त चित्रपट, मालिकांमध्येच पाहत आलो किंवा ऐकत आलो. शिक्षा भोगत असलेले कैदी कारागृहातील दिवस आणि रात्र कशी मोजतात, तसेच जन्मठेपेची शिक्षा झाली तर १४ वर्षे कारावास कसा भोगतात हे पण केवळ ऐकून आहोत. त्यामुळे कारागृहाविषयी पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी गुन्हेगार म्हणून नाही पण एक सामान्य व्यक्ती म्हणून एकदा तरी कारागृह आतून पाहायला मिळावं अस वाटते. त्यामुळे आम्ही तुम्हाला भारतात किती प्रकारचे कारागृहे आहेत? त्या कारागृहात कैदी कसे राहतात? काय खातात? काय काम करतात त्याचा किती मोबदला मिळतो? अशा तुरुंगातील कैद्यांच्या जीवनाविषयीच्या प्रश्नांची उत्तर जाणून घेणार आहोत…

कारागृह हा संबंधित राज्याचा विषय असतो. त्यामुळे प्रत्येक राज्यांमध्ये कारागृहाचे नियम वेगळे आहेत. राज्यांची कारागृहासंबंधी स्वत:ची काही मार्गदर्शक तत्वे, नियम आहेत. ही मार्गदर्शक तत्वे एका पुस्तकाच्या स्वरुपात असून ज्यात कारागृहातील कैद्यांसाठी नियम आणि कायदे लिहिलेले असतात. त्यानुसार कारागृह प्रशासन काम करते. यात कारागृहातील कैद्यांचे राहणे, खाणे, कामाची पद्धत ते फाशीपर्यंत सर्व नियम निश्चित केलेले आहेत.

भारतात एकूण किती प्रकारची कारागृहे आहेत? त्यात फरक काय आहे?

विविध कैद्यांना ठेवण्यासाठी भारतात एकूण ८ प्रकारची कारागृहे आहेत. कारागृह हा प्रत्येक राज्याचा विषय असल्याने ते प्रत्येक राज्य सरकारांच्या अखत्यारित येतात. कैद्यांची सुरक्षा, राहण्याची व्यवस्था, वैद्यकीय सुविधा यासाठी राज्य सरकार वेळोवेळी केंद्र सरकारकडून मदत घेते.

मध्यवर्ती कारागृह

मध्यवर्ती कारागृह हे सर्वात प्रमुख आणि मोठे कारागृह असते. ज्या कैद्यांना दोन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झाली आहे किंवा ज्यांनी गंभीर गुन्हे केले आहेत त्यांना मध्यवर्ती कारागृहात ठेवले जाते. कारागृहात बंदिस्त कैदी येथे काम करुन पैसे कमावू शकतात. इतर कारागृहांच्या तुलनेत मध्यवर्ती कारागृहात कैद्यांना ठेवण्यासाठी अधिक जागा असते. यामुळे हजारो कैदी येथे राहतात. एकट्या मध्यप्रदेश राज्यात सर्वाधिक म्हणजे ११ मध्यवर्ती कारागृहे आहेत. महाराष्ट्र, राजस्थान, तामिळनाडू आणि पंजाबमध्ये एकूण ९ मध्यवर्ती कारागृहे आहेत. याशिवाय दिल्ली आणि कर्नाटकमध्ये ८ कारागृहे आहेत. मात्र अरुणाचल प्रदेश आणि मेघालय सारख्या राज्यात एकही मध्यवर्ती कारागृह नाही.

जिल्हा कारागृह

जिल्हा कारागृह आणि मध्यवर्ती कारागृहात फारसा फरक नसतो. ज्या राज्यांमध्ये मध्यवर्ती कारागृह नाहीत त्या राज्यांमध्ये जिल्हा कारगृहे हे मध्यवर्ती कारागृह म्हणून काम करतात. उत्तर प्रदेश राज्यात सर्वाधिक जिल्हा कारागृहे आहेत.

उप कारागृह

उप कारागृह त्याला इंग्रजीत सब जेल म्हणून ओळखले जाते. भारतातील उप कारागृहे उपविभागीय स्तरावरील तुरुंगांची भूमिका बजावतात. महाराष्ट्रात सर्वाधिक सब-जेल आहेत. आणि हरियाणा, मेघालय, मणिपूर या राज्यांमध्ये सब जेल नाही.

खुले कारागृह

भारतातील बहुतेक राज्यांमध्ये खुले कारागृहे आहेत. या कारागृहांमध्ये अशी व्यवस्थी आहे जिथे कैद्यांना दिवसाबाहेर कामासाठी जाण्याची परवानगी दिली जाते आणि रात्री ते पुन्हा तुरुंगात परत जातात. त्यांना कामाचा मोबदला दिला जातो व त्यातून ते आपल्या कुटुंबियांना पैसे पाठवू शकतात. खुल्या कारागृहातील कैद्यांना तुरुंगाच्या भिंतींचे बंधन नसल्यामुळे ते वसतीगृहात राहिल्याप्रमाणे राहतात. येथे सुरक्षा व्यवस्थाही कमी असते. ज्या कैद्यांची वागणूक चांगली आहे आणि जे नियमांची पूर्तता करतात अशा कैद्यांना या कारागृहात ठेवले जाते.

मध्यवर्ती कारागृहातील कैद्याची वर्तवणूक चांगली असेल तर त्याला खुल्या कारागृहात पाठले जाऊ शकते. इंग्रजांच्या राजवटीत भारतात खुले कारागृह सुरू झाले. 1905 मध्ये मुंबईत पहिले खुले कारागृह सुरू झाले. तेव्हापासून भारतातील विविध राज्यांमध्ये खुले कारागृह तयार करण्यात आली. महाराष्ट्रात तीन खुली कारागृहे आहेत.

विशेष कारागृह इतर कारागृहांपेक्षा वेगळे का आहे?

विशेष कारागृह या नावावरूनचं अर्थ स्पष्ट होतो की, हे कारागृह गंभीर गुन्ह्यातील कैदींसाठी बनवण्यात आले आहे. या कारागृहात घुसखोर आणि दहशतवाद्यांना ठेवले जाते. या कारागृहांमध्ये कडेकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात येतो. महाराष्ट्र, केरळ या राज्यांमध्ये अशी कारागृहे आहेत.

बाल सुधारगृह

एखाद्या गुन्ह्यातील अल्पवयीन आरोपीस बाल सुधारगृहात ठेवले जाते. बाल सुधारगृह हे एक प्रकारचे यूथ डिटेंशन सेंटर असते. येथे अल्पवयीन आरोपींच्या कल्याण आणि पुनर्वसनावर भर दिला जातो. त्यांना तुरुंगातील वातावरणापासून दूर ठेवले जाते. या अल्पवयीन आरोपींना गुन्हेगारीपासून दूर ठेवण्यासाठी आणि रोजगार मिळवून देण्यासाठी शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. त्यांना पुन्हा कोणताही गुन्हा करण्यापासून रोखण्यावर भर दिला जातो.

आपल्या देशात महिला कैद्यांसाठी स्वतंत्र कारागृहे आहे, ज्याला महिला कारागृह असे म्हणतात. या कारागृहातील खास गोष्ट म्हणजे येथे काम करणाऱ्या सर्व महिलाच असतात. याठिकाणी महिला कैद्यांसह लहान मुलेही राहू शकतात. या कारागृहांशिवाय आपल्या देशात इतरही अन्य कारागृहे आहेत. भारतात फक्त तीन अन्य कारागृहे आहेत. ही कर्नाटक, महाराष्ट्र आणि केरळमध्ये आहे. या तीन राज्यांशिवाय भारतातील कोणत्याही राज्यात अन्य कारागृहे नाहीत.

कैद्यांचे खाणं आणि दिनक्रम कसा असतो?

कारागृहातील आवारात कैद्यांसाठी प्रशासनाकडून जेवण दिले जाते. तसेच आवारात उपहारगृहे असतात जिथे कैद्यांना आपल्या कमाईतून खाण्यापिण्याची सोय असते. यामुळे कैद्यांना काम करण्यास प्रोत्साहन मिळते. सद्वर्तन, रक्तदान, साफसफाई आणि शारीरिक शिक्षणामुळे शिक्षेच्या मुदतीत कपात केली जाते. मध्यम आणि दीर्घ मुदतीच्य कैद्यांनी त्यांची आवडनिवड आणि त्याची प्रकृती लक्षात घेत हातमागावरचे किंवा इतर काम, विणकाम, धोबीकाम, सुतारकाम, बागकामाचे प्रशिक्षण दिले जाते.

कारागृहात साक्षरतेचे वर्ग चालवले जातात. ज्यात बाहेरील परीक्षेस बसणाऱ्यांना सवलत दिली जाते. काही कारागृहात वाचनालयाचीही सोय असते. परंतु या सवलती गुन्हेगाराच्या गुन्ह्यानुसार बदलणाऱ्या असतात.

कैद्यांच्या दैनंदिन कामाचे वेळापत्रक पहाटे ५.१५ ते रात्री ९.३० वाजेपर्यंत असते. यात प्रत्यक्ष कामाची वेळ सकाळी ८.३० ते १०.४५ आणि ११.४५ ते सायंकाळी ४.१५ एवढी असते. उरलेल्या वेळेत प्रार्थना, खेळ, व्यायाम, जेवण आणि इतर दैनंदिन कामं उरकली जातात.

मराठीतील सर्व FYI ( Do-you-know ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-03-2023 at 12:23 IST
ताज्या बातम्या