बहुमत सिद्ध करण्यास तयार : कमलनाथ

मध्य प्रदेशातील काँग्रेसप्रणीत कमलनाथ सरकार अल्पमतात आल्याचा दावा भाजपने केला असून आपण विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यास तयार आहोत, असे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी सोमवारी जाहीर केले. सरकार पाडण्यासाठी भाजप धडपडत असल्याचा आरोपही काँग्रेसने केला आहे.

गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीत मध्य प्रदेशात २३०पैकी ११४ जागा जिंकून काँग्रेसने भाजपला जोरदार धक्का दिला आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी पक्षाला ११६ जागांची गरज होती ती बहुजन समाज पक्षाचे दोन आणि समाजवादी पक्षाचा एक आमदार यांच्या जोरावर भागली आहे. भाजपला १०९ जागा मिळाल्या. मध्य प्रदेशातील सत्ता काँग्रेसने काबीज केल्याचे शल्य भाजपच्या उरी सलत आहे. त्यामुळे मतदानोत्तर चाचण्यांमध्ये मध्य प्रदेशात भाजपची आगेकूच दिसू लागल्यानंतर राज्य सरकार पाडण्यासाठी भाजपने जोरदार हालचाली सुरू केल्याची चर्चा आहे. त्यातूनच पक्षाने राज्यपाल आनंदीबेन पटेल यांना पत्र लिहिले असून विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलाविण्याची मागणी केली आहे.

मुख्यमंत्री कलमनाथ यांनी सांगितले की, गेल्या महिन्यात चार वेळा आम्ही बहुमत सिद्ध केले आहे. आता पाचव्यांदा भाजपला तोंडघशी पडायची इच्छा असेल, तर त्यालाही आम्ही तयार आहोत.

विधानसभेतील बलाबल

एकूण सदस्य संख्या २३०

काँग्रेस ११४, भाजप १०९, बसप २, समाजवादी पक्ष १, अपक्ष ४.