दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याही बदल्या

नवी दिल्ली/ कोलकाता : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान गेल्या २४ तासांत झालेल्या हिंसाचाराच्या पाश्र्वभूमीवर निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रचार मुदतीआधीच थांबविण्याची तसेच अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि गृहसचिवांच्या दिल्लीत बदल्या करण्याची बुधवारी घोषणा केली. हा प्रचार आता गुरुवारी रात्री दहा वाजता थांबवला जाईल.

घाईघाईत बोलावलेल्या पत्रकार परिषदेत निवडणूक उपायुक्त चंद्रभूषण कुमार यानी ही घोषणा केली. निवडणूक आयोगाला कायद्याने जे अधिकार दिले आहेत त्यानुसार हा निर्णय घेतला गेला आहे. हा प्रथमच घेतला असला, तरी तो पुन्हा कधीच घेतला जाणार नाही, असे नव्हे, असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले.

राज्य गुन्हा अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक राजीव कुमार यांना आयोगाने तत्काळ जबाबदारीतून मुक्त केले आहे. त्यांना गुरुवारी सकाळी दहापर्यंत केंद्रीय गृहमंत्रालयात हजर राहण्यास सांगितले आहे. त्याचप्रमाणे गृह आणि आरोग्य खात्याचे मुख्य सचिव अत्रि भट्टाचार्य यांनी निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप केल्याच्या आरोपावरून त्यांचीही तत्काळ दिल्लीत बदली करण्याचा आदेश आयोगाने दिला आहे.

ममता बॅनर्जी यांच्या विश्वासातील राजीव कुमार हे आधी कोलकात्याचे पोलीस आयुक्त होते. मात्र शारदा चिटफंड प्रकरणात त्यांच्या अटकेचा सीबीआयचा प्रयत्न राज्य सरकारने रोखून धरला होता. सर्वोच्च न्यायालयानेही त्यांच्या अटकेस मनाई करीत त्यांना सीबीआय चौकशीत सहकार्याचा आदेश दिला होता. त्यानंतर त्यांची राज्य गुन्हा अन्वेषण विभागाचे अतिरिक्त महासंचालक म्हणून राज्य सरकारने नियुक्ती केली होती.

ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याच्या मोडतोडीवरूनही निवडणूक आयोगाने तीव्र नाराजी व्यक्त केली असून ही मोडतोड करणाऱ्यांना तपास यंत्रणा शोधून काढील आणि कारवाई करील, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

दरम्यान, ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची मोडतोड मंगळवारच्या हिंसाचारात झाल्याने अवघ्या बंगालमध्ये संतापाची लाट उसळली आहे. भाजपने केलेला हा बंगाली अस्मितेचा आणि संस्कृतीचा अपमान आहे, असा आक्रमक पवित्रा घेत तृणमूलने बुधवारी वातावरण तापवण्यास सुरुवात केली. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बेलियाघाट ते श्यामबाजार असा सात किलोमीटरचा निषेध मोर्चाच काढला. या मोर्चाला हजारो लोकांची गर्दी लोटली होती. यावेळी बॅनर्जी माध्यमांशी बोलताना म्हणाल्या की, ‘‘ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची मोडतोड ही अत्यंत घृणास्पद गोष्ट आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यासह जमलेले त्यांचे समर्थक हे बंगालबाहेरून आले आहेत. त्यांना इथल्या संस्कृतीशी काही देणेघेणे नाही.’’

विद्यासागर यांच्या पुतळ्याच्या मोडतोडीबाबत मंगळवारी भाजपने कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र तृणमूलने हा प्रश्न आक्रमकपणे हाती घेतल्यानंतर, ही मोडतोड आम्ही केलीच नाही, असा पवित्रा भाजपने बुधवारी घेतला. मात्र मोडतोड करणारे भाजपचेच होते आणि त्यांच्या हाती भाजपचे झेंडे होते, हे दाखविणारी चित्रफीतच तृणमूल काँग्रेसने जारी केली. ही चित्रफीत निवडणूक आयोगाकडे दाखल केली जाणार आहे, असेही तृणमूलने सांगितले. निवडणूक उपायुक्त  सुदीप जैन यांनी भाजपशी संबंधित प्रकरणात हस्तक्षेप करू नका, असा आदेश पोलिसांना दिला होता त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांना आवर घातला गेला नाही, असा आरोपही तृणमूलने केला आहे.

भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत कोलकात्यातील ‘प्रचार मोर्चा’ला िहसक वळण लागण्यात तृणमूलचाच हात असून निवडणूक आयोगाने यात मूक प्रेक्षकाची भूमिका घेतल्याचा आरोप केला होता.

ऐतिहासिक निर्णय

प्रचारमुदतीत कपातीचा निर्णय राज्यघटनेच्या कलम  ३२४नुसार जाहीर झाला असून देशाच्या इतिहासात प्रथमच या कलमाचा वापर झाला आहे. विशेष म्हणजे प्रचार मुदत प्रथेप्रमाणे सायंकाळी पाच वाजता संपते. यावेळी ती रात्री दहापर्यंत असल्याने पंतप्रधान मोदी यांना पूर्वनियोजित सभा घेता येणार आहेत.