नागपूर : रामटेक लोकसभा क्षेत्रामधील अनेक मतदान केंद्रांमध्ये जाऊन रुग्णांसह दिव्यांगांनीही उत्स्फूर्त मतदान केले. ग्रामीण भागांमध्ये मतदान करताना मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. तत्पूर्वी सकाळी ११ नंतर महायुतीचे  कृपाल तुमाने आणि काँग्रेस आघाडीचे उमेदवार किशोर गजभिये यांनी अनेक गावांना धावती भेट देत मतदानाचा आढावा घेतला. सायंकाळपर्यंत रामटेकमध्ये सरासरी ५६ टक्के मतदान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला.

लोकसभा निवडणूक ही देशाचे भवितव्य ठरवणारी असते. याची नागरिक व मतदारांमध्ये चांगलीच जाणीव आहे. मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यासाठी नागपूर ग्रामीणमधील अनेक मतदान केंद्रांवर सकाळच्या सुमारास मतदारांची गर्दी दिसून आली. नागपूर ग्रामीण क्षेत्रातील विहीरगाव, अडय़ाळी, कळमना, उमरगाव, बहादुरा, पिपरी, हुडकेश्वर आदी मतदान केंद्राचा आढावा घेतला असता मतदानाबाबत लोकांमध्ये उत्साह होता. काटोल, कळमेश्वर, उमरेड, हिंगणा, रामटेक, सावनेर आदी मतदारसंघ येत असल्यामुळे सकाळपासून सर्वच मतदारसंघामध्ये मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. सकाळपासून मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा दिसून आल्या. सकाळी रांगा असल्या तरी दुपारी १ ते ३ पर्यंत अनेक मतदान केंद्रांवर शुकशुकाट होता. दुपारी ऊन जास्त असल्यामुळे मतदार घराबाहेर निघालेच नाही. दुपारी अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलिसांचाही मतदान केंद्रावर बंदोबस्त होता. दुपारी ३ नंतर मात्र मतदार हळूहळू घराबाहेर पडले. सायंकाळ झाल्यानंतर मतदारांच्या पुन्हा मतदानासाठी केंद्रांवर रांगा लागलेल्या दिसून आल्या. सकाळी ११.३० वाजता रामटेकचे खा. कृपाल तुमाने यांनी बहादुरा, विहीरगाव, खरबी आदी गावातील मोठय़ा केंद्रांना भेटी देऊन मतदानाचा आढावा घेतला.

अपंगांनीही हक्कबजावला 

सर्वसामान्य मतदारांसह रुग्ण तथा दिव्यांगांनीही मतदान केंद्रावर येत मतदानाचा हक्क बजावला. कळमना केंद्रावर आशा राऊ त या दिव्यांग महिलेने स्वत: सायकलीने मतदान केंद्रावर येऊ न मतदानाचा हक्क बजावला.