भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या कोलकात्तामधील रोड शो दरम्यान झालेल्या हिंसाचारावरुन पश्चिम बंगालमध्ये राजकारण चांगलेच तापले आहे. भाजपा आणि तृणमुल काँग्रेसकडून परस्परांवर आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरु आहे. तृणमुल काँग्रेसने आज निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन काल झालेल्या हिंसाचारातील भाजपाच्या सहभागाचे पुरावे सादर केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर बुधवारी जोरदार हल्लाबोल केला. ममता बॅनर्जी यांनी दोन दिवसांपूर्वी बदला घेणार म्हणून जाहीर केले होते. अमित शाह यांच्या रोड शो वर हल्ला करुन २४ तासात त्यांनी ते दाखवून दिले. सर्व सर्वेक्षण चाचण्यांनी भाजपाला बहुमत मिळेल असा अंदाज वर्तवला आहे. दीदी तुमची अस्वस्थतता आणि लोकांकडून मिळणारा पाठिंबा पाहिल्यानंतर बंगालमुळे आम्हाला ३०० पेक्षा जास्त जागा जिंकण्यास मदत होईल असा दावा मोदी यांनी केला.

पश्चिम बंगालमधील भाजपाच्या उदयाने दीदी घाबरल्या आहेत. राज्यातील जनतेने मुख्यमंत्री बनवून त्यांना आदर दिला. पण सत्तेचा कैफ चढलेल्या ममता बॅनर्जी लोकशाहीचा गळा घोटत आहेत असा आरोप पंतप्रधान मोदींनी केला.