बाओबाब नावाचे झाड हे जगातील सर्वात आगळेवेगळे असे झाड आहे. महाकाय उंची, आडदांड आणि फुगीर खोड व झाडावर मुळांसमान आकारात असलेल्या फांद्या अशा सर्व विचित्र वैशिष्ट्यांमुळे या झाडाला उलटे झाड म्हणजेच, ‘अपसाईड डाऊन’ झाड म्हणून ओळखले जाते.

परंतु, नेचर नावाच्या एका जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका नवीन अभ्यासातून या चमत्कारिक झाडामागचे मूळ, जगभरात झालेला त्यांचा प्रसार आणि मोठ्या आकाराचे कीटक [हॉकमॉथ], वटवाघूळ लेमूर यांसारख्या वन्यजीवांसाठी कसे पोषक ठरते याबद्दल माहिती देणारा हा लेख आहे.

हेही वाचा : घाटकोपर, विद्याविहार, कुर्ला मध्य रेल्वेवरील या स्थानकांना कशी मिळाली त्यांची नावे? जाणून घ्या

अपसाईड डाऊन झाड :

बाओबाब हे दुष्काळाच्या काळात पाणी साठविणाऱ्या आणि फुगलेल्या खोडांच्या झाडाच्या वंशातील एक झाडाचा प्रकार आहे. ही झाडे अतिशय उंच आणि प्रचंड आकारात वाढतात. इतकेच नाही तर या झाडांचे आयुष्यदेखील अनेक वर्षांचे असू शकते. या वंशातील काही झाडे तर हजारो वर्षांपासून या पृथ्वीवर असल्याचेदेखील बीबीसीच्या एका लेखावरून समजते.

मानवासह इतर अनेक प्राण्यांसाठी हे झाड अन्न, निवारा आणि पाण्याची गरज पूर्ण करत असून, हे पर्यावरणासाठीदेखील तितकेच महत्त्वपूर्ण आहे. या झाडाची फळे, साल, पानं यांचे सांस्कृतिक महत्त्व असून, यांचा वापर पारंपरिक औषधांमध्ये आणि स्वयंपाक करण्यासाठी केला जातो. हे झाड रखरखीत प्रदेशातील असूनही पोषण देते, आपल्यातील लवचिकता दाखवते; त्यामुळे या झाडाला ‘ट्री ऑफ लाईफ’ या नावानेही ओळखले जाते.

या झाडाच्या आठ प्रजाती असून त्या आफ्रिका, मादागास्कर आणि ऑस्ट्रेलियाच्या प्रदेशांमध्ये पसरलेल्या आहेत. परंतु, या झाडाचे मूळ काय आणि त्या प्रदेशातून हे झाड इतर भागांमध्ये कसे पोहोचले? या प्रश्नांचे उत्तर अखेरीस आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या टीमला सापडले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

बाओबाब झाड :

वुहान बोटॅनिकल गार्डन (चीन), रॉयल बोटॅनिक गार्डन्स, केव (यूके), अँटानानारिव्हो विद्यापीठ (मादागास्कर) आणि लंडनच्या क्वीन मेरी युनिव्हर्सिटी (यूके) यांनी केलेल्या एकत्रित अभ्यासातून, शास्त्रज्ञांनी मादागास्करमधील झाडाच्या या प्रजातींच्या उल्लेखनीय प्रसाराची [radiation] नोंद केली असून, त्याच्या पाठोपाठ आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाला यांसारख्या लांब ठिकाणच्या फैलावाबद्दल अभ्यास केला आहे.

शास्त्रज्ञांनी आठ प्रजातींच्या बाओबाब झाडाचे जीनोम [genomes] गोळा करून, त्या जीनोमचे विश्लेषण करण्यापूर्वी त्यांचे स्पेसिएशन पॅटर्न तयार केले. त्यांना अभ्यासातून असे समजले की, या सर्व झाडांच्या आठ वंशाचे वंशज किंवा मूळ हे मादागास्करमधले असून, तिथेच त्यांचे संकरीकरण [hybridization] होत गेले. पुढे या दोन प्रजातींचा जगभरात प्रसार होऊ लागला. त्यातील झाडाची एक जात ही आफ्रिकेत पोहोचली, तर दुसरी ऑस्ट्रेलियामध्ये.

हेही वाचा : आदिमानवाच्या काळातही ‘मुंबई’ शहरात होते कारखाने! काय आहे मुंबई अन् अश्मयुगाचा संबंध जाणून घ्या

जेव्हा त्यांचा प्रसार इतर प्रदेशांमध्ये होत होता, तेव्हा त्या झाडांमध्ये त्यांच्या आजूबाजूच्या प्रदेशानुसार बदल होत गेले. अभ्यासानुसार या झाडांकडे कीटकांना, वटवाघूळांना आणि लेमरसारख्या वन्यजीवांना आकर्षित करण्यासाठी, नवीन प्रदेशांनुसार झाडांच्या फुलांच्या संरचनेत बदल होत गेला.

“मादागास्करमधील बाओबाब प्रजातींच्या पॅटर्नचे तसेच, आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामधील या दोन जातींच्या झाडांवर संशोधन करणाऱ्या प्रकल्पावर आम्हाला सहभागी होता येणं हे खूप भाग्याचे आहे असे वाटते”, असे लंडन येथील क्वीन मेरी युनिव्हर्सिटीमधील प्राध्यापक अँड्र्यू लीच यांचे म्हणणे आहे, असे बीबीसीच्या एका लेखावरून समजते.

“या संशोधनामध्ये हॉकमॉथ [कीटक], लेमर आणि वटवाघळांमधील पॉलिनेशन सिंड्रोमचादेखील समावेश करण्यात आला होता”, असे अँड्र्यू म्हणतात. “या प्रकल्पामुळे बाओबाब झाडांच्या वैशिष्ट्यांच्या पॅटर्नमधील नवीन माहितीवर प्रकाश टाकण्यास उपयुक्त ठरते. इतकेच नाही, तर यामुळे लाखो वर्षांमधील झालेल्या हवामानबदलाचा परिणाम या प्रजातींच्या झाडांवर कशा पद्धतीने झाला आहे हेदेखील समजण्यास मदत होते”, असे रॉयल बोटॅनिक गार्डन केव येथील, डॉ. इलिया लीच यांचे म्हणणे आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा अभ्यास वा संशोधन ‘मादागास्करमधील बाओबाब ट्रीजचा उदय’ [The rise of baobab trees in Madagascar’] या पेपरमध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे, असे बीबीसी वाईल्डलाईफच्या एका लेखावरून समजते.