गुरुवारी मतमोजणी, तयारी अंतिम टप्प्यात

नागपूर : मतदानात्तोर चाचण्यांचे अंदाज विविध वृत्तवाहिन्यांवर वर्तविण्यात येत असल्याने सर्वाचे लक्ष आता प्रत्यक्ष मतमोजणीकडे लागले आहे. २३ मे रोजी गुरूवारी जिल्ह्य़ातील नागपूर आणि रामटेक लोकसभा निवडणुकीची मतमोजणी कळमना बाजार समितीत होणार असून त्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे.

सोमवारी जिल्हाधिकारी अश्वीन मुद्गल यांनी मतमोजणी स्थळाला भेट देऊन तयारीची पाहणी केली. कळमना मार्केट परिसरातील दोन मोठय़ा दालनामध्ये  नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी  स्वतंत्रपणे मतमोजणीची व्यवस्था करण्यात आली आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणी होणार आहे. सकाळी ६.३० वाजतापासून मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरुवात होईल. स्ट्राँगरुममधूम यंत्र बाहेर काढणे, ते मतमोजणीस्थळी नेणे, तेथे व्यवस्था करण्यात आलेल्या टेबलवर ठेवणे अशी ही प्रक्रिया आहे. एकूण २० टेबलची व्यवस्था करण्यात आली असून ते दोन रांगेत ठेवले जाणार आहे. प्रत्येक फेरीत एकूण १३० केंद्रावरील मतांची मोजणी होईल. सर्वसाधारणपणे निकालाचा पहिला कल सकाळी ९ वाजेपर्यंत येण्याची शक्यता आहे.

मतमोजणीसाठी एकूण ८८८ कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. त्यात पर्यवेक्षक २८८,  सूक्ष्म निरीक्षक ३१२,  मतमोजणी सहाय्यक  २८८ आदींचा समावेश आहे. या कर्मचाऱ्यांचे दोन प्रशिक्षण पूर्ण झाले असून उद्या तिसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षण मतमोजणीस्थळी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार प्रत्येक मतदारसंघातील पाच याप्रमाणे रामटेक आणि नागपूर मिळून एकूण १२ विधानसभा मतदारसंघातील ६० व्हीव्हीपॅटमधील मतचिठ्ठय़ांची मोजणी करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.  मतमोजणीची सुरुवात टपाल मतपत्रिकेच्या मोजणीने होईल. त्यानंतर ईव्हीएममधील मतांची मोजणी करतील. प्रत्येक फेरीनिहाय निकाल जाहीर करण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्वीन मुद्गल यांनी दिली आहे. निवडणूक आयोगाच्या सुधारित नियमानुसार एका फेरीची मोजणी पूर्ण झाल्यावरच दुसऱ्या फेरीच्या मोजणीला हात लावला जाणार आहे. त्यामुळे यंदा मोजणीचे काम प्रदीर्घ काळ चालण्याची शक्यता आहे.