रामटेकमध्ये तुमाने की गजभिये? उत्सुकता शिगेला; पहिला कल दोन तासांत

जिल्ह्य़ातील नागपूर व रामटेक (राखीव) लोकसभा निवडणुकीसाठी मतदान (११ एप्रिल) झाल्यावर तब्बल सहा आठवडय़ानंतर उद्या गुरूवारी सकाळी ८ वाजतापासून कळमना बाजार समितीच्या परिसरात मतमोजणीला सुरूवात होणार आहे. नागपुरातून भाजपचे विद्यमान खासदार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी गढ राखणार की काँग्रेसचे नाना पटोले बाजी मारणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. सोबतच रामटेकमधून सेनेचे विद्यमान खासदार कृपाल तुमाने पुन्हा संसदेची पायरी चढणार की काँग्रेसचे किशोर गजभिये यांना ही संधी मिळणार याचाही फैसला होणार आहे. मतमोजणी  दीर्घकाळ चालणार असली तरी पहिला कल सकाळी ९.३० ते १० च्या दरम्यान हाती येण्याची शक्यता आहे.

मतदानाच्या पहिल्या टप्प्यातच म्हणजे ११ एप्रिला मतदान झाल्यापासून नागपुरातून कोण जिंकणार याबाबत दावे-प्रतिदावे सुरू आहेत. मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज जाहीर झाल्यावर उत्सुकता शिगेला पोहचली आहे. त्याचा शेवट उद्या होणार आहे.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नागपूरमध्ये मोदी लाटेवर स्वार होत गडकरी यांनी काँग्रेसचे विलास मुत्तेमवार यांचा तब्बल २ लाख ८० हजार मतांनी पराभव केला होता. पाच वर्षांत हजारो कोटी रुपयांची विकास कामे करून त्यांनी याच आधारावर जनतेकडे कौल मागितला. दुसरीकडे काँग्रेसने स्थानिक नेत्यांच्या गटबाजीला कंटाळून भंडाऱ्याचे नाना पटोले यांना गडकरींच्या विरुद्ध रिंगणात उतरवले होते. नानांनी सर्व नेत्यांच्या गटांची तसेच सर्व समाज घटकांची मोट बांधून निवडणुकीत चुरस निर्माण केली. त्यामुळे नागपूरकर विकास कामाला कौल देतात की मोदी सरकार विरुद्ध संताप व्यक्त करून नानांना संधी देतात हे गुरुवारी स्पष्ट होणार आहे. रिंगणात एकूण ३० उमेदवार असून त्यात प्रामुख्याने बसपाचे मो. जमाल, वंचित बहुजन आघाडीचे सागर डबरासे आणि बीआरएसपीचे सुरेश माने यांचा समावेश आहे.

रामटेक (राखीव) मतदारसंघातही चुरस आहे. २०१४ च्या निवडणुकीत सेनेचे कृपाल तुमाने यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते व तत्कालीन केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक यांचा पराभव केला होता. यंदा काँग्रेसने त्यांच्या विरुद्ध किशोर गजभिये या माजी सनदी अधिकाऱ्याला रिंगणात उतरवले आहे. २०१४ मध्ये मोदी लाटेमुळे तुमाने प्रथमच संसदेत गेले. यंदा ही लाट दिसत नव्हती. दरम्यान, मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली असून सकाळी ८.३० वा. अत्यंत कडेकोट बंदोबस्तात मतमोजणीला सुरूवात होणार आहे, असे जिल्हा निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी सांगितले.

नागपूरकडे देशाचे लक्ष

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी रिंगणात असल्याने संपूर्ण देशाचे लक्ष नागपूरच्या निकालाकडे लागले आहे. नागपुरात संघ मुख्यालय आहे तसेच गडकरी यांचे नाव मधल्या काळात पंतप्रधानपदाचे दावेदार म्हणून चर्चेत होते. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही हे गृहशहर आहे. देशातील प्रमुख वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी आणि वरिष्ठ पत्रकारांनी नागपूरला भेट घेऊन जनमानसाचा कौल घेतला होता.

झालेले मतदान (११ एप्रिल २०१९)

नागपूर लोकसभा

एकूण मतदार-२१ लाख ६० हजार २१७

झालेले मतदान -११ लाख ८२ हजार ५०७

टक्केवारी – ५४.७४

२०१४ चा कौल असा होता

नागपूर मतदारसंघ

नितीन गडकरी (भाजप)- ५ लाख ८७ हजार ७६७ (विजयी)

विलास मुत्तेमवार (काँग्रेस) ३ लाख २ हजार ९१९ (पराभूत)

रामटेक मतदारसंघ

कृपाल तुमाने (शिवसेना)- ५ लाख १९ हजार ८९२ (विजयी)

मुकुल वासनिक (काँग्रेस) ३ लाख ४४ हजार १०१ (पराभूत)

मतमोजणीचे वेळापत्रक

स.६.३०-ईव्हीएम स्ट्रॉंग रुम उघडणार

स. ७.३०-ईव्हीएम मतमोजणी स्थळी पोहचणार

स. ८ – टपाल मतपत्रिकांची मोजणी

स. ८.३० ईव्हीएममधील मतांची मोजणी

मतमोजणीच्या फेऱ्या

नागपूर -१९

रामटेक -२५

रिंगणातील उमेदवार

नागपूर -३०

रामटेक -१६

मतमोजणीसाठी मनुष्यबळ

मतमोजणी पर्यवेक्षक २८८

मतमोजणी सहायक  २८८

सुक्ष्म निरीक्षक       ३१२

एकूण               ८८८

सुरक्षा व्यवस्था

उपायुक्त ०३,- सहाय्यक आयुक्त ७

निरीक्षक २३, – उपनिरीक्षक १०७

शिपाई -१५६९, महिला शिपाई १७३

एसआरपीए, सीआरपीएफ प्रत्येकी दोन तुकडय़ा

रामटेक लोकसभा

एकूण मतदार -१९ लाख २१हजार ०७४

झालेले मतदान – ११लाख ९३ हजार३०७

टक्केवारी – ६१.१४