जिंतूरला धनंजय मुंडे यांची जाहीर सभेत टीका

परभणीचे खासदार संजय जाधव वाळूमाफिया, जमीन माफिया आहेत. व्यापाऱ्यांना मारहाण करून त्यांनी दहशतीचे वातावरण निर्माण केले. विकासकामे तर केलीच नाहीत उलट विकासकामे नासवण्याचे काम त्यांनी केले असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला.

जिंतूर येथे काँग्रेस आघाडीचे उमेदवार राजेश विटेकर यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी खासदार माजीद मेमन, काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर, आमदार विजय भांबळे, मधुसूदन केंद्रे, रामराव वडकुते, उमेदवार राजेश विटेकर  सुरेश देशमुख यांची उपस्थिती होती. मुंडे म्हणाले, अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सत्तेत आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षांत कोणतीच विकासकामे केली नाहीत. उलट नोटबंदी, जीएसटी लागू करून व्यापाऱ्यांसह नागरिकांना वेठीस धरण्याचे काम केले. कोणाच्याही खात्यावर १५ लाख जमा केले नाहीत किंवा बेरोजगारांना रोजगारही उपलब्ध करून दिला नाही. मात्र सभांमधून यावर न बोलता पुलवामा घटनेचा उल्लेख करून मोदी मते मागत असल्याचेही मुंडे यांनी सांगितले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाच वष्रे सरकारच्या अनेक योजनांवर टीका केली. राजीनामा खिशात असल्याचे सांगत सत्तेला लाथ मारण्याची भाषा केली. मात्र पाच वष्रे सत्तेत राहून मलिदा लाटण्याचे काम ठाकरे यांनी केले असल्याचा आरोपही मुंडे यांनी या वेळी केला.