Madhya Vithoba Temple : वारकऱ्यांचे दैवत म्हणजे विठ्ठल. हे दैवत विठ्ठल, पांडुरंग, पंढरीनाथ अशा अन्य नावांनी प्रसिद्ध आहे. आषाढ महिन्याच्या एकादशीला पंढरपूरमध्ये वैष्णवांचा मेळा असतो. तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून येणाऱ्या वारकरांच्या वारीला भारतीय संस्कृतीत एक अनोखं स्थान आहे. यंदा १७ जुलै २०२४ रोजी आषाढी एकादशी आहे. तर यानिमित्त आज आपण पुण्याच्या प्राचीन विठ्ठल मंदिराबद्दल ( Vitthal Temple ) जाणून घेणार आहोत.

पुण्याच्या अलका टॉकीज चौकात विठ्ठलाचं एक पुरातन मंदिर आहे. या मंदिराचं नाव ‘लकडी पूल विठोबा मंदिर’ असं आहे. पण , या मंदिराला फक्त याच नावानं ओळखलं जातं का? तर नाही… या मंदिराला ‘मढ्या विठोबाचं मंदिर’ म्हणनूही ओळखलं जायचं. लोकसत्ता डॉट कॉमनं ‘गोष्ट पुण्याची’ या मालिकेच्या शूटदरम्यान या प्रसिद्ध मंदिराला भेट दिली आणि मढ्या विठोबा मंदिर हे नाव या मंदिराला का पडलं याबद्दल जाणून घेतलं. त्याचबद्दल या लेखातून सविस्तर जाणून घेऊ.

जोशीपंत बुवा यांनी एक संकल्प केला होता. तो संकल्प असा होता की, ते १०८ मंदिरं बांधतील आणि त्यांनी त्या संकल्पादरम्यान बांधलेल्या १०८ मंदिरांपैकी एक म्हणजे ‘मढ्या विठोबाचं’ हे मंदिर होय. पूर्वी या मंदिराचं आवार खूप प्रशस्त होतं. मंदिराच्या आवारात एक मोठं वडाचं झाड आणि अनेक गोष्टी होत्या. मात्र, काळाच्या ओघात रस्तारुंदीकरणात त्या नष्ट झाल्या. मात्र, पूर्वी जेव्हा लोक प्रेत जाळण्यासाठी घाटावर यायचे. त्यावेळी या वडाच्या झाडाखाली म्हणजेच देवळात ते विसावा घ्यायचे आणि म्हणूनच या विठोबाला मढ्या विठोबा, असं नाव पडलं.

हेही वाचा…दुसऱ्या बाजीरावांमुळे झाला होता का पेशवाईचा अंत? जाणून घ्या पुण्यातील ‘शनिवार वाड्याची’ रंजक गोष्ट

डॉक्टर शा. ग. महाजन लिखित ‘पुणे शहरातील मंदिरं’ या पुस्तकातील माहितीनुसार पेशव्यांकडून या मंदिराला नंदादीपासाठी वार्षिक ३८ रुपये देण्यात यायचे; मात्र १९३९ पासून ही देणगी बंद करण्यात आली. असं करण्यामागचं कारण असं सांगितलं जातं की, या मंदिरात सूट-बूट घातलेल्या गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती. पण, पुढे काही वर्षांनंतर ही मूर्ती मंदिरातून काढून टाकण्यात आली होती.

तसेच या मंदिरात अनेक ऐतिहासिक घटनासुद्धा घडल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे रँडच्या खुनाचा कट. लोकमान्य टिळक, चाफेकर बंधू यांनी याच मढ्या विठोबाच मंदिरात रँडच्या खुनाचा कट रचला होता. त्याशिवाय पंडित भीमसेन जोशीदेखील या मंदिरात यायचे आणि तासन् तास रियाज करायचे. त्यामुळे मढ्या विठोबाचं मंदिर अनेक ऐतिहासिक घटनांचं साक्षीदार आहे, असं म्हटलं जातं.

व्हिडीओ नक्की बघा…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता हे मंदिर ‘लकडी पूल विठ्ठल मंदिर’ म्हणून ओळखलं जातं. या विठ्ठलाच्या मंदिरात विठ्ठल-रुक्मिणीच्या सुंदर मूर्ती, महादेवाची पिंड, लक्ष्मीनारायणाची संगमरवरी प्राचीन मूर्ती व इतर देवी-देवतांच्या काही पाषाणाच्या, तर काही संगमरवरी मूर्ती आहेत. या मूर्ती अत्यंत आकर्षक असून, भक्तांची या देवतांवर अपार श्रद्धा आहे. श्री लकडी पूल विठ्ठल मंदिर ट्रस्टचे कार्याध्यक्ष दिलीप निवृत्ती बांदल यांनी दिलेल्या माहितीनुसार मंदिरात अनेक उत्सव साजरे होतात. दिंडी, पालखीच्या वेळी मंदिराचं रूप बघण्यासारखं असतं. तर, आज आपण या लेखातून पुण्याच्या अलका टॉकीज चौकातील विठ्ठलाच्या पुरातन मंदिराबद्दलची माहिती जाणून घेतली.