आसाममध्ये भाजपची ८ जागांवर आगेकुच

ईशान्येकडील सात राज्यातील लोकसभेच्या २५ जागांपैकी १३ जागांवर भाजपप्रणित ‘रोलोआ’ने आघाडी घेतली असून काँग्रेसला पाच जागांवर मताधिक्य आहे. आसाममध्ये राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीचा मुद्दा वादग्रस्त ठरूनही तेथे भाजपला ८ जागांवर तर आसाम गण परिषदेला १ जागेवर आघाडी मिळाली आहे.

भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी ईशान्येकडील विजयात मोठी भूमिका पार पाडल्याचे सांगण्यात येत आहे. आसाममधून एनडीएला सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता असून भाजप आठ, काँग्रेस तीन, तर इतर ३ जागांवर आघाडीवर आहेत. भाजप यावेळी लखीमपूर व दिब्रुगड या जागा स्वतकडे राखण्यात यशस्वी होण्याची चिन्हे आहेत. तेथे प्रधान बरुआ व रामेश्वर तेली यांनी काँग्रेस उमेदवारांवर दोन लाखांची आघाडी घेतली आहे. भाजपने मंगलदोई, जोरहाट, नोगांग, सिलचर, दिफू, तेजपूर मतदारसंघात भाजपची सरशी झाली आहे. बारपेटातून एनडीएचा घटक असलेल्या आसाम गण परिषदेचा विजय झाल्यात जमा आहे. कालियाबोर व गोहाटी मतदारसंघात काँग्रेसने आघाडी घेतली आहे. आसाममध्ये २०१४ मध्ये भाजपला सात व काँग्रेस व ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट यांना  प्रत्येकी तीन जागा मिळाल्या होत्या.  यावेळी त्रिपुरा, अरुणाचल व मणिपूरमध्ये एनडीएलाच फायदा होत असून त्रिपुरातील दोन्ही जागा भाजपकडे जाण्याच्या बेतात आहेत. अरुणाचल व मणिपुरात एकेक जागेवर भाजप आघाडीवर आहे. आसाममध्ये काँग्रेसच्या तीन जागा यावेळीही कायम राहण्याची चिन्हे असली तरी मणिपुरात काँग्रेस दोन्ही जागा  गमावण्याच्या बेतात आहे. जे पक्ष कुठल्याच आघाडीत नाहीत त्यांना आसाम, मणिपूर, मिझोराम, सिक्कीम व मेघालय या राज्यात सात जागा मिळण्याची शक्यता आहे.

आसाममध्ये काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई हे आघाडीवर आहेत तर महिला काँग्रेस अध्यक्षा सुष्मिता देव या मागे पडल्या आहेत. गुवाहाटीत काँग्रेसच्या बोबिता शर्मा यांनी आघाडी घेतली आहे.

त्रिपुरात भाजप

आगरतळा : त्रिपुरातील दोन लोकसभा मतदारसंघात सुरुवातीच्या मोजणीत भाजप उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. पश्चिम त्रिपुरा मतदारसंघात प्रतिमा भौमिक यांनी काँग्रेस उमेदवार सुबल भौमिक  यांच्यावर १,२२,८६५ मतांची आघाडी घेतली आहे. पूर्व त्रिपुरा मतदारसंघात भाजप उमेदवार रेबती त्रिपुरा यांनी काँग्रेसचे उमेदवार महाराज कुमारी प्रज्ञा देबबर्मन यांच्यावर १,०८,९८३ मतांनी आघाडी घेतली आहे.

अरुणाचलमध्येही भाजप

इटानगर : अरुणाचल प्रदेशात लोकसभेच्या दोन जागांवर भाजपने आघाडी घेतली असून केंद्रीय गृह राज्यमंत्री किरेन रिजीजू यांनी अरुणाचल पश्चिम मतदारसंघात त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी, काँग्रेस उमेदवार व माजी मुख्यमंत्री नाबाम तुकी यांच्यावर ७१,२३९ मतांची निर्णायक आघाडी घेतली आहे. रिजीजून यांनी २०१४ मध्ये ही जागा ४१,३७८ मतांनी जिंकली होती.

अरुणाचल पूर्व मतदारसंघात भाजपचे तापीर गावो यांनी काँग्रेसचे उमेदवार लोवानगचा वांगलाट यांच्यावर ३३,०९७ मतांनी आघाडी  घेतली आहे. २०१४ मध्ये ही जागा काँग्रेसचे निनाँग एरिंग यांनी जिंकली होती

नागालँडमध्ये ‘एनडीपीपी’

नागालँडमध्ये लोकसभेची एक जागा असून तेथे नॅशनॅलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पक्षाचे विद्यमान खासदार टोकेहो येपटहोमी यांनी काँग्रेसचे के. एल. चिशी यांच्यावर आघाडी घेतली आहे.

मणिपूरमध्ये भाजप, ‘एनपीपी’

मणिपूरमध्ये दोन लोकसभा मतदारसंघ असून आंतर मणिपूर मतदारसंघात भाजपचे राजकुमार रंजन यांनी काँग्रेसचे ओइनाम नबाकिशोर सिंह यांच्यावर १८,४९९ मतांची आघाडी घेतली आहे. बाह्य़ मणिपूर मतदारसंघात नागा पीपल्स फ्रंटचे लोरहो एस फोज यांनी भाजपचे हौलिम शोखोपाव मॅटे यांच्यावर २६,८९९ मतांनी आघाडी घेतली आहे.

सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा आघाडीवर

सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाचे इंद्र सिंग सुब्बा यांनी सिक्कीममधील एकमेव लोकसभा मतदारसंघात सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंटचे देक बहादूर कटवाल यांच्यावर ४५५ मतांची आघाडी घेतली होती.