Why Pilots Can’t Wear Perfume in the Cockpit: उड्डाण म्हणजे फक्त विमान चालवण्याचं कौशल्य नव्हे, तर त्यामागे असंख्य शिस्तबद्ध नियम व सूक्ष्म तपशील दडलेले असतात. विमान सुरक्षितपणे उडावं यासाठी जशी तांत्रिक तयारी आवश्यक आहे, तशीच मानवी चुकाही टाळणं गरजेचं असतं. अशाच एका अजब पण महत्त्वाच्या नियमामागचं रहस्य ऐकून तुम्हीही थक्क व्हाल.

विमान चालवणं हे केवळ तांत्रिक कौशल्यावर अवलंबून नसतं, तर त्यामागे असंख्य नियम, शिस्त आणि आरोग्यविषयक मार्गदर्शक तत्त्वे दडलेली असतात. यातीलच एक नियम अनेकांना अजब वाटतो, पायलट्सना उड्डाणाआधी परफ्यूम, माउथवॉश किंवा सॅनिटायझर वापरण्यास मनाई आहे. होय, ही बाब थोडी विचित्र वाटली तरी तिच्यामागे अगदी गंभीर कारण दडलेलं आहे. हे ऐकून प्रश्न पडतो ना सुवासिक परफ्यूम उड्डाणासाठी धोकादायक कसा काय ठरू शकतो? पण, यामागे दडलेलं कारण थेट प्रवाशांच्या सुरक्षिततेशी निगडीत आहे.

ब्रेथअलायझर टेस्टचा मोठा गोंधळ

भारतामध्ये प्रत्येक पायलटला उड्डाणाआधी ब्रेथअलायझर टेस्ट द्यावी लागते. या टेस्टचा उद्देश पायलट पूर्णपणे शुद्धीत आहे की नाही हे तपासणे, कारण विमान उडवताना अल्पशी चूकही जीवघेणी ठरू शकते.

पण इथेच खरी गंमत आहे. अनेक परफ्यूम, कोलोन, माउथवॉश आणि सॅनिटायझर्समध्ये ‘इथाइल अल्कोहोल’ असतं, त्यामुळे पायलटने जर उड्डाणाआधी परफ्यूम लावलं, तर टेस्ट मशीनमध्ये अल्कोहोलची खूण दिसू शकते… आणि लगेच तो ‘पॉझिटिव्ह’ ठरतो. म्हणजेच पायलटने दारू प्यायलेली नसतानाही केवळ परफ्यूममुळे मशीन चुकीचा रिपोर्ट दाखवू शकतं.

कॅप्टनचा खुलासा

अलीकडेच कॅप्टन तोमर अवधेश यांनी इन्स्टाग्राम व्हिडीओमध्ये हा धक्कादायक खुलासा केला. ते म्हणाले,
“आम्हालाही परफ्यूम आवडतो. अनेकदा ड्युटी फ्रीमधून खरेदीही करतो, पण समस्या अशी की ब्रेथअलायझर इतका संवेदनशील आहे की ०.०००१% इतकाही अल्कोहोल आढळला तरी तो ‘पॉझिटिव्ह’ दाखवतो, त्यामुळे परफ्यूम वापरल्यावरही टेस्ट फेल होण्याची शक्यता असते.”

याचा परिणाम थेट फ्लाइट डिले, चौकशी आणि कडक कारवाईपर्यंत होऊ शकतो. म्हणजेच पायलटने अल्कोहोल प्यायलं नसतानाही नाहक शिक्षा भोगावी लागते.

DGCA चे नियम

ऑक्टोबर २०२३ मध्ये DGCA ने याबाबत स्पष्ट सूचना दिल्या.

पायलट्स आणि क्रूने परफ्यूम, माउथवॉश, जेल किंवा अल्कोहोल असलेली कोणतीही वस्तू वापरू नये.

जर औषधांमध्ये अल्कोहोल असेल तर त्यासाठी डॉक्टरांची परवानगी घेणं बंधनकारक आहे.

विमानवाहतूक क्षेत्रात ‘प्रत्येक छोटा नियम मोठं सुरक्षेचं कवच’ असतो. त्यामुळेच परफ्यूमसारखी निरुपद्रवी वाटणारी गोष्टदेखील पायलटसाठी टाळण्यासारखी ठरते. पुढच्या वेळी विमान प्रवास करताना तुम्हाला कॉकपिटमध्ये परफ्यूमचा सुगंध आला नाही तर समजून घ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी तो गंध ‘त्यागलेला’ असतो.

येथे पाहा व्हिडीओ