06 July 2020

News Flash

गजऱ्यातला न दिसणारा दोर

शब्दांच्या पलीकडे’ आणि ‘नाटय़संगीत’ या कार्यक्रमांची प्रचंड क्रेझ होती

अनेकदा सूत्रसंचालन आणि निवेदन एकाच कार्यक्रमात करावं लागायचं. सूत्रसंचालक म्हणून शिष्टाचार पाळताना तुम्ही संस्थेचे प्रतिनिधी असता, तर निवेदक म्हणून रसिकांचे दोस्त. भूमिकाच वेगळी. औचित्य, नेमकेपणा, आब सगळं सांभाळायचं, हसतमुखाने आणि निवेदनात थोडं सैलावायचं पण कणकेसारखं रेळायचं नाही. सांधेजोड दिसता कामा नये. तुम्ही आहात आणि तरीही नाही आहात. गजरा गुंफताय. दोर तुम्हीच आहात, पण दिसली पाहिजेत फक्त फुलंच.. ही ‘दृष्टीआडची सृष्टी’ मोहक आहे. हृदयासारखी दर क्षणी नव्याने धडधडणारी. अभिषेकी बुवांच्या मार्गदर्शनाखाली केलेली नाटय़संगीत महोत्सवाची निवेदनं, पावसाला न जुमानणाऱ्या रसिकांसाठी भिजत केलेला कार्यक्रम, नेहरू सेंटरमधील ‘कुसुमाग्रज एक अक्षय प्रेमयोग’ या कार्यक्रमात डॉ. श्रीराम लागूंनी सादर केलेली नटसम्राटची मनोभूमिका.. हे कार्यक्रम म्हणजे माणसातल्या माणूसपणाचा आणि त्यांच्या ज्ञानाचा आपल्या परीने घेतलेला शोधच असतो!

मंगला खाडिलकर
निवेदक, सूत्रसंचालक

साधारण कधीपासून सुरुवात करावी? दूरदर्शनवर ‘शब्दांच्या पलीकडे’ आणि ‘नाटय़संगीत’ या कार्यक्रमांची प्रचंड क्रेझ होती, त्या काळात या कार्यक्रमांचं निवेदन करू लागले आणि व्यासपीठावरच्या सांगीतिक कार्यक्रमांची बोलावणी येऊ लागली. तोवर ‘आकाशवाणी’वर मनसोक्त हुंदडून झालं होतं. कथाकथन, मुलाखती, परिसंवाद, काव्यवाचन असा थोडाबहुत अनुभव गाठीशी जमा झाला होता. पण संगीताचे कार्यक्रम हा वेगळा प्रकार होता. माणिक वर्मा, दशरथ पुजारी, गजानन वाटवे यांच्याशी संवाद साधत सादर केलेले ‘शब्दांच्या पलीकडले’ हेच तोवरचं भांडवल.
पहिलाच कार्यक्रम अनिलभाईंनी (संगीतकार अनिल मोहिले) दिलेला. हृदयनाथ मंगेशकर, अरुण दाते, उषा मंगेशकर, अनुराधा पौडवाल गाणार होते. गंमत म्हणजे कार्यक्रमातील निम्मी गाणी आयत्या वेळीच कळणार होती. बरं झालं. आकस्मिकतेचा हा मुद्दा पहिल्या पायरीवरच कळून आला. एक छान होतं. गाणी ओळखीची- गळ्यातली – मनातली होती. दृक्श्राव्य माध्यमासाठी साजरं ठरणाऱ्या काव्यात्म निवेदनाच्याच वाटेने निभावून नेता आलं. मग असे कार्यक्रम येतच गेले. गदिमा, बोरकर, कुसुमाग्रज, पाडगावकर, शांता शेळके यांची शब्दकला. तिच्यावर तर मदार सारी! शिवाय चंद्र, तारे, गंध, वारे, दिमतीला होतेच सारे! मन मात्र आतून सांगत होतं- हे काही खरं नाही गडय़ा!
पार्ले टिळक विद्यालयाच्या प्रांगणात आशाताईंचा (आशा भोसले) ‘नक्षत्रांचे देणे’ हा कार्यक्रम होता. मला गाण्यांच्या यादीची नितांत गरज होती. ती मिळेना; तशी मनाने मनातल्या ‘आशा भोसले’ नामक लाजवाब ग्रंथालाच हात घातला. तेव्हा काहीतरी उमगू लागलं. सुधरू लागलं. तरीही नेट धरून त्यांच्याकडे यादी मागू लागले, तर म्हणाल्या, ‘‘आपल्याकडे कुठे गाण्याला निवेदन आणि निवेदनाशी गाणं असा प्रकार असतो? तुम्ही बोला. मी गाणी गाईन. जिथे थांबले असेन, तिथून तुम्ही पुढचं बोला.’’ जमलं.
आणि डोळेही उघडले. खिडकीतून मोठ्ठं आकाश दिसावं, तसं झालं.
अनेकदा सूत्रसंचालन आणि निवेदन एकाच कार्यक्रमात करावं लागायचं. पुढे तर तो पायंडाच पडला. सूत्रसंचालक म्हणून शिष्टाचार (प्रोटोकॉल) पाळताना तुम्ही संस्थेचे प्रतिनिधी वा प्रवक्ते असता, तर निवेदक म्हणून समोरच्या रसिकांचे मनकवडे दोस्त. भूमिकाच वेगळी. औचित्य, जागरूकता, नेमकेपणा, आब सगळं सांभाळायचं, हसतमुखाने आणि निवेदनात थोडं सैलावायचं पण कणकेसारखं रेळायचं नाही. आवाजापासून ते संवादाच्या लयीपर्यंत सारं बदलायचं. सांधेजोड दिसता कामा नये. भूमिकांची अदलाबदल हा अक्षम्य गुन्हा. तुम्ही आहात आणि तरीही नाही आहात. गजरा गुंफताय. दोर तुम्हीच आहात पण दिसली पाहिजेत फुलंच. बरं तुम्ही मनात योजलेलं शिस्तीत जनात पोहोचेल, याची हमी नाही. सूत्रसंचालन करतेवेळी अगदी ऐनवेळी तुमच्या कानात फुसफुसून मोठे बदल सांगितले जातात, कार्यक्रमाचा माहौल जमवला असताना एखादा विवादी सूर निघणं, घटनाक्रम, तपशील बदलणं, तर निवेदन करतेवेळी आयत्या वेळी गाणी बदलणं, कलावंत मागे-पुढे होणं, संकल्पनेचा आणि पर्यायाने तुमच्या संहितेचा बोजवारा उडणं, ही नेहमीचीच धांदल. गोंधळ, निराशा चेहऱ्यावर दाखवाल, तर नापास! भोपळा.
सुधीर फडके अमृतमहोत्सवी कार्यक्रम, श्रीनिवास खळे संगीत रजनी, महाराष्ट्र शासनाचे लता मंगेशकर पुरस्कार सोहळे, मा. दीनानाथ मंगेशकर स्मृती महोत्सव, अनिल मोहिले साथसंगत स्वरोत्सव अशा अनेक कार्यक्रमांनी ही दोन दगडांवरची कसरत शिकवली. मुख्य म्हणजे कार्यक्रमाआधीच्या बैठका, तालमी याचं महत्त्व फार मोठं असायचं. बाबूजींशी (सुधीर फडके) बोलायला त्यांच्या घरी गेले, तर शामराव कांबळे पेटी घेऊन बसलेले. अण्णा जोशी तबला, दिमडी अशी तालयात्रा मांडून सज्ज. बाबूजींचं सांगीतिक कर्तृत्व मांडायचं तर या मंडळींना समजून घेणं, त्यांच्या संभाषणातून गवसलेले आठवणींचे धागे घट्ट पकडणं, यशवंत देव, खळे अण्णा, प्रभाकर जोग यांना बोलतं करून तो काळ जागता करणं यातून कार्यक्रमाचं अस्तर तयार होतं.
श्रीनिवास खळे अण्णांसोबत गप्पा मारताना, ते गायकांना चाली शिकवीत असताना समोर बसून ऐकताना, अनेक अनमोल गोष्टी हाताशी लागतात, मुळात तो दिग्गज प्रतिभावान माणूस वलय उणे करून समजून घेता येतो, हा प्रत्यय महत्त्वाचा होता. हाती गवसलेलं सारंच कार्यक्रमातून मांडता नाही येत. पण बोलण्याची बैठक पक्की होते. लताबाई आणि प्यारेभाई एका कार्यक्रमात एकमेकांशी बोलताना जुन्या आठवणींमध्ये रंगले होते. मी उठून जाऊ लागताच लता दीदी म्हणाल्या, ‘‘तुम्ही बसा हो, उलट तुम्हालाच बोलायला उपयोगी पडतील आमच्या आठवणी.’’ ऐकलेलं स्मरणात किती राहिलं सांगता नाही येणार. पण देहबोलीतून जाणवणारा त्यांच्यातला तो अकृत्रिम स्नेह, दिलखुलास हसणं आणि त्यांनी रंगविलेली स्मरणचित्रं यामुळे मला मात्र ‘‘एक पुराना मौसम लौटा, यादभरी पुरवाई थी’’ची अनुभूती लाभली. अशा किती आठवणी!
पहिली जागतिक मराठी परिषद. ‘आंतरभाषा भगिनी’ हा परिसंवाद. साक्षात पु. ल. अध्यक्ष. मी फक्त परिसंवादाचं सूत्रसंचालन करणार. पण त्याआधी महिनाभर
मालती जोशी, लक्ष्मीनारायण बोल्ली अशा प्रत्येक भाषेतल्या साहित्यिकांशी बोलून घेणं, पत्रव्यवहार सांभाळणं, त्यांच्या व्याख्यानांची टिपणं काढून वर्तमानपत्रांना पुरवणं अशी अनेक कामं पु.लं.नी माझ्यावर सोपविली होती. मोबाइलचा काळ नसतानाही सर्व वक्त्यांशी स्नेह स्थापित झाला होता. त्याचा फायदा सूत्रसंचालनात झाला. त्यात नुसता मोकळेपणा नाही, तर पु.लं.ना अपेक्षित सहजपणा आला. पुढच्या काळातल्या विविध माध्यमांमध्ये मी घेतलेल्या मुलाखतींसाठी गृहपाठच मिळाला.
व्यासपीठावर मुलाखत घेताना त्यातला जिवंतपणा, रसरशीतपणा आणि तथ्य टिकविण्यासाठी मुलाखतकाराला अनेक विरोधी प्रवाहांशी झगडावं लागतं, तेही कुणालाही कळू न देता. मुख्य मुलाखती आधी करून देण्यात येणारी लांबलचक ओळख, स्तुतिसुमनांचा वर्षांव करणारी आणि आपलं भाषण संपताच आपल्या अनुयायांसह निघून जाणारी लब्धप्रतिष्ठित शासकीय आणि अशासकीय मंडळी आणि त्यामुळे विशाद वाटून कोषात जाणारी मुलाखत देणारी व्यक्ती, समोरचे आतुर रसिक, फुकट दवडलेला वेळ हे काळ काम वेगाचं गणित सांभाळत ही हृदयसंवादाची कसरत प्रेमाने सांभाळायची.
आम्ही ‘पुष्पक’ निर्मित ‘हिंदोळे स्वरांचे’ हा मंगेशकर स्वरसंचितावर आधारित कार्यक्रम करायचो. मोठय़ा सभागृहात तसंच रस्त्यावरच्या गणपती मंडपात, मुंबईच्या गल्लीबोळात, पोलीस लाइनीत, देवळांच्या उत्सवात अगदी रेल्वे- प्लॅटफॉर्मलगतच्या झोपडपट्टीतही सर्वत्र कार्यक्रम व्हायचे. मुलं रडताहेत, गाडय़ा धावताहेत, माणसं सवडीने समोर येऊन टेकताहेत, लांबच्या मंडपातले सूर इकडच्या सुरांना छेद देताहेत; पण पहिल्या गाण्यापासून कार्यक्रम एकदम पकड घ्यायचा! प्रत्येक कलाकाराने प्रचंड ऊर्जा लावून कार्यक्रम करणं म्हणजे काय, हे दर कार्यक्रमात जाणवायचं. कुणीतरी विचारलं एकदा, ‘‘चवन्नी गल्लीत कार्यक्रम करून काय मिळतं?’’ उत्तर दिलं नाही. अहो, नकोसं, अस्वस्थ करणारं, शब्द – सूर विसरायला लावणार दृष्टीआड करायचं आणि समोरच्याला भावेल अशी ‘सृष्टी’ निर्माण करायची, या अनुभवाचं मोल सांगून कसं कळणार?
मनोहर जोशी, बाळासाहेब ठाकरे, अमिताभ बच्चन, सुनील गावस्कर अशी दिग्गज माणसं या मंचावरच प्रथम भेटली. आणखी एक किस्सा परभणीतला. एक मोठा कार्यक्रम. मी बदली कामगार. ज्येष्ठ कथालेखक, कथनकार व. पुं.ऐवजी माझी वर्णी! जागोजाग कार्यक्रमाचे बोर्ड्स. त्यात व.पुं.चे नाव ठळक. दिवसभर कण्र्यावर जाहिरात सुरू होती- खास आकर्षण निवेदक- व. पु. काळे. आयोजक म्हणाले, ‘‘आता लोकांना डायरेक्टच कळू द्या. काही चिंता नाही. आणि पुढचंच वाक्य.. ‘‘आमच्याकडचे रसिक एकदम चोखंदळ. नाही आवडलं, तर सरळ फुली.’’ रात्री कार्यक्रम सुरू व्हायच्या क्षणापर्यंत रसिकांना हा बदल ठाऊकच नाही. माइक हाती आला, तेव्हा शांतपणे लोकांना वस्तुस्थिती सांगितली. व. पुं.ची एक कथा लघुत्तम रूपात सांगितली. म्हटलं, ‘‘व. पुं.ची उणीव भासू नये म्हणून ही कथा सांगितली आता तिचंच बोट धरून गाण्यांच्या गावा जाऊ या.’’ दुसऱ्या दिवशी परभणीचे काही रसिक मुद्दाम औरंगाबादला आले होते. निवेदनही ऐकायला. हुश्श!
बडोद्याला कार्यक्रमासाठी स्टेजवर चढताना नेमका अंधारात एका मोठय़ा खड्डय़ात पाय गेला. त्यात नेमका चिखल. साडी चिखलाने माखली. आयोजकांकडून पाणी मागवलं. बॅटरीच्या प्रकाशात चिखल धुतला. साडी झटकली. विंगेत पाच मिनिटे पंख्याखाली उभी राहिले. तिसरी घंटा झाली. तशीच स्टेजवर जाऊन निवेदनाला सुरुवात. असेही प्रसंग.
१९९५. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या षष्टय़ब्दिपूर्ती सोहळा. स्थळ डिसिल्व्हा हायस्कूलचं पटांगण. अध्यक्ष माननीय बाळासाहेब ठाकरे. प्रमुख पाहुणे- जम्मू- काश्मीरचे तत्कालीन मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला आणि राजस्थानचे तत्कालीन मुख्यमंत्री भैरोसिंग शेखावत. प्रमुख क्ते नाना पाटेकर आणि प्रमोद नवलकर. मिनीट टु मिनीट कार्यक्रम ठरलेला. निवेदन कट टु कट. चाळीस सेकंद कमाल मर्यादा. पाहुण्यांचं हेलिकॉप्टर उतरतंय असा निरोप आला की कार्यक्रम सुरू. तसा तो सुरूही झाला पण तोवर दुसरा निरोप. लँड व्हायला थोडा उशीर होतोय. आता आणीबाणी. मला वस्तुस्थिती सांगण्यात आली. आता निवेदन थोडं तब्येतीत घ्यायचं. महाराष्ट्रगीताबरोबर दोन गाणी वाढवायची. (अशोक हांडे तयारीला लागले.) प्रमुख वक्त्यांची भाषणं घ्यायची. प्रमोद नवलकरांना हळूच कल्पना दिली. म्हटलं, ‘‘आम्ही खूण करू तोवर तुम्ही बोलायचं.’’ ते पट्टीचे वक्ते. त्यांनी धुवाधार फलंदाजी केली. पण त्यांच्याही भात्यातले बाण संपत आल्यासारखं वाटू लागलं. आता काय करायचं? भाषण संपलं, तर पुढे काय करायचं? पण देव पावला. पाहुणे उतरले. गाडय़ा सुटल्याचे निरोप मिळाले. बोलता बोलता हळूच प्रमोदभाई मागे पहात. अंदाज घेत आणि सहज पुढचा मुद्दा मांडत. बाजीप्रभू देशपांडय़ांसारखी खिंड लढवत होते. एवढय़ात ‘राजे गडावर पोहोचल्याच्या तोफा कडाडल्या.’ प्रमोदभाईंना खूण केली. त्यांनीही झोकात ‘शब्दसंभार’ आवरला. एक प्रदीर्घ श्वास घेऊन निवेदनाला सुरुवात केली. ‘‘आपण सारे ज्यांच्या आगमनाची ..’’. असे किती प्रसंग. एकदा तर कार्यक्रमाच्या आदल्या रात्री चोरी झाली. त्यात माझ्या सामानासह चोरटय़ांनी संहिताही पळवली. (पुढे गेस्टहाउस जवळच्या गटारात तिचे तुकडे तरंगताना दिसले. हा हन्त हन्त नलिनीम् गज उज्जहार) दुसऱ्या दिवशी आयोजकांच्या पत्नीची साडी, गळ्यात फक्त मंगळसूत्र, सुजलेले डोळे अशा अवतारात निवेदन केलं. कार्यक्रम- ‘श्रावण रंग रंगीला.’! एकदा तर कार्यक्रमाच्या मध्यांतरात संहिताच चोरीला गेली. सोबत महिनोन् महिने कष्ट करून लिहिलेले संदर्भ- तेही गेले..
ही दृष्टीआडची सृष्टी मोहक आहे. हृदयासारखी दर क्षणी नव्याने धडधडणारी. गोव्याच्या शांतादुर्गा प्रांगणात, सम्राट संगीत संमेलनात ऐकलेलं मनसोक्त शास्त्रीय संगीत. पहाट फुटण्याआधी या दिग्गजांशी चहाच्या वाफाळत्या कपासोबत झालेल्या संगीतविषयक गप्पा नि लगेच भैरवी आनंद. अभिषेकी बुवांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या शिस्तीत केलेली नाटय़संगीत महोत्सवाची निवेदनं, अवकाळी पावसाला न जुमानता समोर बसलेल्या रसिकांसाठी भिजत केलेला कार्यक्रम, नेहरू सेंटरमधील ‘कुसुमाग्रज एक अक्षय प्रेमयोग’ या कार्यक्रमात
डॉ. श्रीराम लागूंनी सादर केलेली नटसम्राटची मनोभूमिका, महाराष्ट्रभूषण नानासाहेब धर्माधिकारी यांच्या आज्ञेने बारा-पंधरा लाख समर्थ सेवकांच्या प्रबुद्ध जनसमुदयासमोर निरूपण करण्याची पेललेली जबाबदारी, अगदी अलीकडे भारतभर फिरून घेतलेल्या, ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या अकरा साहित्यिकांच्या दृक् श्राव्य मुलाखती हा सगळा माणसातल्या माणूसपणाचा आणि त्यांच्या ज्ञानाचा आपल्या परीने घेतलेला शोधच असतो. तुमची श्रीमंती वाढविणारा!
mangala.khadilkar@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 13, 2016 1:52 am

Web Title: renown anchor mangala khadilkar telling about her life experiences
टॅग Chaturang
Next Stories
1 इंद्रायणीकडून चंद्रभागेकडे..
2 सुख सुख म्हणजे याहून काय असतं?
3 उलाढाल एका स्वप्नाची!
Just Now!
X