12 August 2020

News Flash

समृद्ध अनुभव

लिहिण्यासाठी मला विषय शोधावा लागत नाही. तो कधी माझ्या वाचनातून समोर येतो, तर कधी एखादा वाचक आव्हान म्हणून समोर ठेवतो. एका मेळाव्यात विद्यार्थ्यांनं विचारलं, ‘‘तुम्हाला

लिहिण्यासाठी मला विषय शोधावा लागत नाही. तो कधी माझ्या वाचनातून समोर येतो, तर कधी एखादा वाचक आव्हान म्हणून समोर ठेवतो. एका मेळाव्यात विद्यार्थ्यांनं विचारलं, ‘‘तुम्हाला काव्‍‌र्हर, स्कडर अशा विदेशी व्यक्तींवरच लिहायला आवडतं का? कोणी भारतीय तसा सापडला नाही का?’’ त्यातूनच नंतर पुढची चार र्वष संशोधन करून मी ‘डॉ. खानखोजे नाही चिरा..’ हे चरित्र लिहिलं. त्याच काळात चरित्र-लेखक जात बदनाम झाली असल्याचा दारुण अनुभवही घेतला. नंतर त्यांची शाबासकीही मिळवली. आर.आर. पाटील यांच्या मुलाखतीनंतर एका मंत्र्याचा अभ्यास, वक्तृत्व, तळमळ आणि सभ्यताही अनुभवली. ‘काव्‍‌र्हर’मुळे तर अनेक वाचकांचं प्रेम अनुभवायला मिळवलं. माझ्या पुस्तकांनी दिलेल्या यशाइतकंच या अनुभवांनीही मला समृद्ध केलंय.

मी काही सिद्धहस्त, प्रतिभासंपन्न लेखक वगैरे नाही. अत्यंत प्रयत्नपूर्वक संदर्भ-साहित्य जमवून ते काळजीपूर्वक तपासून आणि तितक्याच कष्टपूर्वक त्यांची मांडणी करून एखाद्या चरित्रनायक/ नायिकेची ओळख करून देण्यासाठी माझी धडपड असते. ‘ओळख’ अशासाठी की, माझी पदवी मराठी वाङ्मयाची, मात्र आजवर मी लिहीत आले ते बहुतेक सर्व विषय या ना त्या प्रकारे विज्ञानाशी निगडित. त्यामुळे चरित्रविषय हाताळताना संबंधित शास्त्राची माहिती मला करून घ्यावी लागते. माझ्या आकलनाच्या कक्षेत तो विषय आल्याखेरीज मी लिहीत नाही. अर्थात ते आकलन त्या व्यक्तीचं त्या क्षेत्रातलं कार्य समजण्यापुरतं मर्यादित असतं. माझी समजूत वाढवण्याच्या या माझ्या प्रवासात मी कात्रणं – संदर्भग्रंथ – ध्वनिफिती – चित्रफिती – ग्रंथालयीन संशोधन – मुलाखती यातच गुंतलेली असते. त्या काळात माझ्या ज्ञानात आणि अनुभवांत, दोन्हीत भर पडत असते. खरं तर पुस्तकांनी दिलेल्या यशाइतकंच या अनुभवांनीही मला समृद्ध केलंय.

एक प्रकाशक दुसऱ्या प्रकाशनाच्या पुस्तकावर स्तुतिसुमनं उधळूनच थांबत नाही, तर त्या पुस्तकाचा प्रचार आणि प्रसारही करतो, याचा विलक्षण अनुभव मी घेतलाय. ‘इंद्रायणी’ साहित्य प्रकाशनाचे संस्थापक दयार्णव कोपर्डेकर यांनी १९८१-८२ च्या सुमारास मला पत्र पाठवून कळवलं होतं की, कोकणातल्या शाळाशाळांतून ते ‘एक होता काव्‍‌र्हर’ची कथा सांगतात. तिथल्या अनेक शिक्षकांना त्यांनी काव्‍‌र्हर प्रती वाटल्यात. अनेक शालेय शिक्षकांनी काव्‍‌र्हर-चरित्राच्या आधारे अध्र्या अध्र्या तासाची नाटुकली तयार करून आपल्या शाळेच्या संमेलनात विद्यार्थ्यांकरवी ती सादर केलेली आहेत. काही शाळांतून तर शाळा सुरू होण्याआधी पंधरा-वीस मिनिटं ध्वनिक्षेपकावरून काव्‍‌र्हर-चरित्र वाचलं जाई. आपल्या भेटीला येणाऱ्या प्रत्येकाला ‘अगोदर काव्‍‌र्हर वाच आणि नंतर माझ्या भेटीला ये’ असं पु. लं. देशपांडे सांगत असत. ‘माणूस’ दिवाळी (१९७९) अंकातून प्रसिद्ध झालेलं काव्‍‌र्हर चरित्र वाचून पुलंचं मला अभिनंदनाचं पत्र आलं. पत्ररूपानं आलेला उदंड प्रतिसाद पाहून श्री. ग. माजगांवकरांनी त्याला पुस्तकरूप द्यायचं ठरवलं. त्या पुस्तकासाठी प्रस्तावना लिहावी अशी विनंती मी पुलंना केली. त्या वेळी ते म्हणाले, ‘‘हे सर्व कष्ट तुझे आहेत. सर्व श्रेय तुझं आहे. माझ्याच काय, पण कोणाच्याही प्रस्तावनेच्या कुबडय़ा घ्यायची तुला गरज नाही. हे तुझं पुस्तक स्वत:च्याच पायांवर चालणार आहे.’’ मी त्यांचं ऐकलं. मात्र पुस्तकाच्या मलपृष्ठावर त्यांचं पत्र छापण्याची अनुमती मी मागितली. ती त्यांनी दिली.

16नांदेडच्या प्रा. एल. के. कुलकर्णी यांनी ‘काव्‍‌र्हर’ वाचल्यावर त्या पुस्तकाच्या मागच्या बाजूला कोरं पान चिकटवलं आणि ते आपल्या मित्रपरिवारात वाचनासाठी फिरत राहील, असं पाहिलं. ती प्रत एका मित्राकडून रिक्षातच राहिली. रिक्षावाल्यानं नंतर ती पाहिली. त्यानं कुतूहलानं मागचं पान पाहिलं. त्यावर पन्नासेक जणांची नावं लिहिलेली पाहून त्याला वाटलं, ही कसली तरी पोथी दिसतेय. आपणही ती वाचून पाहू, म्हणून त्यानं ती ‘पोथी’ रात्री वाचली आणि मग मागच्या पानावरच्या यादीत शेवटी आपलंही नाव लिहून ती प्रत मूळ मालकाकडे परत केली.

लवकरच मला एका मानसोपचारतज्ज्ञानं धीर दिला. म्हणाले, ‘‘डिप्रेशनमधून बाहेर काढण्यासाठी, आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी मी रुग्णांना ‘काव्‍‌र्हर’ वाचायला देतो.. आणि त्याचा सकारात्मक परिणाम दिसतो.’’ औरंगाबादच्या डॉ. हेडगेवार रुग्णालयाचे मुख्याधिकारी म्हणाले, ‘‘आमच्या रुग्णालयात काम करणाऱ्या प्रत्येकाला आम्ही तुमचं ‘डॉ. आयडा स्कडर’ आणि ‘एक होता काव्‍‌र्हर’ वाचायला सांगतो. आमचा दंडकच आहे तो.’’ असाच एक अनुभव मिळाला चेंबूरला. १९८७-८८ च्या सुमारास चेंबूरमध्ये तिथल्या स्त्री-संघटनेच्या एका कार्यक्रमासाठी गेले होते. त्या कार्यक्रमानंतर एक मध्यमवयीन बाई मला भेटायला आल्या. कॉ. यशवंत चव्हाण यांच्या त्या पत्नी. त्या म्हणाल्या, ‘‘परवा कोल्हापुरात संध्याकाळच्या वेळी काही तरुण मुलं दिव्याच्या उजेडात गोलाकार बसून सामुदायिक वाचन करत बसलेली दिसली. ती काय वाचत आहेत म्हणून कुतूहल वाटून मी चौकशी केली. तुमचं ‘एक होता काव्‍‌र्हर’चं सामुदायिक वाचन चालू होतं.. ते मला तुम्हाला सांगायचं होतं. मीही ते पुस्तक मिळवून वाचलं. आवडलं मला.’’ काव्‍‌र्हरला कोणत्याही इझमचा अडसर नाही तर!

लिहिण्यासाठी मला विषय शोधावा लागत नाही. तो कधी माझ्या वाचनातून समोर येतो, तर कधी एखादा वाचक आव्हान म्हणून समोर ठेवतो. नागपूरच्या प्रा. किशोर महाबळांनी डिसेंबर १९९२ मध्ये ‘काव्‍‌र्हर लेखक- वाचक’ मेळावा घेतला. चारशे-पाचशे श्रोते होते. त्यातले बहुतेक कृषी विद्यापीठाचे विद्यार्थी होते. प्रश्नोत्तराच्या वेळी एका विद्यार्थ्यांनं विचारलं, ‘‘तुम्हाला काव्‍‌र्हर, स्कडर अशा विदेशी व्यक्तींवरच लिहायला आवडतं का? कोणी भारतीय तसा सापडला नाही का?’’ मी म्हणाले, ‘‘तसं काही नाही. झटपट प्रसिद्धी मिळवू पाहाणाऱ्या व्यक्तीपेक्षा चार-पाच दशकं एखादं कार्य नेटानं पार पाडणाऱ्या व्यक्तीविषयी मला कुतूहल वाटतं. मी त्याचा शोध घेते. प्रत्येक वेळी त्यावर लिहितेच असं नाही. नागपुरात डॉ. खानखोजे नावाचे थोर क्रांतिकारक, कृषितज्ज्ञ होऊन गेलेत.. त्यांचा शोध तुम्ही कोणी तरी घ्या. त्यांच्यावर लिहा..’’ आणि नंतर पुढची चार र्वष मीच त्यांचा शोध घेतला. आणि ‘डॉ. खानखोजे नाही चिरा..’ चरित्र लिहिलं.

17काव्‍‌र्हरना कुणी भारतीय व्यक्ती कधी भेटली होती का, याची मला नेहमीच उत्सुकता वाटे. खानखोजे प्रत्यक्ष त्यांना भेटले होते, सात-आठ दिवस टस्कगीत होते, हे समजल्यावर मी खानखोजेंचा अधिकाधिक शोध घेत गेले. या शोधप्रवासात मी नागपुरातल्या एका जुन्याजाणत्या उच्च अर्हताप्राप्त प्राध्यापकांना भेटले. त्या मुलाखतीत त्यांनी मला परखडपणे बजावलं. ‘‘तुम्ही आता खानखोजे- चरित्र लिहायला घेताय म्हणजे त्यांची स्तुतिस्तोत्रं गाणारच. काव्‍‌र्हरप्रमाणे त्यांनाही प्रसिद्धी मिळवणार.. पण हे पाहा, एखादा बॉम्ब टाकून, एखादी गोळी झाडून कोणी क्रांतिकारक ठरत नसतो. त्यांनी मेक्सिकोत काही शेतीविषयक संशोधन केलंय, असं ते म्हणायचे. कुणी पाहिलंय?.. कसले क्रांतिकारक! कसले कृषितज्ज्ञ!!’’ मी मुकाटय़ानं तिथून परतले. हाती असलेल्या अपुऱ्या माहितीच्या आधारे मी त्यांच्याशी प्रतिवाद करू शकत नव्हते.

पुढे मला ठोस पुरावे मिळाले. या पुराव्यांचा शोध मुंबई- दिल्ली- कोलकाता- नागपूर असा एकवीस दिवसांचा अभ्यास दौरा करून घेतला. या दौऱ्यावर निघण्याआधी वर्ष- दीड वर्ष माझं ग्रंथालयीन संशोधन चालू होतं. एशियाटिक लायब्ररी, मुंबई विद्यापीठाचं ग्रंथालय इथून अनेक ग्रंथ मिळवून मी कणाकणानं माहिती जमा केली होती. त्या पूर्वाभ्यासाचं फलित मला दिल्लीच्या नेहरू स्मारक संग्रहालयात मिळालं. त्या ग्रंथालयाचा नियम असा की, तिथल्या हस्तलिखिताच्या विभागात तासाला फक्त दोन फाइल्स उपलब्ध करून दिल्या जात. खानखोजेंच्या चाळीस फाइल्स तिथे होत्या. त्यातल्या काहींत जेमतेम आठ-दहा पानं होती, तर काहींत पन्नास-साठ, तर काहींत शे-शंभर. पुन्हा काहींत पुनरुक्ती. त्या नियमामुळे माझी अडचण होत होती. दिल्लीमधील मर्यादित वास्तव्यात अशा पद्धतीनं चाळीस फाइल्स संपवणं शक्य नव्हतं. मी संचालक हरिदेव शर्मा यांना भेटले, माझी अडचण सांगितली. त्यांनी सहज मला ‘‘अमुक पुस्तकं तुम्ही वाचलंय का, तमुकमधला संदर्भ लक्षात घेतलात का’’ वगैरे प्रश्न विचारले. ते बोलत असताना मी एक-दोन नोंदी घेतल्या. त्यांनी विचारलं, ‘‘बाकीच्या संदर्भाच्या नोंदी घेतल्या नाहीत तुम्ही?’’ मी नम्रपणे सांगितलं, ‘‘ती सर्व पुस्तकं वाचल्यानंतरच मी इथे येऊन आणखी काही हाती लागतंय का ते शोधतेय.’’ हे ऐकताच ते उठले. मला घेऊन हस्तलिखित विभागात गेले आणि तिथल्या संदर्भप्रमुखाला सांगितलं, ‘‘त्यांच्या टेबलावर चाळीसच्या चाळीस फाइल्स ठेवा. त्यांच्या सोयीनं त्यांना त्या पाहू द्या.’’ डॉ. हरिदेव शर्मानी ग्रंथालयाचा नियम मोडून माझी सोय पाहिली. कोलकात्याच्या नॅशनल लायब्ररीतही हाच अनुभव मला आला. मी तिथे गदर संदर्भात माहिती शोधत होते. माझी पुस्तकं शोधण्याची पद्धत पाहात असलेले तिथले संदर्भ विभागप्रमुख गेडाम मला म्हणाले, ‘‘तुम्ही काही विशिष्ट माहिती शोधताय असं दिसतं. महाराष्ट्रातून आला आहात का?’’ त्या हिंमतराव गेडामनी मी मराठी असल्याचं ओळखलं होतं. मी नेमकी कोणती माहिती शोधतेय ते लक्षात घेऊन त्यांनी मला पुस्तकं काढून देण्यात मदत केली. त्या ग्रंथालयात एखाद्या पुस्तकातून मजकूर झेरॉक्स करून हवा असेल तर तो लागलीच तसा मिळत नाही. दोन दिवसांनी दिला जातो. गेडामांनी मात्र त्याच संध्याकाळी मला हव्या त्या मजकुराच्या झेरॉक्स प्रती दिल्या आणि माझा वेळ वाचवला.

त्या काळात चरित्र-लेखक जात बदनाम झाली असल्याचा दारुण अनुभव घेतला. खानखोजेंचे एक नातेवाईक एल.बी. ऊर्फ दादासाहेब खानखोजे यांच्याकडे काही माहिती मिळते का ते पाहायला नागपुरात त्यांच्या घरी गेले. त्यांनी दोन महत्त्वाचे संदर्भ माझ्यासमोर ठेवले. एक होता, डॉ. खानखोजेंनी ‘नॅशनल अर्काइव्हज, दिल्ली’साठी ध्वनिमुद्रित केलेल्या मुलाखतीच्या स्थळप्रतीची प्रत आणि दुसरं होतं ग. वि. केतकरांचं ‘रणझुंझार, डॉ. पां. स. खानखोजे यांचे चरित्र’ हे छोटेखानी, आता दुर्मीळ झालेलं पुस्तक. मला दोन्ही संदर्भ साहित्य हवं होतं. ‘‘मी त्यांच्या झेरॉक्स कॉपीज काढून आणते,’’ असं म्हणताच दादासाहेब तटकन् उद्गारले, ‘‘नाही. मी चरित्र-लेखकाला माझ्याकडचं काहीही देणार नाही.. चरित्र लिहिण्याच्या बाता करतात.. कागदपत्रं घेऊन जातात, ती तर परत आणून देत नाहीतच आणि चरित्रही लिहीत नाहीत. खूप जण येऊन गेले.’’ माझ्यासोबत माझी मैत्रीण ‘नागपूर टाइम्स’ची मालकीण पुष्पा गद्रे होती. तिच्या माध्यमातूनच मी दादासाहेबांपर्यंत पोहोचले होते. ते तिलाही ओळखत होते. माझ्या ‘काव्‍‌र्हर’ची प्रसिद्धी त्यांच्या कानी होतीच. ते आपल्या निर्णयावर ठाम होते. शेवटी पुष्पा म्हणाली, ‘‘ही इथेच बसेल. मी जाऊन झेरॉक्स प्रती काढून आणते.’’ त्याला मात्र दादासाहेब राजी झाले. मला ओलीस ठेवून पुष्पा गेली आणि प्रती घेऊन आली! पुढे खानखोजे-चरित्राचा नागपुरातच प्रकाशन समारंभ झाला. त्या वेळी दादासाहेबांना अश्रू आवरता आवरत नव्हते. अत्यंत गहिवरल्या आवाजात त्यांनी मला शाबासकी दिली. तो मला फार मोठा पुरस्कार वाटला.
हे लिहीत असतानाच तीव्रतेने स्मरण होतंय ते

18जे. एस. सेराव यांचे. सालिम अलींच्या हाताखाली १९४६-४७ पासून काम करत आलेले हे सेराव. सालिम अलींच्या सर्व पत्रव्यवहारांच्या टंकलिखित प्रती सामिल अलींच्या अनुमतीनेच सेरावांच्या संग्रही होत्या. त्या ते घराबाहेर जाऊ द्यायला तयार नव्हते. म्हणजे मला त्यांच्या घरीच जाऊन त्या कागदपत्रांचा अभ्यास करावा लागणार होता. ते राहायचे अंधेरीला यारी रोडवर त्यांच्या वृद्ध भगिनीसमवेत. मी वसईहून जेवणाचा डबा घेऊन सकाळी नऊच्या सुमारास निघे. संध्याकाळी पाच-सहा वाजेपर्यंत सेरावांच्या घरी दप्तर चाळणं चाले. छोटे लाकडी टेबल, त्यावर कागदपत्रांच्या फाइल्स. तिथे दोन साध्या लाकडी खुच्र्या. एकीवर मी आणि दुसरीवर सेराव. वृद्ध सेराव बसल्या बसल्या तिथंच डुलकी काढायचे, पण तिथून हलायचे नाहीत. माझा डबा खाण्यापुरता आणि सेरावांच्या भगिनीने दिलेला चहा पिण्यापुरताच काय तो कामात खंड पडे. पाच-सहा दिवस हे काम चालू होतं. शेवटच्या दिवशी निघताना मी त्या दोघांना वाकून नमस्कार केला. सेराव मेंगलोरी ख्रिश्चन. त्यांनी मला डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला. म्हणाले, ‘‘एवढी र्वष सांभाळलेला हा ऐवज तुझ्या उपयोगी पडतोय. खूप समाधान वाटलं.’’

सालिम अलींवर माहिती जमवत असताना त्यांच्या बंधूंचा पणतू शाहिद अली मला मदत करत असे. तो मला त्याच्या गाडीने किहिमला सालिम अलींचं घर दाखवायला नेणार होता. ऑगस्ट १९८८ मधला तो दिवस ठरल्याप्रमाणे मी सकाळी साडेसातच्या सुमारास शाहिदची वाट पाहात दादरच्या नायगाव क्रॉस रोडवर उभी राहिले. पाऊस भुरभुरत होता म्हणून एका बंद दुकानाच्या शटरसमोर थोडा आडोसा घेतला. साडेनऊ वाजले तरी शाहिदचा पत्ता नाही. त्या काळात मोबाइल्स नव्हते. संपर्क कसा साधावा हा प्रश्नच होता. त्या वेळी जागोजागी फोन बूथ नव्हते. दुकाने अजून उघडायची होती. तीन तास अशी खडी प्रतीक्षा केल्यावर माझा नाइलाज झाला. दहा वाजण्याच्या सुमारास मी तिथून निघाले. पुढच्या भेटीत शाहिदकडून समजलं की, काही कारणास्तव त्याला त्याचा कार्यक्रम रद्द करावा लागला होता.

हा खुलासा नंतरच्या काळात का होईना, पण झाला; पण डॉ. सुरेश भावेंच्या बाबतीत तसं घडलं नाही.
डॉ. सुरेश भावे हे पुण्यातले शल्यविशारद. त्यांचं स्वत:चं छोटं विमान होतं. त्यातून ते भारतभर संचार करत. रामायणकालीन भूगोलाचा शोध घेत. ते विमानातून पक्ष्यांची छायाचित्रं काढतं. सालिम अलींशी त्यांचा चांगला परिचय होता हे समजल्यावर मी त्यांच्याशी संपर्क साधून त्यांची भेट मागितली. आपण लवकरच आपल्या विमानाने मुंबईस येत आहोत. त्या दिवशी जुहू फ्लाइंग क्लबवर भेटू, असं सांगितलं. मी त्याप्रमाणे तिथे गेले. त्यांचं एनएफडीसीमध्ये काही काम होतं. ते उरकून आपण निवांतपणे बोलू, असं ते म्हणाले. तिथून आम्ही टॅक्सीनं नेहरू सेंटरवर गेलो. मला तिथल्या प्रतीक्षा कक्षात बसवून ते एनएफडीसीच्या दिशेनं गेले. अध्र्याएक तासात ते परततील असा माझा अंदाज. दीड-दोन तास मी प्रतीक्षा करत बसून राहिले. कुठे चौकशी करावी, कुणाला विचारावं ते उमगेना. शेवटी तिथून उठले आणि परतले. त्याबाबत ना त्यांनी खुलासा केला ना मी मागितला. अलीकडेच त्यांच्या मृत्यूचे वृत्त वाचले तेव्हा ही भेट आठवली.

मुलाखतीसाठी दिलेली वेळ किती अगत्याने पाळली जाते त्याचेही छान अनुभव गाठीशी आहेत. सालिम अलींच्या संदर्भात मला मारुती चित्तमपल्लींची भेट हवी होती. त्या सुमारास ते नवेगाव बांध अभयारण्यात होते. त्यांनी कळवलं, ‘तुम्ही वसईहून इतक्या दूर येऊ नका. मीच मुंबईला येतोय गोरेगावात. गोरेगावात मित्राकडे उतरणार आहे. त्या दिवसांत मला खूप कामं पार पाडायचीत. वेळ सकाळी लवकरची किंवा रात्रीची असू शकेल.’ त्यांचे मित्र गोरेगावात माझ्या बहिणीच्या घराजवळच राहात असत. चित्तमपल्ली रात्री साडेदहानंतर आपल्या मित्रासमवेत माझ्या बहिणीच्या घरी आले. तास-दीड तासाची मुलाखत मी ध्वनिमुद्रित केली.

असाच अनुभव मिळाला आर. आर. ऊर्फ आबा पाटील यांच्या मुलाखतीच्या वेळी आला.
कै. विलासराव साळुंखे यांच्याविषयी माहिती जमवत असताना गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी ते ग्रामविकासमंत्री असताना विलासरावांच्या मार्गदर्शनाखाली जलव्यवस्थापनासाठी काही अभ्यास शिबिरे घेतल्याचे समजले होते. त्यांच्या मुलाखतीसाठी वेळ मिळाली ती रात्री ९ वाजताची. सोबत अंबरीष मिश्र हा पत्रकार मित्र आणि त्याचे स्नेही चारू साटम होते. ठरल्या वेळी म्हणजे रात्री ९ वाजता सुरू झालेली मुलाखत दोन तास चालली. चहापानासाठी दहा मिनिटांचं मध्यंतर काय ते झालं. त्या दोन तासांत पाटील अखंडपणे सांगत होते. कुणालाही मध्ये अडथळा आणू दिला नाही. मुलाखत संपल्यावर – तोवर मागवून ठेवलेलं आम्हाला खाऊ घातलं. स्वत:च्या गाडीनं गोरेगावला माझ्या बहिणीच्या घरी पोचतं केलं. एका मंत्र्याचा अभ्यास, वक्तृत्व, तळमळ आणि सभ्यता त्या दिवशी मी अनुभवली. विलासराव साळुंखे यांच्यावरील (‘भगीरथाचे वारस’) माहिती जमवण्यासाठी मी एकशेदहा लोकांच्या मुलाखती घेतल्या. चाळीस कॅसेट्स भरल्या होत्या. त्या एकशेदहा लोकांत आर. आर. पाटील, माधवराव चितळेंपासून पाणी पंचायतीचे लाभधारक सामान्य शेतकऱ्यांपर्यंतचे स्त्री-पुरुष होते.
हे झाले फार अलीकडचे; पण ‘डॉ. आयडा स्कडर’च्या संदर्भात मी १९८३-८४ सालात वेलूरला गेले होते. जाताना मनात एक चिंता होती. ती मी माझ्या एका ज्येष्ठ स्नेहय़ासमोर बोलून दाखवली. म्हणाले- ‘‘अपरिचित प्रदेश, अपरिचित तमिळ भाषा. जातेय खरी, पण संवाद कसा साधणार.. एवढा प्रवास करून..’’ स्नेहय़ांनी माझं बोलणं मध्येच तोडलं. म्हणाले, ‘‘ज्या स्त्रीचा तू शोध घेत आहेस ती होती अमेरिकी. ती तुझ्या आधी ऐंशी-नव्वद र्वष त्या भागात गेली. मोठं काम उभं केलं. तिला नाही अडचण आली भाषेची आणि प्रदेशाची. तुला तुझ्याच देशात त्यांचा अडसर येईल?’’ आणि खरंच मला कसलीही अडचण आली नाही. एक आठवडाभर मी वेलूर- काटपाडी- मद्रास (चेन्नई) भागात फिरत होते. हिंदी-इंग्रजीतून संवाद साधत होते. एकटी वावरत असताना कसलीही भीती, दहशत तर वाटली नाही वा अनुभवली नाहीच, उलट अत्यंत सौहार्दाचा, अगत्यशीलतेचा संपन्न अनुभव घेतला.

वेलूर ख्रिश्चन मेडिकल कॉलेजच्या प्राध्यापकांच्या, वृद्ध डॉक्टर्सच्या, डॉ. आयडांना ओळखणाऱ्या वृद्धांच्या मुलाखती मी तिथं घेतल्या. मुलाखतींचे किती विविध स्तर सांगावेत. सालिम अलींच्या संदर्भात अ‍ॅडमिरल आवटींची मुलाखत मी यॉट क्लबवर तिथल्या चहापानाचा आस्वाद घेता घेता ध्वनिमुद्रित केली होती. विलासरावांच्या संदर्भात माहिती जमवताना पाणी पंचायतीच्या लाभधारकांच्या- त्यातले बहुतेक अल्प भूधारकच होते, कोंडाळ्यात बसून त्यांच्यातली मेथीची भाजी अन् बाजरीची भाकरी खात नोंदी घेत होते. आपल्याला सुस्थिर जीवनाचा मार्ग दाखवणाऱ्या ‘देवमाणसा’वर ही बाई लिहिणार आहे असं त्यांना समजल्यावर आपले अनुभव सांगण्यात त्यांच्यात चढाओढच लागलेली.

तर अशीही मी चरित्रलेखनासाठी साधनं जमवणारी. मला एके दिवशी आकाशवाणी केंद्रातून नेहा खरेंचा फोन येतो. म्हणतात, ‘‘आम्हाला तुमच्याकडून स्त्री-भ्रूणहत्याविरोधी तेरा भागांची नाटय़मालिका लिहून हवीय.’’
‘‘अहो, मला नाटकबिटक लिहिणं जमणार नाही. शोधाशोध करून चरित्र लिहिणारी मी.’’
‘‘आम्हाला तुम्ही कसं आणि काय लिहिता त्याची कल्पना आहे. तुम्ही रीसर्च करून योग्य ती माहिती योग्य त्या स्वरूपात श्रोत्यांपुढे पोचवाल असा विश्वास वाटल्यानेच मी हा फोन करतेय.’’मी नेहा खरेंच्या आवाहनाला आव्हान समजले. माझ्या दोन महिन्यांच्या अभ्यासावर आधारित मालिका ‘शाश्वती’ लिहून दिली. या लेखनाला नेहा खरेंची दाद तर मिळालीच, पण नंतर ती अनेकदा पुन्हा प्रक्षेपितही झाली. एका चाहत्यानं माझाच मला शोध लावून दिला होता..
असाच माझा मला शोध लावून दिला तो ‘कदंब’ वार्षिकांक काढणाऱ्या मनोज आचार्यानी. त्यांच्या एका वार्षिकांकाचा विषय होता ‘मृत्यू’. त्याविषयी काही लिहून द्या, असं ते म्हणाले. स्वतंत्र काही लिहिण्याची प्रज्ञा आणि प्राज्ञा नसल्यानं मी ‘इंटिमेट डेथ’ (ले. डॉ. मारी डी. हेनेझेल) या इंग्रजी पुस्तकाचा संक्षिप्त अनुवाद केला. त्याच्या प्रस्तावनेत स्वत:च्या विचारांचा आधार घेतला. मृत्यूसंबंधी सकारात्मक, वेगळा असा विचार सांगणारं ते पुस्तक आचार्यानाही आवडलं. त्यांच्याच आग्रहावरून मी त्याचा पूर्ण अनुवाद ‘आयुष्याचा सांगाती’ केला. तो अतिशय उत्तम साधलाय, असं डॉ. रवी बापटांनी एका जाहीर कार्यक्रमात सांगितलं.

माझे चाहते माझं भान जागृतही ठेवत असतात. तीनेक वर्षांपूर्वी फेब्रुवारी महिन्यात मी भुसावळला कार्यक्रमानिमित्त गेले होते. स्थानिक व्यक्ती तिथे माझी मुलाखत घेणार होती. कार्यक्रमाची वेळ होती संध्याकाळी सात-साडेसातची. कार्यक्रम सुरू होता होता अचानक अंधारून आलं. ढगांचा गडगडाट होऊन जोरदार पाऊस पडू लागला. वीज गायब झाली. जनरेटर सुरू केल्यावर त्यावर एक तर ध्वनिक्षेपक चालू व्हायचा किंवा दिवे पेटायचे. श्रोते म्हणाले- ‘अंधारात ऐकू येतं. माइक चालू ठेवा.’ अंधारात मुलाखत चालू राहिली; पण तोवर मोबाइल टॉर्च पेटवून दहा-पंधरा हात वर झाले होते. थोडय़ा वेळानं वीज आली. हात खाली गेले. पुन्हा अध्र्या तासानं वीज गेली. पुन्हा फक्त माइक चालू आणि मोबाइल टॉर्चचे हात वर उठले. या वेळी त्यांची संख्या वाढली होती. त्या दोन तासांच्या कार्यक्रमात तीन-चार वेळा या प्रसंगाची पुनरावृत्ती झाली. शेवटी वीज पूर्ववत सुरू झाली. प्रेक्षागृह भरलेले तर होतेच, पण भिंतीशी उभं राहून ऐकणारेही अनेक होते. ‘‘एका लेखकाबद्दल दाखवलेला हा आदर मला कोणत्याही पुरस्कारापेक्षा श्रेष्ठ वाटतो,’’ असं म्हणून मी श्रोत्यांचे आभार मानले.
पूर्वी कधीही न भेटलेल्या आणि पुन्हा भेट होईल की नाही हे ठाऊक नसलेल्या वाचकांनी, चाहत्यांनी त्या दिवशी मला जो सन्मान दिला त्यानं मी सावध झाले. लेखक म्हणून आपली जबाबदारी काय आहे, याचं पूर्ण भान मला आलं.

– वीणा गवाणकर 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2016 1:08 am

Web Title: life story of veena gavankar
Next Stories
1 हे चित्र कुणाचं?
2 पडद्यामागील नाटक
3 मनोविकार ते मनोविकास
Just Now!
X