भारतीय जनता पार्टीने कधीच लोकांच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन दिले नाही असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी सांगितले. १५ लाख रुपये खात्यात जमा करु असे भाजपाने कधीच म्हटलेले नाही. काळया पैशाविरोधात कारवाई करु असे आम्ही आम्ही म्हटले होते. आम्ही काळया पैशाविरोधात पाऊल उचलले.

आम्ही काळा पैशाविरोधात एसआयटीची स्थापना केली असे राजनाथ म्हणाले. २०१४ लोकसभा निवडणुकीच्यावेळी लोकांना आकर्षित करण्यासाठी खात्यात १५ लाख जमा करण्याचे आश्वासन दिल्याबद्दल भाजपावर विरोधकांकडून सातत्याने टीका होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह यांनी केलेले हे विधान महत्वपूर्ण आहे.

काळा पैसा परत आणणे हा २०१४ लोकसभा निवडणुकीतील महत्वाचा मुद्दा होता. परदेशातील बेकायदा संपत्ती परत आणण्याचे आश्वासन भाजपाने पूर्ण केले नाही असा काँग्रेसचा आरोप आहे. विरोधी पक्षातील नेते आणि त्यांच्या सहकाऱ्यांची निवासस्थाने, कार्यालयावर राजकीय सूडभावनेतून इन्कम टॅक्स आणि ईडीकडून छापेमारी सुरु असल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला. या स्वायत्त यंत्रणा असून त्या त्यांच्या पद्धतीने कारवाई करत आहेत असे राजनाथ म्हणाले.