शिवसैनिकांपुढे माफीनाफा सादर केल्यानंतरही भिवंडी लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांना जागोजागी शिवसैनिकांच्या नाराजीचा सामना करावा लागत आहे. कल्याण पश्चिम, बदलापूर, मुरबाडमधील जुन्या शिवसैनिकांची एक गुप्त बैठक नुकतीच कल्याणमध्ये झाल्याचे वृत्त आहे. बैठकीत पाटील यांना धडा शिकविण्याची भाषा करण्यात आल्याचे कळते. शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मात्र हे वृत्त फेटाळले आहे.

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत खासदार पाटील यांनी शिवसेनेविरोधात जोरदार मोहीम उघडली होती. कल्याण पश्चिमेत शिवसेनेचा पराभव व्हावा यासाठी पाटील तसेच विद्यमान आमदार नरेंद्र पवार यांनी राबवलेली आक्रमक मोहीम अजूनही शिवसैनिकांच्या लक्षात आहे. या निवडणुकीत स्थानिक प्रशासन तसेच पोलीस यंत्रणेचाही सत्ताधारी पक्षाने पुरेपूर वापर केल्याचा आरोप खुद्द पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यावेळी केला होता.

पाटील यांना लोकसभेवर निवडून आणण्यासाठी आम्ही जिवाचे रान केले होते. त्यांनी पालिका निवडणुकीत केलेल्या आक्रमक प्रचाराची परतफेड आम्ही करू असा इशारा शिवसैनिकांनी नुकत्याच घेतलेल्या बैठकीत दिला. त्यामुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. खासदार पाटील यांनी महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या पराभवासाठी खूप कष्ट घेतले. त्यामुळे त्यांना निवडून आणण्यासाठी मदत का करायची, असा प्रश्न कल्याण भागातील एका ज्येष्ठ शिवसैनिकाने केला. त्यांना पाडण्यासाठी भाजपची एक तगडी टोळी कार्यरत होती. पाटील यांनी जातीचे राजकारण चार वर्षे खेळून निष्ठावान कार्यकर्त्यांना नाराज केले. मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहेत म्हणून कितीही विकासनिधी आणू शकतात, म्हणून खा. पाटील मोठे झाले आहेत. अशी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली.