पावसाळा सुरू होताच निसर्गप्रेमी ट्रेकिंगसाठी निघतात. लोकांना पावसाळ्यातील हिरव्यागार वातावरणात बाहेर पडण्याचा मोह होतो. ओसंडून वाहणारे धबधबे, हिरवेगार झालेले किल्ले, डोंगर आणि दऱ्या पाहण्यासाठी लोक घराबाहेर पडतात. हल्ली ट्रेकिंगला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. केवळ अनुभवी ट्रेकर्सच नाही, तर अगदी सामान्य लोकही ट्रेकला जातात. परंतु, ट्रेकिंग करताना बरीच आव्हाने समोर येतात, त्यामुळे आवश्यक काळजी घेणे महत्त्वाचे असते. त्यासाठीच अनेक जण ट्रेकिंगला जाताना मिठाचे पॅकेट जवळ ठेवतात. परंतु, त्यामागील नेमकं कारण काय? त्याविषयी जाणून घेऊयात.

ट्रेकिंगला जाताना मीठ का ठेवावे?

पावसाळ्यात जंगलात आणि डोंगराळ भागात कीटक आढळून येतात. या कीटकांच्या चाव्यामुळे त्वचेशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागू शकतो. ओल्या, दलदलीच्या प्रदेशात वाढणारे जळू आणि इतर लहान कीटक हानी पोहोचवू शकतात. हे कीटक पावसाळ्यात बाहेर पडतात. ट्रेकिंगदरम्यान हे कीटक उघड्या त्वचेला चिकटून राहतात. त्यांचे चावणे सहसा धोकादायक नसले तरी त्यामुळे एकप्रकारची अस्वस्थता जाणवू शकते. कधीकधी त्वचेवर दाह जाणवतो, तर काही प्रकरणांमध्ये सौम्य स्वरूपाचा संसर्ग होण्याचीदेखील भीती असते.

इथेच मीठासारखी साधी प्रत्येक घरात मिळणारी वस्तू उपयोगाची ठरते. अनुभवी ट्रेकर्स आणि बाहेर जाण्यास उत्साही असणारे लोक अनेकदा त्यांच्याबरोबर मिठाची पिशवी ठेवतात. अनुभवी ट्रेकर्स कायम मीठ ठेवण्याचा सल्ला देतात. मीठ एक प्रभावी नैसर्गिक प्रतिकारक म्हणून काम करते. जेव्हा मीठ थेट जळू किंवा कीटकांवर शिंपडले जाते, तेव्हा ते त्वचेपासून लगेच वेगळे होतात आणि त्यामुळे चावण्याचा धोका किंवा संसर्ग होण्याची भीती राहत नाही. मीठ असल्यास रासायनिक रिपेलेंट्सची आवश्यकता राहात नाही. ते बाळगणे टाळले जाते, कारण ते नेहमीच पर्यावरणास सुरक्षित मानले जात नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मीठ कीटकांना शरीरापासून वेगळे करण्याव्यतिरिक्त लहान कट किंवा कीटक चावलेल्या जागा सुकवण्यासदेखील मदत करू शकते, कारण ओल्या पावसाळ्यातील ओल्या वातावरणात संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. मीठ अगदी हलके असते आणि त्याला पॅक करणेही तितकेच सोपे असते. त्याला लहान पाऊच किंवा झिपलॉक बॅगमध्ये सहज ठेवता येते, त्यामुळे प्रत्येक ट्रेकरने स्वतःच्या सुरक्षेसाठी मीठ बरोबर ठेवावे.

मान्सून ट्रेकिंगसाठी मार्गदर्शक तत्वे

  • तुम्हाला माहीत असलेल्या आणि अनुभवी ट्रेकर्सबरोबर ट्रेकला जा
  • ट्रेकमध्ये येणाऱ्या लोकांची संख्या मर्यादित असावी
  • ट्रेकमध्ये नेहमीच प्रथमोपचार साहित्य बरोबर ठेवा
  • स्थान, वेळ, ट्रेक लीडर आणि ट्रेकशी संबंधित माहिती कुटुंब/मित्रांबरोबर शेअर करावी
  • ट्रेक दिवसाचा असला तरीही चांगल्या दर्जाचे हेड टॉर्च सोबत ठेवावे
  • पावसाच्या अंदाजानुसार ट्रेकचे नियोजन करा
  • पावसाच्या पाण्यामध्ये चालताना सावधगिरी बाळगा
  • किल्ल्याचे दरवाजे, कड्या किंवा इतर ढिगाऱ्यांवर चढू नका, कारण दरड कोसळल्याने अपघात होऊ शकतो
  • शेवाळलेल्या मार्गांवर चालताना अतिरिक्त काळजी घ्या
  • इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सना पुरेशा वॉटरप्रूफ बॅगमध्ये झाकून ठेवा, कारण ते आपत्कालीन परिस्थितीत उपयुक्त ठरू शकतात.
  • ट्रेकवर जाताना पॉवर बँक बरोबर ठेवा.
  • धोकादायक ठिकाणी फोटो काढणे टाळा.
  • वीजक चमकत असताना कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी थांबा, मोकळ्या किंवा ओल्या जागेत थांबू नका.
  • ट्रेकिंगच्या ठिकाणी पार्टी करू नका किंवा गोंधळ निर्माण करू नका.
  • किल्ल्यांवर, धबधब्यांजवळ किंवा जंगलात कचरा टाकू नका आणि कचरा दिसल्यास तो उचला.
  • पावसाळ्यात पाणलोट क्षेत्रात पाण्याची पातळी समजत नाही, दरम्यान पाण्याचा अचानक प्रवाह वाढू शकतो. अशा परिस्थितीत तलावांमध्ये, धबधब्यांमध्ये किंवा नद्यांमध्ये जाऊ नका.
  • ज्या ठिकाणी पाण्याचा प्रवाह जास्त असतो तिथे जाणे टाळा, कारण अशा ठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता असते.
  • ट्रेकमध्ये शेवटच्या क्षणी काही बदल झाले असतील तर तुमच्या आप्तजणांना कळवा.
  • अतिरिक्त कपडे ठेवा. ते आपत्कालीन परिस्थितीत उपयुक्त ठरू शकतात.