सोमवारी मतदान होणारे ५१ पैकी ३८ मतदारसंघ भाजपकडे

अखेरच्या तीन टप्प्यांमध्ये १६९ मतदारसंघांमध्ये होणाऱ्या मतदानामध्ये भाजपचे सर्वाधिक खासदार असल्याने उत्तर भारतातील हे तिन्ही टप्पे सत्ताधारी भाजपसाठी महत्त्वाचे आहेत. या पट्टय़ातील जास्तीत जास्त जागाजिंकण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

लोकसभेच्या आतापर्यंत चार टप्प्यांमध्ये ३७४ मतदारसंघांत मतदान पार पडले. या चार टप्प्यांत भाजपचे १६६ खासदार होते. उर्वरित तीन टप्प्यांमध्ये १६९ मतदारसंघांमध्ये होणाऱ्या निवडणुकीत भाजपचे ११६ खासदार आहेत. यामुळेच अखेरचे तीन टप्पे हे भाजपसाठी निर्णायक ठरणार आहेत.

येत्या सोमवारी ५१ मतदारसंघांत मतदान होत असून, यापैकी ३८ मतदारसंघांमध्ये सध्या भाजपचे खासदार आहेत. पाचव्या टप्प्यात उत्तर प्रदेशात १४ मतदारसंघांत मतदान होणार असून, १२ मतदारसंघांत भाजपचे खासदार आहेत. तर रायबलेरी आणि अमेठी मतदारसंघांमध्ये अनुक्रमे सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे खासदार आहेत. राजस्थानमध्ये मतदान होणाऱ्या १२ पैकी ११ मतदारसंघांमध्ये भाजप तर एका मतदारसंघात काँग्रेसचा खासदार आहे.

मतविभाजनाच्या आशेवर भाजप

उत्तर भारतात जास्तीत जास्त जागाजिंकण्याचा भाजपचा प्रयत्न  आहे. उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी-बसपा आघाडीमुळे भाजपपुढे आव्हान उभे ठाकले आहे. तरीही चांगल्या यशाची भाजपला अपेक्षा आहे. काँग्रेसच्या उमेदवारांमुळे काही मतदारसंघांत मतांचे विभाजन होणार आहे. हे विभाजन पथ्यावर पडेल, असे भाजपचे गणित आहे. तर काही मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे उमेदवार भाजपच्या उमेदवारांना त्रासदायक आहेत. राजस्थान आणि मध्य प्रदेशात सहा महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव झाला होता. तरीही लोकसभा निवडणुकीत अधिक जागाजिंकण्याचे भाजपचा प्रयत्न आहे. मध्य प्रदेशात भाजपला रोखण्यासाठी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी सारी ताकद पणाला लावली आहे. मध्य प्रदेशातील २९ पैकी गेल्या वेळी भाजपने २७ जागा जिंकल्या होत्या. यंदा भाजपला निम्म्या जागांवरच रोखण्याचा कमलनाथ यांचा प्रयत्न आहे. भोपाळमध्ये काँग्रेसचे दिग्विजय सिंग विरुद्ध भाजपच्या साध्वी प्रज्ञासिंह यांच्यातील लढतीकडे देशाचे लक्ष लागले आहे.

पश्चिम बंगालमध्ये गत वेळचे यश कायम राखण्याचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यापुढे आव्हान आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपने तृणमूल काँग्रेसपुढे आव्हान उभे केले आहे. पश्चिम बंगालमध्ये ४२ पैकी २४ मतदारसंघांमध्ये शेवटच्या तीन टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. शहरी भागांत भाजपने जोर लावला आहे. झारखंडमध्ये भाजपच्या विरोधात काँग्रेस, झारखंड मुक्ती मोर्चासह विविध पक्षांच्या महाआघाडीने आव्हान उभे केले आहे.  पहिल्या चार टप्प्यांमध्ये झालेल्या मतदानानंतर काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी उत्तर भारतात भाजपच्या विरोधात आक्रमक प्रचार सुरू केला आहे. पुढील आठवडय़ात प्रियंका गांधी या हरयाणामध्ये प्रचार करणार आहेत.

पाचव्या फेरीत मतदान होणारी राज्ये आणि पक्षनिहाय सदस्यसंख्या

  • बिहार (५)/भाजप-३, लोकजनशक्ती-१, राष्ट्रीय लोकसमता पक्ष-१
  • जम्मू-काश्मीर (२)/ पीडीपी-१, भाजप-१
  • झारखंड (४)/ भाजप-४
  • मध्य प्रदेश (७)/ भाजप-७
  • राजस्थान (१२)/भाजप-११, काँग्रेस-१
  • उत्तर प्रदेश (१४)/ भाजप- १२, काँग्रेस-२
  • पश्चिम बंगाल (७)/ तृणमूल काँग्रेस-७