काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे सध्या चांगला वक्ता नाही, म्हणूनच त्यांना भाड्याने दुसऱ्या पक्षातील नेत्यांना बोलवावे लागते. या नेत्यालाही हल्ली काम नाही, ते रात्रभर युट्यूबवर बसतात, व्हिडिओ बघतात आणि दुसऱ्या दिवशी लाव रे तो व्हिडिओ म्हणतात, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. लोकांना तुमचा व्हिडिओ आवडला नाही आणि शेवटी तुम्हाला घरी पाठवले, असा टोलाही त्यांनी लगावला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी डोंबिवलीत प्रचारसभा घेतली. या सभेत त्यांनी काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि मनसेवर जोरदार टीका केली. राहुल गांधी, शरद पवार आणि अन्य नेत्यांची भाषणं म्हणजे निव्वळ मनोरंजन असतं. मालिका सुरु होण्यापूर्वी मालिकेतील संवाद आणि पात्र काल्पनिक आहे, असे सांगितले जाते. तसेच आता या नेत्यांची भाषणं दाखवण्यापूर्वी वृत्तवाहिन्याही हे काल्पनिक आहे, असे म्हणतील, असा चिमटा त्यांनी काढला.

राज ठाकरेंवर टीका करताना मुख्यमंत्री म्हणाले, या लोकांकडे नेता नसल्याने त्यांना दुसऱ्या पक्षातील नेत्यांची मदत घ्यावी लागते. आता तर इंजिनच भाड्याने घेतले आहे. इंजिन नुसतं तोंडाच्या वाफेवर चालू शकत नाही. त्यासाठी ताकद लागते. हे इंजिन आधी विधानसभा आणि मग महापालिका निवडणुकीत गेले. आता त्यांना काहीच काम नाही. रात्रभर यूट्यूबवर व्हिडिओ बघतात आणि सकाळी लाव रे तो व्हिडिओ म्हणतात, असा टोलाही त्यांनी लगावला.

काँग्रेस आघाडीच्या जाहीरनाम्यात सामान्यांना भरघोस आश्वासने देण्यासारखे काही नाही. ६० वर्षांत दिलेल्या गरिबी हटावसारख्या त्याच घोषणा आहेत. हा जाहीरनामा म्हणजे कोंबडी विकण्याचा धंदा आहे, अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली. वर्षांनुवर्षे गरिबी हटावचे नारे देणाऱ्या आघाडी सरकारकडे जाहीरनाम्यात सामान्यांना आश्वासन देण्यासारखे काही नाही म्हणून वर्षांला गरिबांना ७२ हजार रुपये देण्याची घोषणा करण्यात आली. ही घोषणा म्हणजे एखाद्याने एका कोंबडी विक्रेत्याला तू ६४० कोंबडय़ा विकून ये मी तुला एक लाख रुपये देतो, असा व्यवहार आहे. हा जाहीरनामा म्हणजे कोंबडी विकण्याचा धंदा आहे, असे त्यांनी म्हटले आहे.