Soan Papdi Real Name, Recipe History: सोशल मीडियावर आतापर्यंत तुम्ही सोनपापडीवरून अनेक मजेशीर मीम्स पाहिले असतील, शेअरही केले असतील. दिवाळीत प्रत्येक घरात आजही सोनपापडीशिवाय सेलिब्रेशन पूर्ण होतच नाही. ऑफिसमधून दिवाळीच्या बोनससह दिली जाणारी, आपल्याकडे जास्त आलीये म्हणून पाहुण्यांकडे पुढे ढकलण्यात येणारी, अशी ही सोनपापडी भारतात प्रसिद्ध असली तरी तिची सुरुवात भारतातून झालेली नाही. आज सोन पापडी म्हणून ती प्रत्येकाच्या ओळखीची असली तरी हे या मिठाईचे खरे नावही नाही. मग नेमकी ही दिवाळीची खासियत असणारी मिठाई आली कुठून, प्रसिद्ध झाली कशी आणि सर्वात महत्त्वाचं या मिठाईचं खरं नाव काय? या सगळ्याविषयी आपण थोडक्यात सोपं उत्तर जाणून घेऊया.
सोन पापडी प्रसिद्ध होण्याचे मुख्य कारण काय?
पुरातत्वशास्त्रज्ञ आणि पाककृती मानववंशशास्त्रज्ञ कुरुश दलाल यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, भारतात दुधापासून बनलेली मिठाई प्रसिद्ध आहे मात्र दुधापासून बनवलेले पदार्थ लवकर खराब होतात. मुख्यतः सणाच्या वेळी घरात इतरही पदार्थ बनवलेले असताना सर्व मिठाई वैधता संपण्याआधी खाणे शक्य होत नाही. सोनपापडीच्या बाबत मात्र हा प्रश्न उद्भवत नाही. सोनपापडी अनेक दिवस टिकते. शिवाय, दुधापासून बनलेली मिठाई किमतीने थोडी महाग असते. खरंतर सोनपापडीतही दूध असलं तरी अन्य महाग सामग्रीची गरज पडत नाही. सोनपापडीच्या चवीचा मुख्य घटक वेलची असते. वेलची महाग असूनही तिचा वापर कमी केला तरी चव येते. त्यामुळे स्वस्त व मस्त असा सोनपापडीचा पर्याय प्रसिद्ध झाला आहे.
सोनपापडीचे खरे नाव काय?
कुरुश एफ दलाल यांनी सांगितले की,“सोन पापडी हा पदार्थ मूळ पर्शियन आहे. ‘सोहन पश्माकी’ या शब्दापासून सोनपापडी हे नाव प्रसिद्ध झाले. चौकोनी आकाराचे, कुरकुरीत आणि अनेक थर असणारी या पदार्थाची रचना असते. यामध्ये मुख्य सामग्री बेसन (चणाडाळीचे पीठ) असल्याने सोनपापडी पटकन खराब होत नाही.
हे ही वाचा<< World Cup: पाकिस्तानच्या मदतीला NRR धावणार? नेट रन रेट म्हणजे काय, मोजायचा कसा? पाहा सोपा फॉर्म्युला
सोनपापडीचा इतिहास पाहिल्यास, सोन पापडीला ‘सान पापरी’, ‘शोंपापरी’, ‘सोहन पापडी’, ‘शोन पापडी’ आणि ‘पाटीसा’ म्हणूनही ओळखले जाते. ‘सोहन’ या शब्द मूळ फारसी आहे त्याचा अपभ्रंश होत त्याला सोनपापडी असं नाव देण्यात आलं.