आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे युवा आमदार आदित्य ठाकरे कोकण दौऱ्यावर होते. येथे त्यांनी खळा बैठक बोलावून एका नव्या संकल्पनेला सुरुवात केली. कोकणात घराबाहेर असलेल्या अगंणाला खळा म्हणतात. हा खळा म्हणजे कोकणातील घरांचं वैभव. परंतु, कालौघात या खळ्याची रचना, संकल्पना, मांडणी आणि उपयोग यात बदल होत गेला. खळा म्हणजे काय? त्याचा उपयोग काय? शेतीसाठी या खळ्याचा कसा वापर केला जायचा याविषयी आपण जाणून घेऊयात.

ज्या ठिकाणी शेती आहे, त्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला खळा अवश्य दिसेल. केवळ कोकणातच नव्हे तर महाराष्ट्रातील इतर अनेक ग्रामीण भागात आणि शेतीबहुल गावातील घरांसमोर खळा पाहायला मिळतो. काही ठिकाणी खळे शेतात तर काही ठिकाणी घराबाहेर असलेल्या अगंणात असतात. कोकणात खळा घराचा अविभाज्य भाग असला तरी त्याचा वापर मळणीयंत्र म्हणून केला जात असे. शेतातील पिकांपासून धान्याची रास करण्याकरता खळे केले जात असत. कधी हे खळे शेतात असत तर कधी घरासमोर केले जात.

धान्य मळणी आणि उफणनींसाठी आता यंत्रे आली आहेत. परंतु, पूर्वी शेतात किंवा घरासमोर गोल आकारात खळे तयार केले जात असे. हे खळे शेणामातीने सारवून घेतले जात असे. शेणामातीने सारवलेल्या खळ्यावर धान्य मळणी केली जात असे.

पिकांची कणसे या खळ्यात गोलाकार पसरवली जातात. खळाच्या मध्यभागी लाकूड रोवला जायचा. या लाकडाच्या अवतीभोवती बैल बांधले जायचे. बैलांनी धान्यात तोंड घालू नये म्हणून त्यांच्या तोंडाला मुसक्या बांधल्या जात असत. बैलांना लाकडाभोवती बांधल्यावर ते खळ्यातील कणसावर गोलाकार फिरत. बैल कणसावर फिरू लागल्यानंतर दाणे वेगळे होत.

कोकणात प्रामुख्याने तांदळाचं उत्पादन केलं जातं. भाताची कापणी झाल्यानंतर वाळलेल्या पेंढ्या खळ्यात आणून ठेवल्या जात असत. या भातांची येथेच झोडपणी होत असे. यामुळे भाताच्या ओबींतून साळी मोकळ्या होऊन त्यापासून तांदूळ केला जात असे. परंतु, यासाठीही आता यंत्र आल्याने ही पद्धतही बंद झाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खळे झाले दुर्मिळ

पूर्वी शेतीत कष्टाची कामे अधिक होती. मानवी आणि प्राण्यांची अधिक मेहनत असायची. आता शेतीच्या अनेक कामांमध्ये यांत्रिकीकरण आल्याने प्राण्यांचा वापर कमी केला जातो. आता मळणी प्रक्रियेतही यंत्राचा वापर केला जात असल्याने खळ्यांचा वापर कमी झाला आहे. परिणामी खळे आता घरासमोरील अंगण झाले आहेत. कोकणातील प्रत्येक घरासमोर खळा असतोच, फरक इतकाच की आता शेणामातीने सारवलेले खळे दिसत नाही.