ठाणे, कल्याण, भिवंडी मतदारसंघातील मतमोजणीला १२ तासांहून अधिक वेळ लागणार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संपूर्ण देशभरासह ठाणे जिल्ह्य़ातील ठाणे, कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी गुरुवार सकाळपासून सुरू होणार आहे. या तिन्ही मतदारसंघांत मतमोजणीच्या ३०हून अधिक फेऱ्या होणार असून ‘व्हीव्हीपॅट’मुळे मतमोजणीची प्रक्रिया आणखी लांबणार आहे. निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांच्या मते, मतमोजणीसाठी १२ तासांहून अधिक वेळ लागण्याची शक्यता असली तरी, ही प्रक्रिया संपून अंतिम निकाल जाहीर होण्यास शुक्रवारची पहाट उजाडण्याची शक्यता आहे.

जिल्ह्य़ातील ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तिन्ही लोकसभा मतदारसंघांत २९ एप्रिल रोजी मतदान झाले होते. या तिन्ही मतदारसंघांतील मतमोजणी गुरुवारी सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होणार आहे. ठाण्याची मतमोजणी घोडबंदर येथील कावेसर भागातील न्यू होरायझन शाळा, भिवंडीची मतमोजणी एलकुंडे येथील महावीर फाउंडेशनची प्रेसिडेन्सी शाळा तर कल्याणची मतमोजणी डोंबिवली पूर्वेतील ह.भ.प सावळाराम महाराज क्रीडासंकुल येथे होणार आहे.

ठाणे लोकसभा मतदारसंघात ३३ फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार असून त्यासाठी १२ ते १३ तासांचा अवधी लागणार आहे. पोस्टल मतदान मोजणीसाठीही स्वंतत्र व्यवस्था करण्यात आली असून त्यासाठी चार ते पाच तासांचा अवधी लागणार आहे. त्यानंतर प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच ‘व्हीव्हीपॅट’ संलग्न मतदान यंत्रांची निवड लॉटरी पद्धतीने केली जाणार असून या यंत्रामधील चिठ्ठय़ांची मोजणी केली जाणार आहे. त्यात मतदान यंत्रातील मतदानाचा आकडा आणि चिठ्ठय़ांची संख्या समान येते की नाही, याची तपासणी केली जाणार आहे. त्यासाठी पाच तासांचा अवधी लागणार आहे, अशी माहिती ठाणे लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी दिली. भिवंडी मतदारसंघातील मोजणीच्या ३५ फेऱ्या असून कल्याणमध्ये मतमोजणीच्या ३१ फेऱ्या होणार आहेत. त्यामुळे येथील निकालालाही विलंब होण्याची शक्यता आहे. सायंकाळपर्यंत निम्म्या फेऱ्यांतील मतमोजणीचे आकडे आले की, निकालाचा अंदाज समजू शकेल. मात्र, अंतिम निकाल हाती येण्यास शुक्रवारची पहाट उजाडेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मतमोजणी केंद्रावर बंदोबस्त..

* मतमोजणी केंद्रावर एक पोलीस उपायुक्त, ३ साहाय्यक पोलीस आयुक्त, १७ वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ४० साहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक, ५०० पोलीस कर्मचारी, राज्य राखीव दलाचे ३० जवान, निमलष्करी दलाचे ३० जवान, असा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

* निवडणुक कामासाठी ८०० कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. याशिवाय, देखभाल दुरुस्ती, भोजन व्यवस्थेचे कर्मचारी तसेच इतर असे ५०० जण त्या ठिकाणी असणार आहेत.

* भिवंडीत १ अपर पोलीस अधीक्षक, २ उपविभागीय पोलीस अधिकारी, १२ पोलीस निरीक्षक, ३४ साहाय्यक पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक, २९५ पोलीस कर्मचारी, १ निमलष्करी दलाचे पथक, १ दंगल नियंत्रक पथक मतमोजणी केंद्रावर तैनात असतील.

गोंधळ टाळण्यासाठी रंगाचा वापर

विधानसभा मतदान केंद्रनिहाय शिपायांची नेमणूक करण्यात आली आहे. नेमून दिलेल्या मतदारसंघाव्यतिरिक्त दुसऱ्या मतदान केंद्रात शिपायांनी जाऊ नये आणि मतदान यंत्रे नेताना गोंधळ होऊ नये, यासाठी विविध रंगांचा वापर करण्यात आला आहे. मीरा रोडसाठी निळा, ओवळा-माजिवाडय़ासाठी हिरवा, कोपरी-पाचपाखाडीसाठी फिक्कट तांबडा, ठाणे शहरसाठी भगवा, ऐरोलीसाठी लाल आणि बेलापूरसाठी पिवळ्या रंगांची निवड करण्यात आली आहे. या रंगानुसार संबंधित मतमोजणी केंद्रावर त्या रंगाचे पडदे लावण्यात आले असून शिपायांना मतदारसंघनिहाय रंगाचे टीशर्ट देण्यात आले आहेत, अशी माहिती अनिल पवार यांनी दिली.

भिवंडी

(मोजणी : प्रेसिडेन्सी शाळा, एलकुंडे)

२२००

मतदान केंद्रे

३५

मतमोजणी फेऱ्या

कल्याण

(मोजणी : हभप सावळाराम महाराज क्रीडा संकुल, डोंबिवली पूर्व)

१६९८

मतदान केंद्रे

३१

मतमोजणी फेऱ्या

ठाणे

(मोजणी : न्यू होरायझन शाळा, कावेसर)

२४५२

मतदान केंद्रे

३३

मतमोजणी फेऱ्या

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Final result tomorrow morning
First published on: 23-05-2019 at 00:20 IST