Bank Locker : महत्त्वाची कागदपत्रे किंवा दागिण्यांसारख्या मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी बॅंक लॉकर ही सर्वात सुरक्षित अशी जागा मानली जाते. तुमच्या परिचयातील अनेकांना तुम्ही बॅंक लॉकरचा वापर करताना बघितलंही असेल. मात्र, बॅंक लॉकर नेमकं काय असतं? ते कुणाला दिलं जातं? लॉकरसाठी योग्य बॅंकेची निवड कशी करावी? लॉकर घेण्यासाठी अटी शर्ती काय असतात? ते कसं वापरलं जातं? आणि महत्त्वाचे म्हणजे त्यासाठी शुल्क आकारलं जातं का? असे अनेक प्रश्न तुम्हालाही पडले असतील, तर या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.
बॅंक लॉकर म्हणजे काय?
लॉकर ही बॅंकेतील अशी जागा असते, जिथे तुम्ही तुमचे दागिणे, एखादी वस्तू किंवा महत्त्वाची कागदपत्रे ठेवू शकता. मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी बॅंक लॉकर हा सर्वात सुरक्षित असा पर्याय मानला जातो. या लॉकरची एक चावी ग्राहकांना दिली जाते. तर अन्य एक चावी ही बॅंकेकडे असते. तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही या लॉकरमधील वस्तू काढू शकता किंवा पुन्हा ठेवू शकतात. लॉकर वापरण्याचे नियम बॅंकेनुसार बदलू शकतात.
हेही वाचा – रेशन कार्डसाठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा? आवश्यक कागदपत्रे कोणती, फायदे काय? जाणून घ्या
लॉकरसाठी योग्य बॅंकेची निवड कशी करावी?
देशातील जवळपास सर्वच बॅंका लॉकर सेवा पुरवतात. त्यामुळे लॉकरसाठी बॅंकेची निवड करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. बॅंक निवडताना ती तुमच्या घरापासून जवळ आणि प्रतिष्ठित आहे की नाही, हे तपासावे. तसेच ज्या बॅंकेत तुमचे बचत किंवा चालू खाते आहे, अशी बॅंक निवडण्याचा सल्ला अनेकदा तज्ज्ञांकडून दिला जातो. जर एखाद्या बॅंकेत तुमचे खाते नाही आणि तरीही तुम्हाला त्या बॅंकेची लॉकर सेवा हवी असल्यास, बॅंक तुम्हाला पूर्व अट म्हणून बचत खाते उघडण्यास सांगू शकते. त्यासाठी ग्राहकाला त्याचे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि इतर कागदपत्रे देणं बंधनकारक असते.
लॉकरसाठी बॅंकेबरोबर करार करावा लागतो का?
तुम्हाला लॉकर सेवा हवी असल्यास, बॅंकेबरोबर तसा करार करावा लागतो. हा करार स्टॅम्प पेपरवर केला जातो, ज्यावर ग्राहकांसाठी असलेल्या काही अटी शर्तींचा उल्लेख असतो. या करारावर बॅंक आणि ग्राहक अशा दोघांनाही स्वाक्षरी करावी लागते. हा करार, कायदेशीर बंधनकारक असतो.
लॉकर सेवा घेताना शुल्क आकारला जातो का?
लॉकर सेवा घेण्यासाठी बॅंकेकडून काही शुल्क आकारले जाते. हे शुल्क ठरवण्याचा अधिकार बॅंकेला असतो. प्रत्येक बॅंकेनुसार शुल्क वेगवेगळे असू शकते. काही बॅंका लॉकर सेवा घेतानाच शुल्क भरण्यास सांगतात. तर काही बॅंका तुम्हाला एक विशिष्ट रक्कम खात्यात ठेवण्याचा आग्रह करतात. या शुल्कात वेळोवेळी बदलही होऊ शकतो.
हेही वाचा – Android Mobile : तुमचा फोन खरंच तुमचं बोलणं ऐकतोय माहिती आहे का? हो..! हा घ्या पुरावा!
लॉकर कसं वापरतात?
वर उल्लेख केल्याप्रमाणे, लॉकरच्या दोन चाव्या असतात. त्यापैकी एक ग्राहकाकडे, तर दुसरी चावी बँकेकडे असते. लॉकर उघडण्यासाठी आधी बँक अधिकारी त्यांची चावी वापरतो. त्यानंतर तुम्हाला चावी लावून लॉकर उघडायचा असतो. विशेष म्हणजे लॉकर बंद करताना केवळ ग्राहकांच्या चावीने ते बंद करता येते. ज्या व्यक्तीच्या नावाने लॉकरची नोंदणी केली असते, त्यालाच हे लॉकर वापरण्याची परवानगी दिली जाते. इतर कोणालाही ते वापरता येत नाही.
लॉकरची चावी हरवली तर…
लॉकरची चावी हरवल्यास, त्यासंदर्भात बँकेला तत्काळ माहिती देणं आवश्यक असते. काही दिवसांनंतर बॅंक तुम्हाला नवी चावी देते. मात्र, त्यासाठी वेगळे शुल्क आकारले जाते.
लॉकरसाठी नॉमिनेशन करता येते का?
लॉकरसाठी अर्ज भरतात नॉमिनीचे नाव नोंदवणे गरजेचे असते. त्यानुसार ग्राहकाच्या मृत्यूपश्चात लॉकर वापरण्याची परवानी नॉमिनी असलेल्या व्यक्तीला दिली जाते. ग्राहक परिस्थितीनुसार नॉमिनीच्या नावात बदल करू शकतात.